Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे मास्कील तो गुहेत असतानाची प्रार्थना.
142 मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन.
मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
2 मी परमेश्वराला माझ्या समस्यांबद्दल सांगेन.
मी परमेश्वराला माझ्या संकटांबद्दल सांगेन.
3 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे
मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे.
पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.
4 मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत.
पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही.
मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.
5 म्हणून मी परमेश्वराकडे मदतीची याचना करतो.
परमेश्वरा, तूच माझी सुरक्षित जागा आहेस तूच मला जगू देऊ शकतोस.
6 परमेश्वरा, माझी प्रार्थना
ऐक मला तुझी फार गरज आहे.
जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव.
ते लोक मला फार भारी आहेत.
7 हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर,
म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन.
चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील
कारण तू माझी काळजी घेतलीस.
हबक्कूकची प्रार्थना
3 ही संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथ प्रार्थना आहे
2 परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली.
परमेश्वर तू भूतकाळात केलेल्या सामर्थ्यशाली गोष्टीने मी विस्मयचकित झालो आहे.
आता, आमच्या काळातही तू अशाच मोठ्या गोष्टी घडवाव्यास म्हणून मी प्रार्थना करतो.
कृपया आमच्या आयुष्यातच त्या घडव.
पण तुझ्या खळबळजनक घटनांच्या वेळीही, आमच्यावर दया करण्यास विसरु नकोस.
3 तेमानहून देव येत आहे.
पारान पर्वतावरुन पवित्र परमेश्वर येत आहे.
परमेश्वराच्या तेजाने स्वर्ग व्यापला जातो
आणि स्तुतीने पृथ्वी व्यापली जाते.
4 ते तेज तेजस्वी, चमकदार प्रकाशाप्रमाणे आहे त्याच्या हातातून किरण निघतात.
त्या हातात मोठे सामर्थ्य लपले आहे.
5 आजार त्याच्या आधी गेला.
आणि नाश करणारा त्याच्यामागून गेला.
6 परमेश्वराने स्वतः उभे राहून, पृथ्वीला न्याय दिला
त्याने राष्ट्रांतील लोकांवर नजर टाकली
आणि त्या लोकांचा भीतीने थरकाप झाला.
पुष्काळ वर्षे पर्वत घटृपणे उभे होते
पण त्यांचा चक्काचूर झाला.
अती प्राचीन टेकड्या खाली कोसळल्या
देवाचे नेहमीच हे असे असते.
7 कूशानची गावे संकटात असलेली मी पाहिली.
मिद्यानची घरे भीतीने कापली
8 परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का?
झऱ्यांवर तुझा राग होता का?
समुद्रावर तू संतापला होतास का?
विजयसाठी तुझ्या घोड्यांवर स्वार होताना किंवा रथांवर आरुढ होताना तू रागावला होतास का?
9 त्या वेळीसुध्दा तू इंद्रधनुष्य दाखविलेस.
पृथ्वीवरच्या वंशाबरोबर तू केलेल्या काराचा तो पुरावा होता
रुक्ष भूमीतून नद्या उगम पावल्या.
10 तुला पाहून पर्वत कापले भूमीतून पाणी उसळले.
समुद्राच्या पाण्याने प्रचंड गर्जना केली.
जणू काही त्याने आपली भूमीवरील सत्ता
गमावल्यामुळे ते आकांत करीत होते.
11 चंद्र-सूर्याचे तेज लोपले.
तुझ्या विजांचा तेजस्वी लखलखाट पाहून त्यांनी चमकणे सोडून दिले
त्या विजा म्हणजे जणू काही हवेत फेकलेले बाण व भाले होते.
12 रागाच्या भरात, तू पृथ्वी पायाखाली तुडविलीस
आणि राष्ट्रांना शिक्षा केलीस.
13 तू, तुझ्या माणसांच्या, रक्षणासाठी आलास.
तू निवडलेल्या राजाला, विजयकाडे नेण्यासाठी आलास.
रंकापासून रावापर्यंतच्या,
प्रत्येक दुष्ट घरातील प्रमुखाला
तू ठार मारलेस.
14 शत्रू-सैनिकांना थोपविण्यासाठी
तू मोशेच्या काठीचा उपयोग केलास.
ते सैनिक,
प्रचंड वादळाप्रमाणे, आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले.
गरीब माणसाला एकांतात लुटावे,
तसा सहज आमचा पाडाव करता येईल असे त्यांना वाटले.
15 पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस
त्यामुळे समुद्र घुसळला गेला.
16 ही गोष्ट ऐकताच, मला कंप सुटला.
मी मोठ्याने किंचाळलो
मी अतिशय दुर्बल झाल्याचे मला जाणवले.
मी जागच्या जागी नुसताच थरथर कापत उभा राहिलो.
म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची वाट पाहीन शत्रू आमच्यावर हल्ला करील.
