Revised Common Lectionary (Semicontinuous)
27 “असे दिवस येतील,” हा परमेश्वराचा संदेश आहे. “की तेव्हा मी यहूदाच्या व इस्राएलच्या घराण्यांची वृद्धी होण्यास मदत करीन. मी त्यांच्या मुलांची व गुराढोरांचीही वृद्धी होण्यास मदत करीन. हे सर्व जणू काही झाडे लावून त्याची निगा राखण्यासारखे असेल. 28 पूर्वी मी यहूदा आणि इस्राएल यांच्यावर लक्ष ठेवले. व त्यांना उपटून काढण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहिली मी त्यांना फाडून काढले. मी त्यांचा नाश केला. मी त्यांच्यावर खूप संकटे आणली. पण आता, त्यांनी पुन्हा उभे राहावे व सामर्थ्यवान व्हावे म्हणून लक्ष ठेवीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
29 “आई-वडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली,
‘पण त्याची चव मात्र मुलांना चाखावी लागली.
ही म्हण लोक पुन्हा कधीही वापरणार नाहीत.’
30 प्रत्येकजण आपल्या पापाने मरेल. जो आंबट द्राक्षे खाईल, तोच त्याची चव चाखील.”
नवा करार
31 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “मी इस्राएलच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करण्याची वेळ येत आहे. 32 मी त्यांच्या पूर्वजांशी केलेल्या कराराप्रमाणे तो असणार नाही. जेव्हा मी त्यांना हाताला धरुन मिसरच्या बाहेर आणले होते, तेव्हा तो करार केला होता. तेव्हा मी त्यांचा स्वामी होतो. पण त्यांनी त्या कराराचा भंग केला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
33 “भविष्यात, मी इस्राएलच्या लोकांबरोबर पुढीलप्रमाणे करार करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी माझी शिकवण त्यांच्या मनावर बिंबवीन आणि त्यांच्या हृदयावर कोरीन. मी त्यांचा देव असेन व ते माझे लोक असतील. 34 लोकांना, त्यांच्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना परमेश्वराची ओळख करुन द्यावी लागणार नाही. का? कारण सर्वजण, लहानापासून थोरापर्यंत राजापासून रंकापर्यंत, मला ओळखत असतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना क्षमा करीन. मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”
मेम
97 परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते.
मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात.
तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
99 मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे.
कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
100 जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त
कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो.
101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून
दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
102 परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस
म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.
103 माझ्या तोंडात तुझे शब्द
मधापेक्षाही गोड आहेत.
104 तुझी शिकवण मला शहाणा करते.
त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.
14 पण तुझ्या बाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या तू तशाच पुढे चालू ठेव. ती सत्ये ज्या कोणापासून तू शिकलास ते तुला ठाऊक आहे. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतोस. 15 तुला माहीत आहे की, तू आपल्या अतिबाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्र वचनांची माहिती आहे. त्यांच्या ठायी तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे. 16 प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो सत्य समजण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. 17 यासाठी की, देवाचा माणूस प्रवीण होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
4 देवासमोर आणि ख्रिस्त येशूसमोर मी तुला गांभीर्याने आज्ञा करतो, जे जिवंत आहेत व जे मेलेले आहेत त्यांचा येशू ख्रिस्त हाच न्याय करणार आहे. येशू ख्रिस्ताचे राज्य व त्याचे परत येणे याविषयी घोषणा कर. मी तुला देवासमोर व ख्रिस्तसमोर ही आज्ञा करतो. 2 वचन गाजवीत राहा. सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्याही वेळी तुझे कार्य करण्यास तयार राहा. लोकांना जे करायचे आहे, त्याविषयी त्यांची खात्री पटव. जेव्हा ते चुका करतील तेव्हा त्यांना सावध कर; लोकांना उत्तेजन दे. आणि हे सर्व काळजीपूर्वक शिक्षण देण्याने व मोठ्या सहनशीलतेने कर.
3 मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण ऐकण्याची इच्छी धरणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील, त्यांची कानउघडणी कर. 4 सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते भाकड कथांकडे लावतील. 5 पण तुझ्याबाबतीत स्वतः सावधानतेने वाग, दु:ख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
देव त्याच्या लोकांना उत्तर देईल
18 त्यांनी नेहमी आशा न सोडता प्रार्थना करावी व ती करण्याचे कधीच सोडू नये हे शिकविण्यासाठी त्याने त्यांना एक बोधकथा सांगितली. 2 तो म्हणाला, “एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे लोकांना मानही देत नसे. 3 त्या नगरात एक विधवा होती. ती वारंवार येत असे व न्यायाधीशाला म्हणत असे, ‘माझ्या विरोधकांविरुद्ध मला न्याय मिळेल असे बघा!’ 4 काही काळ त्याची इच्छा नव्हती पण शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी जरी देवाला भीत नाही व लोकांना मान देत नाही. 5 तरीही ती विधवा मला त्रास देत असल्याने तिला न्याय मिळेल असे मी करतो, यासाठी की ती वारंवार येऊन मला बेजार करणार नाही.’”
6 मग प्रभु म्हणाला, “अनीतिमान न्यायाधीश काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या. 7 आणि मग जे देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करावयास वेळ लावील काय? 8 मी तुम्हांस सांगतो, तो त्यांना न्याय देईल. तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येतो, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
2006 by World Bible Translation Center