Revised Common Lectionary (Semicontinuous)
68 “प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो,
कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास,
व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.
69 त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून
आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
70 देव म्हणाला की, मी असे करीन
त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.
71 जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात
त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.
72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे.
व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.
73 हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
74 ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की,
आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू.
75 त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.
76 “मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील.
प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.
77 कारण तू प्रभूसमोर, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पापक्षमा मिळून तुमचे तारण होईल
हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील.
78 “कारण देवाच्या हळुवार करुणेमुळे
स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
79 आणि शांतीच्या मार्गावर आमच्या
पावलांना मार्गदर्शन करील.”
18 योशीयाचा मुलगा राजा यहोयाकीम ह्यास परमेश्वर असे म्हणतो की
“यहोयाकीमसाठी यहूदातील लोक राहणार नाहीत.
‘हे माझ्या बंधू, मला यहोयाकीमबद्दल वाईट वाटते.’
असे ते एकमेकांना म्हणणार नाहीत.
यहोयाकीमबद्दल ते शोक करणार नाहीत.
‘हे स्वामी! हे राजा!
मला खूप वाईट वाटते! मला खूप दु:ख होते!’
असे ते म्हणणार नाहीत.
19 एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरुशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील.
ते त्याचा मृत देह फरपटत नेऊन यरुशलेमच्या वेशीबाहेर फेकून देतील.
20 “यहूदा, लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड.
बाशानच्या डोंगरात तुझा आवाज ऐकू जाऊ देत.
अबारीमच्या डोंगरात तुझा आवाज ऐकू जाऊ देत.
अबारीमच्या डोंगरात जाऊन मोठ्याने ओरड.
का? कारण तुझ्या सर्व ‘प्रियकराचा’ नाश केला जाईल.
21 “यहूदा, तुला सुरक्षित वाटले.
पण मी तुला इशारा दिला होता.
पण तू माझे ऐकण्याचे नाकारलेस.
तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस.
तू तरुण असल्यापासून माझ्या
आज्ञा पाळल्या नाहीस, यहूदा!
22 म्हणून मी दिलेली शिक्षा झंझावाताप्रमाणे येईल.
ती तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब उडवून देईल.
तुला वाटले की दुसरी राष्ट्रे तुला मदत करतील.
पण त्या राष्ट्रांचाही पराभव होईल.
मग खरोखरच तू निराश होशील.
तू केलेल्या वाईट गोष्टींची तुला लाज वाटेल.
23 “राजा, तू तुझ्या उंच डोंगरावरच्या गंधसरुच्या लाकडापासून बनविलेल्या वाड्यात राहतोस!
म्हणजेच जणू काही जेथून हे लाकूड येते त्या लबानोनमध्येच राहतोस तुला वाटते की तू सुरक्षित आहेस!
कारण तू उंच डोंगरावर मोठ्या घरात राहतोस पण तुला शिक्षा झाल्यावर तू खरोखर विव्हळशील.
तुला प्रसूतिवेदनांप्रमाणे वेदना होतील.”
राजा यहोयाकीन (कोन्या) याच्याविरुध्द निवाडा
24 “मी निश्र्चितपणे आहे म्हणूनच हे तुझ्याबाबत घडेल” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “यहोयाकीन, यहोयाकीमच्या मुला, यहूदाच्या राजा, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते. तुझ्याबाबतीत असेच घडेल. 25 यहोयाकीन, मी तुला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी लोक ह्यांच्या हवाली करीन. तू त्या लोकांना घाबरतोस. ते तुला ठार मारु इच्छितात. 26 तुझी व तुझ्या आईची जन्मभूमी नसलेल्या देशात, मी, तुला व तुझ्या आईला फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल. 27 यहोयाकीन, तू ह्या भूमीत परत यायला बघशील. पण तुला येथे परत येऊ दिले जाणार नाही.”
28 कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या (यहोयाकीन) आहे.
कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे तो आहे.
यहोयाकीन व त्याची मुले ह्यांना बाहेर का फेकले जाईल?
परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात येईल?
29 यहूदाच्या हे भूमी, भूमी, भूमी,
परमेश्वराचा संदेश ऐक!
30 परमेश्वर म्हणतो, “यहोयाकीनबद्दल हे लिहून घे.
तो नि:संतान आहे,
‘तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होणार नाही.
त्याचा कोणताही मुलगा दावीदच्या सिंहासनावर बसणार नाही
कोणताही मुलगा यहूदावर राज्य करणार नाही.’”
देवाच्या राज्यात कोण प्रवेश करील?(A)
15 आणि ते आपल्या बालकांनादेखील त्याच्याकडे आणीत यासाठी की त्याने त्यांना स्पर्श करावा. पण जेव्हा शिष्यांनी हे पाहिले तेव्हा ते त्यांना दटावू लागले. 16 पण येशूने बाळकांना त्याच्याकडे बोलाविले आणि म्हणाला, “बालकांना मजकडे येऊ द्या. त्यांना अडवू नका. कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. 17 मी खरोखर तुम्हांला सांगतो, जो कोणी देवाच्या राज्याचा बालकासारखा स्वीकार करीत नाही. त्याचा स्वर्गात प्रवेश होणार नाही.”
2006 by World Bible Translation Center