Revised Common Lectionary (Semicontinuous)
91 तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता.
तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
2 मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला,
माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”
3 देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून
आणि भयानक रोगांपासून वाचवेल.
4 तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता.
पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा
तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.
5 रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल
आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.
6 अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक
आजाराची तुम्हाला भीतीवाटणार नाही.
14 परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन.
जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
15 माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो.
ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन.
मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
16 मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.
आणि त्यांना वाचवीन.”
23 हा परमेश्वराचा संदेश आहे,
“मी देव येथे आहे पण मीच देव
दूरवरच्या स्थळीही असतो.
24 एखादा माणूस माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीलही,
पण त्याला शोधणे मला अगदी सोपे आहे.
का? कारण मी स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांमध्ये सगळीकडे आहे.”
परमेश्वर असे म्हणाला. 25 “काही संदेष्टे माझ्या नावाने खोटा उपदेश करतात. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे!’ मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे. 26 हे किती काळ चालणार? ते खोट्याचाच विचार करतात आणि त्याच खोट्या, असत्य गोष्टी लोकांना शिकवितात. 27 हे संदेष्टे, यहूदाच्या लोकांना माझे विस्मरण व्हावे असा प्रयत्न करीत आहेत. एकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून ते हे करीत आहेत. त्याचे पूर्वज जसे माझे नाव विसरले, तसेच आता ह्या लोकांनी मला विसरावे म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. ह्यांचे पूर्वज मला विसरले आणि त्यांनी खोटे दैवत बआलची पूजा केली, 28 काडी म्हणजे गहू नव्हे.तसेच त्या संदेष्ट्यांची स्वप्ने म्हणजे माझा संदेश नव्हे.जर एखाद्या माणसाला त्याच्या स्वप्नाबद्दल सांगायचे असेल, तर सांगू द्या. पण जो कोणी माझा संदेश ऐकतो, त्याला सत्य सांगू द्यावे. 29 माझा संदेश अग्नीप्रमाणे आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे आहे.”
30 “म्हणून मी खोट्या संदेष्ट्यांविरुध्द आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “हे संदेष्टे एकमेकांकडून माझे शब्द चोरतात. [a] 31 मी त्यांच्याविरुद्ध आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते त्यांचे स्वतःचे शब्द वापरतात आणि ते माझेच शब्द आहेत असे भासवितात. 32 खोट्या स्वप्नांबद्दल सांगणाऱ्या खोट्या संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “ते त्यांच्या खोट्या बोलण्याने व चुकीच्या शिकवणुकीने माझ्या लोकांना चुकीच्या मार्गांने नेतात. लोकांना शिकविण्यासाठी मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना माझ्यासाठी काही करण्याची आज्ञा कधीही दिलेली नाही. ते यहूदाच्या लोकांना मुळीच मदत करु शकत नाहीत.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
मरणाकडून जीवनाकडे
2 पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता. 2 ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे. 3 एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तंता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो.
4 पण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतिने त्याने आमच्यावर प्रेम केले. 5 आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.) 6 देवाने आम्हांला ख्रिस्ताबरोबर नविन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत. 7 देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी.
8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. 9 आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारु नये. 10 कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.
2006 by World Bible Translation Center