Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.
139 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस
तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते
तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते.
मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे
ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस.
माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6 तुला जे सर्वकाही माहीत आहे
त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
तू माझी रोज पाहणी केलीस.
त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.
यिर्मयाची तिसरी तक्रार
14 परमेश्वरा, तू मला बरे केलेस,
तर मी पूर्ण बरा होईन.
तू मला वाचविलेस,
तर मी खरोखरच वाचेन.
देवा, मी तुझी स्तुती करतो.
15 यहूदातील लोक मला सतत प्रश्र्न विचारतात.
ते विचारतात, “यिर्मया, परमेश्वराच्या संदेशाचे काय?
तो खरोखरीच खरा ठरतो का ते पाहू या.”
16 परमेश्वरा, मी तुला सोडून पळून गेलो नाही.
मी तुला अनुसरलो.
मी तुला पाहिजे तसा मेंढपाळ बनलो.
तो भयंकर दिवस उजाडावा असे मला वाटत नव्हते.
मी सांगितलेल्या गोष्टी परमेश्वरा तुला माहीतच आहेत.
काय घडत आहे, ते तू पाहतोसच.
17 परमेश्वरा, माझा नाश करु नकोस.
संकटकाळी, मला तुझा आधार वाटतो.
18 लोक मला त्रास देतात.
त्यांना तू खजील कर.
पण माझी निराशा करु नकोस.
त्यांना धाक दाखव
पण मला घाबरवू नकोस
तो भयंकर अरिष्टाचा दिवस माझ्या शत्रूंवर आण
आणि त्यांचा पुन्हा पुन्हा बिमोड कर.
शब्बाथचा दिवस पवित्र मानणे
19 परमेश्वराने मला पुढील गोष्टी सांगितल्या: “यिर्मया, यहूदाचे राजे यरुशलेमच्या ज्या प्रवेशद्वारातून ये-जा करतात, त्या लोकद्वारात जाऊन उभा राहा आणि लोकांना माझा सदेश सांग. मग यरुशलेमच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर.”
20 त्या लोकांना सांग, “परमेश्वराचा संदेश ऐका. यहूदाच्या राजांनो आणि लोकांनो व यरुशलेमच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्वांनो, माझे ऐका. 21 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या आहेतः ‘शब्बाथच्या दिवशी तुम्ही ओझे वाहणार नाही याची काळजी घ्या. त्या दिवशी, यरुशलेमच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका. 22 त्या दिवशी, तुमच्या घरांतून ओझी बाहेर आणू नका. त्या दिवशी कोणतेही काम करु नका. तुम्ही शब्बाथचा दिवस एक पवित्र म्हणून पाळा. तुमच्या पूर्वजांना मी हीच आज्ञा केली होती. 23 पण त्यांनी ती पाळली नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. तुमचे पूर्वज हटवादी होते. मी त्यांना शिक्षा केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांनी माझे ऐकले नाही. 24 पण तुम्ही माझी आज्ञा पाळण्याची काळजी घ्या. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. शब्बाथच्या दिवशी, यरुशलेमच्या प्रदेशद्वारातून, तुम्ही ओझी आणता कामा नये; शब्बाथचे पावित्र्य राखा. कोणतेही काम न करता तुम्ही हे करु शकता.
25 “‘तुम्ही जर ही आज्ञा पाळलीत, तर दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेमच्या प्रदेशद्वारांतून येतील. ते रथांतून आणि घोड्यावरुन येतील. यहूदाचे आणि यरुशलेमचे नेते त्यांच्याबरोबर असतील. यरुशलेममध्ये लोक कायमचे वास्तव्य करतील. 26 यहूदाच्या शहरांतून लोक यरुशलेमला येतील, यरुशलेमच्या आजूबाजूच्या खेड्यातून, बन्यामीनच्या कुळातील लोक ज्या प्रदेशात राहतात, [a] त्या प्रदेशातून, पश्र्चिमेच्या डोंगरपायथ्याच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेवमधून लोक यरुशलेमला येतील, हे सर्व लोक होमार्पण, धान्यार्पण, धूप आणतील आणि कृतज्ञता व्यक्त करतील. ते हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आणतील.
27 “‘पण तुम्ही जर माझे ऐकले नाही अथवा माझी आज्ञा पाळली नाही, तर वाईट गोष्टी घडतील. जर तुम्ही शब्बाथच्या दिवशी ओझे वाहिले, तर तुम्ही त्या दिवसाचे पावित्र्य राखले नाही, असे होईल. मग कधींही विझू न शकणारी आग मी लावीन. यरुशलेमच्या प्रवेशद्वारापासून सुरु झालेली ही आग राजवाडे जाळेपर्यंत जळत राहील.’”
लोक येशूविषयी सहमत होणार नाहीत(A)
34 “असे समजू नका की मी पृथ्वीवर शांती करायला आलो आहे. मी शांति स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. 35 मी फूट पाडायला आलो आहे,
‘म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध
आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध
सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे.
36 सारांश मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील.’ (B)
37 “जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. 38 जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. 39 जो आपला जीव मिळवितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवील.
जे तुमचा आदर-सतकार करतात त्याना देव आशीर्वाद देतो(C)
40 “जी व्यक्ति तुम्हांला स्वीकारते ती व्यक्ति मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठविले त्यालाही स्वीकारते. 41 जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्याला संदेष्ट्याचे प्रतिफल मिळेल, आणि जो धार्मिकाचा स्वीकार त्याच्या धार्मिकतेसाठी करतो, त्याला धार्मिकाचे प्रतिफळ. 42 मी तुम्हांला खरे सांगतो की, जो कोणी शिष्यांच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.”
2006 by World Bible Translation Center