Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 106:40-48

40 देव त्याच्या माणसांवर रागावला.
    देवाला त्यांचा कंटाळा आला.
41 देवाने त्याच्या माणसांना इतर देशांना देऊन टाकले.
    देवाने त्याच्या शत्रूंना त्यांच्यावर राज्य करु दिले.
42 देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले
    आणि त्यांचे आयुष्य कठीण केले.
43 देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले.
    पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले.
    देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.
44 पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती
    तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली
आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.
45 देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली
    आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.
46 इतर देशांनी त्यांना कैदी बनवले
    पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.
47 परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून
    आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू
आणि तुझे गुणगान करु.
48 परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या.
    देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे.
आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन!”

परमेश्वराची स्तुती करा.

यिर्मया 9:12-26

12 ह्या गोष्टी समजू शकण्याइतका सुज्ञ कोणी आहे का?
    परमेश्वराकडून शिकविला गेलेला कोणी आहे का?
परमेश्वराच्या संदेशाचे स्पष्टीकरण कोणी करु शकेल का?
    ह्या भूमीचा नाश का झाला?
    जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली?

13 परमेश्वराने ह्या प्रश्नांची उत्तरे दिली.
तो म्हणाला, “माझ्या शिकवणुकीला अनुसरायचे यहूदाच्या लोकांनी सोडून दिले.
मी त्यांना पाठ दिले.
    पण त्यांनी ऐकायचे नाकारले.
    ते माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागले नाहीत.
14 यहूदातील लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे
    जगले ते दुराग्रही होते.
बआल या खोट्या देवाला ते अनुसरले.
    त्यांच्या वडिलांनी त्यांना खोट्या देवांना अनुसरायला शिकविले.”

15 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो,
“लवकरच मी यहूदाच्या लोकांना कडू अन्न खायला लावीन,
    विषारी पाणी प्यायला लावीन.
16 मी यहूदाच्या लोकांना दुसऱ्या राष्ट्रांतून विखरु टाकीन
त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल
    ऐकले नव्हते अशा परक्या देशांत ते राहतील.
मी तलवारी घेतलेले लोक पाठवीन.
    ते यहूदाच्या लोकांना ठार मारतील.
    सर्व लोकांचा नाश होईपर्यंत ते संहार करतील.”

17 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो,
“आता या गोष्टींचा विचार करा.
    प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्या भाडोत्री बायकांना बोलवा.
    त्या कामात वाकबगार असलेल्या स्त्रियांना बोलवा.
18 लोक म्हणतात,
‘त्या बायकांना लवकर येऊन आमच्यासाठी रडू द्या
मग आमचे डोळे भरुन येतील
    आणि अश्रूंचा पूर येईल.’

19 “सियोन मधून मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकायला येतो आहे.
    ‘आपला खरोखरच नाश झाला
    आपली खरोखरच अप्रतिष्ठा झाली.
आता आपण आपली भूमी सोडलीच पाहिजे. कारण आपली घरे नष्ट केली गेली.
    आता ती दगडधोंड्यांचा ढिगारा झाली आहेत.’”

20 आता, यहूदातील स्त्रियांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका.
    परमेश्वराच्या तोंडचे शब्द ऐका.
देव म्हणतो, “तुमच्या मुलींना मोठ्याने रडायला शिकवा.
    प्रत्येक बाईला शोकगीत गाता आलेच पाहिजे.
21 ‘मृत्यू आला आहे.
तो चढून खिडक्यातून आत आला.
    मृत्यू राजवाड्यात आला.
रस्त्यांवर खेळणाऱ्या आमच्या मुलांकडे आला.
    सार्वजनिक ठिकाणी जमणाऱ्या तरुणांकडे तो आला.’