5 जरी तुम्हांला या गोष्टी माहीत असल्या तरी मला तुम्हांला आठवण करुन द्यावीशी वाटते की, ज्या प्रभूने आपल्या लोकांना एकदा इजिप्त देशातून सोडवून आणल्यानंतर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे नाकारले; अशांचा त्याने नंतर नाश केला, 6 तसेच ज्या देवदूतांनी आपली सार्वभौम सत्ता टिकवली नाही, परंतु आपली रहाण्याची जागा सोडून दिली, त्यांची देखील तुम्हाला आठवण करुन द्यायला पाहिजे. देवाने त्यांना सर्वकालच्या बंधनांनी जखडून काळोखात ठेवले यासाठी की शेवटच्या महान दिवशी त्यांचा न्याय करता यावा. 7 त्याचप्रमाणे, या देवदूतांसारखीच सदोम व गमोरा आणि त्या शहराच्या आसपासच्या नगरांनी लैंगिक अनीतीचे आचरण केले आणि अस्वभाविक लैंगिक संबंधांच्या मागे ती लागली. अनंतकाळच्या अग्निच्या शिक्षेसाठी ती राखून ठेवली आहेत. एक उदाहरण म्हणून ती आपल्यासमोर ठेवली आहेत. 8 अगदी तशाच प्रकारे, हे लोक जे तुमच्या गटात आले ते स्वप्नांनी बहकले व त्यांनी आपली शरीरे विटाळली आहेत. ते प्रभूचा अधिकार बाजूला ठेवतात व ते गौरवी थोरामोठ्यांविरुद्ध (देवदूतांविरुद्ध) निंदानालस्तीची भाषा वापरतात. 9 मीखाएल जो मुख्य देवदूत, याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाबरोबर वाद घातला तेव्हा त्यानेसुद्धा त्याच्याविरुद्ध अपमानस्पद आरोप करण्याचे धाडस केले नाही. तो फक्त म्हणाला, “प्रभू तुला धमकावो.”
10 पण हे लोक, ज्या गोष्टी त्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात. आणि जनावरासारखे केवळ मूळ स्वभावाला अनुसरुन जे काही त्यांना समजते. अगदी त्याच गोष्टीमुळे ते नाश पावतात. 11 या लोकांसाठी हे फार वाइट आहे! काईनाने जो मार्ग धरला तोच यांनी धरलेला आहे. आपला फायदा व्हावा म्हणून ते बलामाप्रमाणे गोंधळून मोकाट धावत सुटले आहेत आणि कोरहाच्या बंडाळीत भाग घेणाऱ्या लोकांचा नाश झाला तसाच या लोकांचा देखील नाश होत आहे.
12 हे लोक तुमच्या भातामध्ये दडलेले धोकादायक खडे, असल्यासारखे आहेत. ते खुशाल तुमच्याबरोबर जेवणखाणे करतात, ते फक्त स्वतःच चरत राहाणारे असे मेंढपाळ आहेत, ते पाणी नसलेल्या ढगांसारखे असून ते वाऱ्यामुळे वाहवत जातात. ते लोक म्हणजे हिवाळ्यातील फळहीन व समूळ उपटली गेलेली आणि दोनदा मेलेली झाडे आहेत. 13 ते लोक आपल्या लज्जास्पद कामामुळे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांप्रमाणे आहेत, ते जणू काळ्याकुटृ अंधारात दडलेले तारे असे आहेत.
14 हनोख, आदामापासूनचा सातवा मनुष्य यानेसुद्धा या लोकांविषयी असेच भाकीत केले आहे: “पाहा हजारो पवित्र देवदूतांसह प्रभु येत आहे. 15 तो अखिल जगातील लोकांचा न्याय करील आणि सर्व लोकांना त्यांनी केलेल्या अधर्माच्या कामासाठी आणि देवाची चाड न बाळगणाऱ्या पापी लोकांनी त्याच्याविरुद्ध जे कठोर, वाईट शब्द आपल्या तोंडावाटे काढले त्याकरीता तो त्यांना दोषी ठरवील.”
16 हे लोक कुरकुर करणारे व दोष दाखविणारे आहेत, ते आपल्या वासनांप्रमाणे चालणारे आणि आपल्या तोंडाने बढाया मारणारे लोक आहेत, ते आपल्या फायद्यासाठी इतरांशी तोंडपूजेपणा करतात.
सावधानतेचा इशारा आणि करावयाच्या गोष्टी
17 पण, तुम्ही प्रियजनहो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेले शब्द आठवा. 18 त्यांनी सांगितले, “काळाच्या शेवटी देवाविषयी थट्टेने बोलणारे लोक असतील, ते त्यांच्या स्वतःच्याच अधार्मिक इच्छांच्या मागे जातील.” 19 असे लोक फूट पाडतात. ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे चालतात. त्यांना आत्मा नाही.
20 पण तुम्ही प्रिय मित्रांनो, आपल्यापवित्र शिकविण्यात आलेल्या विश्वासात परस्परांना आध्यात्मिक रीतीने बळकट करा. पवित्र आत्म्याने युक्त होऊन प्रार्थना करा. 21 आणि तुम्हांला अनंतकाळच्या जीवनात घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेची वाट पाहत, देवाच्या प्रीतीत स्वतःला राखा.
2006 by World Bible Translation Center