Revised Common Lectionary (Semicontinuous)
23 “यहूदातील लोकांच्या मेंढपाळांचे (नेत्यांचे) वाईट होईल, ते मेंढ्यांचा नाश करीत आहेत. ते माझ्या कुरणातून त्यांना चहूबाजूना पळवून लावीत आहेत.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
2 ते मेंढपाळ (नेते) माझ्या लोकांना जबाबदार आहेत, आणि परमेश्वर, इस्राएलचा देव त्या मेंढपाळांना पुढील गोष्टी सागंतो “तुम्ही मेंढपाळांनी (नेत्यांनी) माझ्या मेंढ्यांना चारी दिशांना पळून जाण्यात भाग पाडले आहे. त्यांना तुम्ही जबरदस्तीने लांब जायला लावले. तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. पण मी तुमची काळजी घेईन. मी तुम्हाला तुमच्या वाईट कृत्यांबद्दल शिक्षा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 3 “मी माझ्या मेंढ्या (लोक) दुसऱ्या देशांत पाठविल्या पण ज्या मेंढ्या लोक दुसऱ्या देशात गेल्या आहेत, त्यांना मी गोळा करीन. मी त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. त्या मेंढ्या (लोक) त्यांच्या कुरणात (देशात) परत आल्यावर, त्यांना पुष्कळ संतती होऊन त्यांची संख्या वाढेल. 4 मी माझ्या मेंढ्यांसाठी नवीन मेंढपाळ (नेते) नेमीन. ते मेंढपाळ (नेते) माझ्या मेंढ्यांची (लोकांची) काळजी घेतील व माझ्या मेंढ्या (लोक) घाबरणार नाहीत वा भयभीत होणार नाहीत. माझी एकही मेंढी (माणूस) हरवणार नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
सदाचरणी “अंकुर”
5 हा परमेश्वराचा संदेश आहे.
“मी चांगला ‘अंकुर’ निर्माण
करण्याची वेळ येत आहे.
तो चांगला अंकुर सुज्ञपणे राज्य करणारा राजा असेल.
देशात योग्य व न्याय्य गोष्टी तो करेल.
6 त्या चांगल्या ‘अंकुराच्या’ काळात यहूदातील लोक वाचतील
आणि इस्राएल सुरक्षित राहील.
त्याचे नाव असेल
परमेश्वर आमचा चांगुलपणा.
68 “प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो,
कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास,
व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.
69 त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून
आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
70 देव म्हणाला की, मी असे करीन
त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.
71 जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात
त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.
72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे.
व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.
73 हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
74 ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की,
आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू.
75 त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.
76 “मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील.
प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.
77 कारण तू प्रभूसमोर, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पापक्षमा मिळून तुमचे तारण होईल
हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील.
78 “कारण देवाच्या हळुवार करुणेमुळे
स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
79 आणि शांतीच्या मार्गावर आमच्या
पावलांना मार्गदर्शन करील.”
11 त्याच्या गौरवी सामर्थ्यात त्याच्या महान सामर्थ्यामुळे समर्थ बनण्यासाठी तुम्हांला सहनशीलता व धैर्य प्राप्त व्हावे.
12 आणि आनंदाने पित्याला धन्यवाद द्यावेत, ज्याने तुम्हांला प्रकाशात राहणाऱ्या देवाच्या लोकांचे जे वतन आहे त्यात वाटा मिळण्यासाठी पात्र केले. 13 देवाने अंधाराच्या अधिपत्यापासून आमची सुटका केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले. 14 पुत्राद्वारे आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली.
जेव्हा आम्ही खिस्ताकडे पाहतो तेव्हा आम्ही देवाला पाहतो
15 तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे
आणि निर्माण केलेल्या
सर्व गोष्टीत तो प्रथम आहे.
16 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही
त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले.
जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे,
सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो, सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत
सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले.
17 सर्व गोष्टी निर्माण होण्याच्या अगोदरपासूनत तो अस्तित्वात आहे.
सर्व गोष्टी त्याच्याद्वारे चालतात.
18 आणि तो शरीराचा म्हणजे मंडळीचा मस्तक आहे.
तो प्रारंभ आहे, मृतांमधून पुनरुत्थान पावलेल्यांमध्ये तो प्रथम आहे.
यासाठी की प्रत्येक गोष्टीत
त्याला प्रथम स्थान मिळावे.
19 कारण देवाने त्याच्या सर्व पूर्णतेत त्याच्यामध्ये राहण्याचे निवडले.
20 आणि ख्रिस्ताद्वारे सर्व गोर्ष्टींचा स्वतःशी म्हणजे त्या पृथ्वीवरील गोष्टी असोत,
किंवा स्वार्गांतील गोष्टी असोत समेट करण्याचे ठरविले.
ख्रिस्ताने जे रक्त वधस्तंभावर सांडले त्याद्वारे देवाने शांति केली.
33 आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारांमध्ये खिळले. एका गुन्हेगारला त्यांनी उजवीकडे ठेवले व दुसऱ्याला डावीकडे ठेवले.
34 नंतर येशू म्हणाला, “हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”
त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. 35 लोक तेथे पाहात उभे होते. आणि पुढारी थट्टा करुन म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचविले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे!”
36 शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला आंब दिली. 37 आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!” 38 त्याच्यावर असे लिहिले होते: “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”
39 तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याचा अपमान केला. तो म्हणाला, “तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हालाही वाचव!”
40 पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्याला दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. 41 पण आपली शिक्षा योग्य आहे. कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणांस मिळत आहे. पण या माणसाने काहीही अयोग्य केले नाही.” 42 नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.”
43 येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
2006 by World Bible Translation Center