Revised Common Lectionary (Semicontinuous)
117 सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा.
सर्व लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
2 देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि
देव आपल्याशी सदैव खरा वागतो.
परमेश्वराचा जयजयकार करा!
18 परमेश्वर म्हणतो,
“सध्या याकोबाची माणसे बंदिवासात आहेत.
पण ती परत येतील.
याकोबाच्या घरांची मला दया येईल.
सध्या नगरी म्हणजे पडक्या
इमारतींनी भरलेली टेकडी आहे.
पण नगरी पुन्हा बांधली जाईल.
राजाचा राजवाडाही योग्य जागी बांधला जाईल.
19 तेथील लोक स्तुतिस्तोत्रे गातील.
तेथे हास्याच्या लहरी उठतील.
त्यांना मी पुष्कळ संतती देईन
इस्राएल व यहूदा यांचा आकार लहान राहणार नाही
मी त्यांना मान मिळवून देईन.
कोणीही त्यांना खाली पाहणार नाही.
20 याकोबाचे घराणे पूर्वीच्या इस्राएलच्या घराण्याप्रमाणे होईल.
मी, इस्राएल आणि यहूदा, यांना सामर्थ्यशाली करीन
आणि त्यांना इजा करणाऱ्यांना मी शिक्षा करीन.
21 त्यांच्यातीलच एक त्यांचे नेतृत्व करील.
तो माझ्या माणसांपैकीच एक असेल.
मी सांगितल्यावरच लोक माझ्याजवळ येऊ शकतील.
मग मी त्या नेत्याला माझ्याजवळ यायला सांगीन आणि तो माझ्याजवळ येईल.
तो मला जवळचा होईल.
22 तुम्ही लोक माझे व्हाल
आणि ती तुमचा देव होईन.”
23 परमेश्वर खूप रागावला होता.
त्याने लोकांना शिक्षा केली.
शिक्षा वादळाप्रमाणे आली.
त्या दुष्ट माणसांविरुद्ध शिक्षा तुफानाप्रमाणे आली.
24 लोकांची शिक्षा पूर्ण होईपर्यंत
परमेश्वराचा राग राहील.
परमेश्वराने ठरविलेली शिक्षा पूर्ण होईपर्यंत
तो शांत होणार नाही.
यहूदाच्या लोकांनो,
तो दिवस उजाडल्यावरच तुम्हाला हे समजेल.
8 ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पाया पडून मी त्याची उपासना करु लागलो. 9 परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करु नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे ह्या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक सेवक आहे. देवाची उपासना कर!”
10 नंतर देवदूत मला म्हणाला, “भावी काऴाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस; कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे. 11 जो मनुष्य अयोग्य वागतो, तो आणखी चुकीचे वर्तन करीत राहू दे! जो मलिन आहे, त्याला आणखी मलिन राहू दे! जो मनुष्य पवित्र आहे, त्याला आणखी पवित्रपणाने चालू दे.”
12 “पाहा! मी लवकर येत आहे, आणि माझे वेतन तुमच्याकरिता घेऊन येईन. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार मी फळ देईन. 13 मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.
14 “जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्क राहील. 15 परंतु ‘कुत्रे’ चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तिपूजा करणारे, आणि निरनिराळ्या रीतीने लबाडी करणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.
16 “तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”
17 आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये!” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये!” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.
18 या पुस्तकात भविष्याकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्याला मी गंभीरपणे सावधान करतो: जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणिल. 19 आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील, त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
20 जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.”
आमेन, ये प्रभु येशू, ये!
21 प्रभु येशूची कृपा देवाच्या सर्व लोकांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center