22 “यिर्मया, या गोष्टी सांग:
परमेश्वर म्हणतो, ‘मृत शरीरे खताप्रमाणे शेतांत पडतील.
    शेतकऱ्यांनी कापलेल्या धान्याप्रमाणे ती जमिनीवर पडतील.
    पण त्यांना गोळा करणारे कोणीही नसेल.’”
23 परमेश्वर म्हणतो,
“शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल,
    बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल
व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल
    बढाई मारु नये.
असे परमेश्वर म्हणतो.
24 पण कोणाला बढाईच मारायची असेल तर त्याला ह्या गोष्टीसाठी मारु द्या.
    तो मला ओळखायला शिकला म्हणून बढाई मारु द्या.
मी परमेश्वर आहे,
    मी कृपाळू व न्यायी आहे,
    जगात चांगल्या गोष्टी मी करतो
    आणि त्या गोष्टी मला आवडतात हे कळल्याबद्दल त्याला बढाई मारु द्या.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.

25 परमेश्वराचा संदेश असा आहे “ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याची वेळ येत आहे. 26 मिसर, यहुदा, अदोम, अम्मोन, मवाब यातील व वाळवंटात राहणाऱ्या इतर लोकांबद्दल मी बोलत आहे. ह्या देशातील लोकांची शारीरिक सुंताही खरोखरी झालेली नाही. पण इस्राएलच्या घराण्यातील लोकांच्या ह्दयाची सुंताही झालेली नाही.”

प्रेषितांचीं कृत्यें 4:1-12

पेत्र व योहान यहूदी धर्मसभेपुढे

पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना, काही लोक त्यांच्याकडे आले. त्यातील काही यहूदी याजक, मंदिराचे रक्षण करणाऱ्या शिपायांचा कप्तान व काही सदूकी लोक होते. ते चिडले होते. कारण दोन प्रेषित लोकांना शिकवीत होते. पेत्र व योहान लोकांना शिकवीत होते की, येशूच्या सामर्थ्याने मेलेली माणसे पुन्हा उठतील. यहूदी पुढाऱ्यानी व नियमास्त्र शिक्षकांनी पेत्र व योहानाला धरले व तुरुंगात टाकले. अगोदरच रात्र झाली होती, म्हणून त्यांनी पेत्र व योहान यांना दुसऱ्या दिवसापर्यंत तुरुंगात ठेवले. परंतु पेत्र व योहान यांचा संदेश ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला. विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये सुमारे पाच हजार लोक होते.

दुसऱ्या दिवशी यहूदी लोकांचे पुढारी, वडीलजन, व नियमशास्त्र शिकविणारे शिक्षक यरुशलेममध्ये एकत्र जमले. हन्ना (प्रमख याजक), केफा, योहान आणि अलेक्यांद्र हे तेथे होते. तसेच प्रमुख याजकाच्या घरातील प्रत्येक जण हजर होता. त्यांनी पेत्र व योहान यांना सर्वांसमोर उभे राहण्यास सांगितले, यहूदी पुढाऱ्यांनी पुष्कळ वेळ त्यांना विचारले. “या लंगड्या माणसाला तुम्ही कसे बरे केले? कोणत्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला? कोणाच्या अधिकाराने हे तुम्ही केले?”

मग पेत्र पवित्र आत्म्याने भरला गेला. तो त्यांना म्हणाला, “अहो पुढाऱ्यांनो आणि वडीलधारी लोकांनो; या लंगड्या माणासाच्या बाबतीत जी चांगली गोष्ट झाली त्याबद्दल तुम्ही आम्हांला प्रश्न विचारीत आहात काय? तुम्ही आम्हांला विचारीत आहात का की याला कोणी बरे केले? 10 तुम्ही सर्वांनी आणि यहूदी लोकांनी समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे, ती ही की, नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मनुष्य बरा झाला! तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. देवाने त्याला मरणातून उठविले. हा मनुष्य लंगडा होता, पण आता तो चांगला झाला आहे. आणि येशूच्या सामर्थ्यामुळे तुमच्यासमोर उभा राहू शकत आहे!

11 ‘तुम्ही बांधणारांनी जो दगड नापसंत केला,
    जो पुढे कोनशिल झाला तोच हा येशू होय.’ (A)

12 येशू हा एकमेव आहे जो लोकांना तारु शकेल. त्याचे नाव हेच सामर्थ्य फक्त जगामध्ये आहे जे लोकांना तारण्यासाठी दिले आहे, आमचे तारण येशूद्वारे झालेच पाहिजे!”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center