Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 102:1-17

दु:खी माणसाची प्रार्थना तो अगदी दुबळा असतो आणि त्याला त्याची कैफियत परमेश्वरासमोर मांडायची असते तेव्हाचे स्तोत्र.

102 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि
    माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस.
    माझ्याकडे लक्ष दे.
    मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.
माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे.
    हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
माझी शक्ती निघून गेली आहे.
    मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे.
    मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो.
माझ्या दुखामुळे माझे वजन कमी होत आहे.
मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे.
    जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे.
मी झोपू शकत नाही.
    मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.
माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात.
    ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
माझे अन्न हे माझे सर्वांत मोठे दु:ख आहे.
    माझे अश्रू माझ्या पेयात पडतात.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस.
    तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.

11 दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ जवळ संपत आले आहे.
    मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे.
12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील
    तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील.
    तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात.
    त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील.
    देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक
    पुन्हा त्याचे गौरव बघतील.
17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल.
    देव त्यांची प्रार्थना ऐकेल.

यिर्मया 29:8-23

सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “तुमचे संदेष्टे आणि जादू करणारे लोक ह्यांच्याकडून फसू नका. त्यांना पडलेली स्वप्ने ऐकू नका. ते खोटा उपदेश करीत आहेत, व तो संदेश असून तो मी पाठविल्याचे सांगत आहेत. पण मी त्यांना पाठविलेला नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

10 परमेश्वर असे म्हणतो, “सत्तर वर्षापर्यंत बाबेल सामर्थ्यशाली राहील. त्यानंतर बाबेलमध्ये राहणाऱ्या तुम्हा लोकांकडे मी येईन. तुम्हाला यरुशलेमला परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन. 11 तुमच्याविषयीच्या योजना मला माहीत असल्याने मी असे म्हणतो.” हा परमेश्वराचा संदेश आहे “तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. तुम्हाला दु:खविण्याचा माझा बेत नाही. तुम्हाला आशा आणि उज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे. 12 मग तुम्ही माझा धावा कराल. माझ्याकडे याल. माझी प्रार्थना कराल. मग मी तुमच्या हाकेला ओ देईन. 13 तुम्ही मला शोधाल आणि तुम्ही जेव्हा मनापासून मला शोधाल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन. 14 मी स्वतःला तुमच्याकडून सापडवून घेईल.” हा परमेश्वराचा संदेश आहे “मी तुमची कैदेतून सुटका करीन. मी तुम्हाला ही जागा सोडायला लावली आता मी तुम्हाला ज्या ज्या राष्ट्रांत आणि प्रदेशात पाठविले होते तेथून गोळा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “आणि जेथून तुम्हाला मी कैदी म्हणून पकडून दूर नेण्यास भाग पाडले होते त्या जागी परत आणीन.”

15 “आम्हाला बाबेलमध्ये परमेश्वराने संदेष्टे दिले असे कदाचित् तुम्ही म्हणू शकाल.” 16 पण बाबेलमध्ये ज्यांना आणले गेले नाही, त्या तुमच्या आप्तांविषयी परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो. ह्या गोष्टी दावीदाच्या सिंहासनावर आता बसलेल्या राजासाठी व यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या लोकांसाठी आहेत. 17 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या लोकांविरुद्ध मी लढाई उपासमार व रोगराई या आपत्ती पाठवीन. मी त्यांची स्थिती, खाण्यास अयोग्य असलेल्या नासक्या अंजिरासारखी करीन. 18 मी अजूनही यरुशलेममध्ये राहत असलेल्या लोकांचा लढाई, उपासमार व भयंकर रोगराई ह्यांनी पाठपुरावा करीन. ह्यामुळे लोकांची जी स्थिती होईल ती जगातील राज्यांचा भीतीने थरकाप उडवेल. ज्या राष्ट्रांत जायला त्यांना मी भाग पाडीन, तेथे तेथे त्यांच्याकडे एक शाप म्हणून पाहिले जाईल. ह्या लोकांची स्थिती पाहून ते विस्मयाने सुस्कारे सोडतील. 19 यरुशलेममधील लोकांनी माझे ऐकले नाही, म्हणून मी असे घडवून आणीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे “मी माझा संदेश पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाठविला. माझा संदेश देण्यासाठी मी माझ्या सेवकांना, माझ्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्या लोकांनी ऐकले नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे. 20 “तुम्ही कैदी आहात. मी तुम्हाला बळजबरीने यरुशलेम सोडायला लावले व बाबेलला पाठविले. म्हणून परमेश्वराचा संदेश ऐका.”

21 कोयालाचा मुलगा अहाब व मासेयाचा मुलगा सिद्कीया यांच्याविषयी सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “ह्या दोघांनी तुम्हाला खोटा संदेश दिला आहे व तो संदेश माझ्याकडून आला असे त्यांनी सांगितले. पण ते खोटे बोलले. मी त्या दोघा संदेष्ट्यांना, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन आणि बाबेलचे कैदी असलेल्या तुम्हा सर्व लोकांसमोर तो त्यांना ठार करील 22 यहूदी कैदी दुसऱ्याचे वाईट चिंततांना त्या दोघांच्या नावाचा उदाहरण म्हणून उपयोग करतील. ते म्हणतील, ‘सिद्कीया व अहाब यांच्याप्रमाणे परमेश्वर तुमचे वाईट करो! बाबेलच्या राजाने त्या दोघांना जाळले.’ 23 त्या दोघा संदेष्ट्यांनी इस्राएलमध्ये फार वाईट कृत्ये केली. शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर त्यांनी व्यभिचार केला. त्यांनी खोटे सांगितले आणि माझा संदेश खोटे असल्याचे लोकांना सांगितले मी त्यांना ह्या गोष्टी करायला सांगितल्या नव्हत्या त्यांनी काय केले आहे, ते मला माहीत आहे मी त्याला साक्षी आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 26:24-29

पौल अग्रिप्पाचे मन वळविण्याचा प्रयत्न करतो

24 पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्याला मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे!”

25 पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे. 26 येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे, आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो. त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते. मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही. 27 अग्रिप्पा महाराज, भविष्यावाद्यांनी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे हे मला नक्की माहीत आहे.”

28 यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?”

29 पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंति आहे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center