Revised Common Lectionary (Semicontinuous)
यरुशलेम तिच्या नाशाबद्दल रडते
1 एके काळी काळी यरुशलेम लोकांनी गजबजलेली नगरी होती.
पण आता ती अगदी ओसाड झाली आहे.
यरुशलेम जगातील मोठ्या नगरांमधील एक होती.
पण आता ती वधवेप्रमाणे झाली आहे.
एके काळी ती नगरांमधील राजकुमारी होती.
पण आता तिला दासी केले गेले आहे.
2 रात्री ती खूप दु:काने रडतेतिच्या गालांवर अश्रु ओघळतात.
पण तिचे सांत्वन करणारे नाही.
खूप राष्ट्रांशी तिची मैत्री होती.
पण आता तिचे दु:ख हलके करणारे कोणीही नाही.
तिच्या सर्व मित्रांनी तिच्याकडे पाठ फिरविली.
तिचे मित्रच तिचे शत्रू झाले.
3 यहूदाने फार सोसले.
नंतर यहूदाला कैद करून परमुलुखांत नेले गेले.
यहूदा इतर राष्ट्रंमध्ये जगते,
पण तिला आराम मिळाला नाही.
तिचा पाठलाग करणाऱ्यांनी तिला पकडले.
अरूंद दरीत त्यांनी तिला गाठले.
4 सियोनचे रस्ते दु:खी आहेतकारण आता पूर्वकाळासाठी
कोणीही कधीही सियोनकडे येत नाही.
सियोनची सर्व दारे नष्ट केली गेली.
तिचे याजक उसासे टाकतात.
तिच्या तरुणींना पकडून नेले आहे
ह्य सर्वामुळे ती दु:खी कष्टी झाली आहे.
5 यरुशलेमच्या शत्रूंची जीत झाली आहे.
त्यांना यश मिळाले आहे.
परमेश्वराने तिला शिक्षा केली म्हणून असे झाले.
त्याने यरुशलेमच्या पापांबद्दल तिला शिक्षा केली.
तिची मुले दूर निघून गेली.
त्यांचे शत्रू त्यांना पकडून घेऊन गेले.
6 सियोनकन्येचे सौंदर्य सरले.
तिचे राजपुत्र हरणांसारखे झाले.
चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरणांसारखे ते झाले.
ते हतबल होऊन पळाले.
त्यांचा पाठलाग करणाऱ्यांपासून ते लांब पळाले.
19 परमेश्वरा, लक्षात ठेव.
मी फार दु:खी आहे, व मला घर नाही.
तू दिलेल्या कडू विषाचे (शिक्षेचे) स्मरण कर.
20 मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे.
म्हणूनच मी दु:खी आहे.
21 पण मी पुढील काही गोष्टींचा विचार
केला की मला आशा वाटते.
22 परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही.
परमेश्वराची करुणा चिरंतन आहे.
23 ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते.
परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे.
24 मी मनाशी म्हणतो, “परमेश्वर माझा देव आहे.
म्हणूनच मला आशा वाटेल.”
25 परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर
व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो.
26 परमेश्वराने आपले रक्षण करावे
म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले.
137 आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो
आणि सियोनची आठवण काढून रडलो.
2 आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या.
3 बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले.
त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले.
त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
4 परंतु परक्या देशात आम्ही
परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही.
5 यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो,
तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.
6 यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो,
तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते.
मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.
7 यरुशलेम नेहमी माझा सर्वांत
मोठा आनंद असेल असे मी वचन देतो.
8 बाबेल, तुझा नाश होईल.
जो तुला तुझ्या योग्य अशी शिक्षा देईल त्याला देव आशीर्वाद देईल.
तू जसा आम्हाला दु:ख देतोस तसेच दु:ख जो तुला देईल त्याला धन्यवाद.
9 जो माणूस तुझी मुले धरतो आणि
त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो.
1 येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने पाठविलेला ख्रिस्त प्रेषित पौल याजकडून,
2 प्रिय मुलगा तीमथ्य याला,
देवपिता आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा दया व शांति असो.
आभारप्रदर्शन आणि उत्तेजन
3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने भक्ती करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो. 4 माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो. यासाठी की मी आनंदाने भरूने जावे. 5 तुझ्यातील प्रामाणिक विश्वासाचे मला स्मरण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता. आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे. 6 या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, जेव्हा मी माझे हात तुझ्यावर ठेवले तेव्हा देवाच्या दानाची जी ज्योत तुला मीळाली ती तेवत ठेव. 7 कारण देवाने आम्हांला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ति देणारा आत्मा दिला आहे.
8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर माझ्याबरोबर सुवार्तेसाठी दु:ख सोस. देव तुला जे सामर्थ्य देतो त्याच्या साहाय्याने दु:ख सोस.
9 त्याने आम्हांला तारले आणि त्याने आम्हांला समर्पित जीवनासाठी पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा काळाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हांस दिली होती. 10 पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या भूतलावर अवतीर्ण होण्याने प्रगट करण्यात आली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले.
11 मला त्या सुवार्तेचा उपदेशक, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते. 12 आणि या कारणांमुळे मीसुद्धा दु:ख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील.
13 माझ्याकडून ऐकून घेतलेल्या सत्य शिक्षणाचा गाभा दृढ धर. आणि ख्रिस्त येशूमध्ये सापडणाऱ्या विश्वासाने व प्रीतीने ते कर. 14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
तुमचा विश्वास किती मोठा आहे?
5 मग शिष्य प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.”
6 प्रभु म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, ‘मुळासकट उपटून समुद्रात लावले जा.’ आणि ते तुमची आज्ञा पाळील.
चांगले सेवक व्हा
7 “समजा, तुमच्यापैकी एकाला एक सेवक आहे. व तो शेत नांगरीत आहे किंवा मेंढरे राखीत आहे. जेव्हा तो शेतातून परत येतो, तुम्ही त्याला, ‘ताबडतोब ये आणि जेवायला बैस’ असे म्हणाला का? 8 उलट तुम्ही असे म्हणणार नाही का, ‘माझे भोजन तयार कर. आणि कामाचे कपडे घालून माझे खाणेपिणे चालू असताना माझी सेवा कर. त्यानंतर तू खाऊ पिऊ शकतोस?’ 9 ज्या गोष्टी करण्याबद्दल तुम्ही नोकराला आज्ञा करता ते केल्याबद्दल त्याचे आभार तुम्ही मानता काय? 10 तुमच्या बाबतीतही हे तसेच आहे: जेव्हा तुम्हांला करण्यास सांगितलेली सर्व कामे तुम्ही केल्यावर असे म्हटले पाहिजे, ‘आम्ही कोणत्याही मानास पात्र नसलेले सेवक आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.’”
2006 by World Bible Translation Center