Revised Common Lectionary (Semicontinuous)
137 आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो
आणि सियोनची आठवण काढून रडलो.
2 आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या.
3 बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले.
त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले.
त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
4 परंतु परक्या देशात आम्ही
परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही.
5 यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो,
तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.
6 यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो,
तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते.
मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.
7 यरुशलेम नेहमी माझा सर्वांत
मोठा आनंद असेल असे मी वचन देतो.
8 बाबेल, तुझा नाश होईल.
जो तुला तुझ्या योग्य अशी शिक्षा देईल त्याला देव आशीर्वाद देईल.
तू जसा आम्हाला दु:ख देतोस तसेच दु:ख जो तुला देईल त्याला धन्यवाद.
9 जो माणूस तुझी मुले धरतो आणि
त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो.
परमेश्वराकडे प्रार्थना
5 परमेश्वरा, आमचे काय झाले ते लक्षात ठेव.
आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.
2 आमचा देश परक्यांच्या हातात गेला आहे.
आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.
3 आम्ही अनाथ झालो.
आम्हाला वडील नाहीत.
आमच्या आयांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.
4 आम्हाला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते.
आम्ही वापरत असलेल्या लाकडाला पैसे मोजावे लागतात.
5 आमच्या मानेवर सक्तीने जोखड ठेवले जाते.
आम्ही दमून जातो.
पण आम्हाला विश्रांती नाही.
6 पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर
व अश्शूर यांच्याबरोबर करार केला.
7 आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले.
आता ते नाहीत.
पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.
8 गुलाम आमचे राज्यकर्ते झाले.
त्यांच्यापासून आम्हाला कोणीही वाचवू शकत नाही.
9 अन्नासाठी आम्ही जीवाची बाजी लावतो.
वाळवंटात तलवारधारी माणसे असतात.
10 आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत.
भुकेमुळे आम्हाला ताप चढला आहे.
11 शत्रूंनी सियोनमधील स्त्रियांवर बलात्कार केला.
यहुदातील गावांमधील स्त्रियांवर त्यांनी बलात्कार केले.
12 शत्रूंने आमच्या राजपुत्रांना फाशी दिली.
त्याने आमच्यातील वृध्दांचा मान ठेवला नाही.
13 आमच्या तरुणांना शत्रूने गिरणीत धान्य दळायला लावले.
ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.
14 वृध्द आता नगरीच्या द्वारांत बसत नाहीत.
तरुण गायनवादन करीत नाहीत.
15 आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे.
आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
16 आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे.
आणि वाईट गोष्टी घडल्या.
17 ह्या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे.
आम्हाला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.
18 सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत.
सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.
19 पण परमेश्वरा, तुझी सत्ता चिरंतन आहे.
तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.
20 परमेश्वर आम्हाला कायमचा विसरला आहेस असे दिसते.
तू आम्हाला दीर्घकाल सोडून गेला आहेस.
21 परमेश्वरा, आम्हाला तुझ्याकडे परत ने.
आम्ही आनंदाने तुझ्याकडे येऊ.
आमचे जीवन पूर्वीसारखे कर.
22 तू आमच्यावर खूप रागावला होतास!
तू आमचा पूर्णपणे त्याग केलास का?
येशू म्हणाला अंजिराचा झाड़ मरेल(A)
12 दुसऱ्या दिवशी ते बेथानी सोडून जात असताना येशूला भूक लागली. 13 त्याने दूर असलेल्या व पानांनी भरलेल्या अंजिराच्या झाडाकडे पाहिले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्याला पानाशिवाय काही आढळले नाही. कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता. 14 नंतर तो त्याला म्हणाला, “यापूढे तुझे फळ कोणीही कधीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले.
येशू विश्वासाचे सामर्थ्य दाखवितो(A)
20 सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले. 21 पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “गुरूजी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
22 येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. 23 मी तुम्हांस खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात शंका न धरता, त्याच्या शब्दाप्रमाणे घडेल असा विश्वास धरील तर त्याच्यासाठी तसेच घडेल. 24 या कारणास्तव मी तुम्हांस सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हांला मिळेल.
2006 by World Bible Translation Center