Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.
139 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस
तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते
तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते.
मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे
ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस.
माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6 तुला जे सर्वकाही माहीत आहे
त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
तू माझी रोज पाहणी केलीस.
त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.
14 “आपल्या वचनाची खात्री देताना लोक म्हणतात ‘परमेश्वराचे अस्तित्व जेवढे खरे आहे, तेवढे आपले वचन पक्के आहे. मिसरच्या भूमीतून इस्राएलच्या लोकांची सुटका त्या परमेश्वरानेच केली आहे.’” पण आता देवाचा असा संदेश आहे, “लोक वर म्हटल्याप्रमाणे म्हणणार नाहीत. असा काळ येऊ घातलेला आहे. 15 लोक काहीतरी नवीनच म्हणतील, ‘त्या परमेश्वराचे अस्तित्व खात्रीचे आहे, ज्याने इस्राएलच्या लोकांची उत्तरेतील प्रदेशातून सुटका केली. त्यांना निरनिराळ्या प्रदेशांत पाठवून तेथून त्यांना परत आणणारा तोच एकमेव आहे’ ते असे का म्हणतील? कारण इस्राएलच्या लोकांना मी त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत परत आणीन.
16 “लवकरच मी पुष्कळ कोळ्यांना येथे बोलावीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते कोळी यहूदाच्या लोकांना पकडतील असे झाल्यावर मी पुष्कळ शिकाऱ्यांना आणीन. ते शिकारी प्रत्येक डोंगर, टेकड्या व कपारी यांमधून यहूदाच्या लोकांची शिकार करतील. 17 त्यांची प्रत्येक कृती मला दिसते. यहूदाचे लोक त्यांची कृत्ये माझ्यापासून लपवू शकत नाहीत. त्यांचे पाप माझ्यापासून लपून राहात नाही. 18 ती यहूदाच्या लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल परत फेड करीन. मी यहूदाच्या लोकांना त्याच्या पापांची किंमत दामदुपटीने मोजायला लावीन. त्यांनी माझी भूमी ‘अपवित्र’ केली म्हणून मी असे करीन. त्यांनी भयानक मूर्ती स्थापून माझी भूमी कलंकित केली. मी त्या मूर्तींचा तिरस्कार करतो. पण त्यांनी माझा देशच त्या मूर्तींनी भरुन टाकला.”
परमेश्वराजवळ प्रार्थना
19 परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस.
संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षित स्थान तू आहेस.
जगाच्या सर्व भागांतून राष्ट्रे तुझ्याकडे येतील.
ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांनी खोटे देव जवळ बाळगले.
त्या दीडदमडीच्या मूर्तींची पूजा केली.
पण त्या मूर्तींनी त्यांना काहीही मदत केली नाही.”
20 लोक स्वतःसाठी खरा देव निर्माण करु शकतात का?
नाही. ते फक्त मूर्ती तयार करु शकतात.
पण त्या मूर्ती म्हणजे खरे देव नव्हेत.
21 परमेश्वर म्हणतो “म्हणून त्या मूर्ती बनविणाऱ्या लोकांना मी धडा शिकवीन.
प्रथम मी त्यांना माझ्या शक्तीची व सामर्थ्याची जाणीव करुन देईन.
मग त्यांना कळेल की मीच खरा देव,
मीच खरा परमेश्वर आहे.”
हृदयावर कोरलेला अपराध
17 “यहूदी लोकांची पापे, खोडता येणे शक्य नाही,
अशा ठिकाणी लिहिली आहेत.
ती लोखंडी लेखणीने दगडावर कोरली आहेत.
हिरकणीचे टोक असलेल्या लेखणीने ती पाषाणावर कोरली आहेत.
तो पाषाण म्हणजेच त्यांचे ह्दय होय.
ती पापे वेदीच्या शिंगांवर कोरली आहेत.
2 खोट्या देवांना अर्पण केलेल्या त्या वेदी
त्यांच्या मुलांना आठवतात.
अशेरला अर्पण केलेले लाकडी खांब
त्यांना आठवतात.
टेकडीवरच्या व हिरव्या झाडाखालच्या
त्या वस्तू त्यांना स्मरतात.
3 विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील
त्या वस्तू त्यांना आठवतात
यहूदी लोकांकडे बरीच संपत्ती आहे
ती सर्व मी दुसऱ्या देशांना देईन.
तुम्ही जेथे पूजाआर्चा करता आणि जे पाप आहे,
अशी उच्च स्थाने दुसरे लोक नष्ट करतील.
4 मी तुम्हाला दिलेली भूमी तुम्ही गमवाल.
मी तुमच्या शत्रूंना तुम्हाला गुलाम म्हणून अज्ञान भूमीत नेऊ देईन.
का? कारण मी खूप संतापलो आहे.
माझा संताप प्रखर अग्नीप्रमाणे आहे, त्यात तुम्ही कायमचे जळून भस्म व्हाल.”
पौलाबरोबर असलेल्या लोकांविषयीची बातमी
7 तुखिक, प्रिय बंधु, विश्वासू सेवक आणि प्रभूमधील सहकारी तो तुम्हांला माझ्याविषयी सगळी माहिती देईल. 8 त्याला मी याच कारणाने पाठवीत आहे की, आमच्याविषयीची बातमी तुम्हांला कळावी आणि तुमची अंतःकरणे उत्तेजित व्हावीत. 9 मी त्याला आमचा विश्वासू व प्रिय बंधु अनेसिम, जो तुमच्यातील एक आहे, याच्याबरोबर पाठवीत आहे, तो तुम्हांला येथे काय घडत आहे ते सांगतील.
10 अरिस्तार्ख, माझ्या सोबतीचा कैदी, तुम्हाला सलाम सांगतो, त्याचप्रमाणे बर्णबाचा चुलत भाऊ मार्क ज्याच्याविषयी तुम्हाला अगोदरच माहिती मिळाली आहे, तो जर तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा. 11 येशू ज्याला युस्त म्हणतात तोसुद्धा तुम्हाला सलाम सांगतो. यहूदी विश्वासणाऱ्यांपैकी फक्त हेच काय ते देवाच्या राज्याचा प्रसार करण्यात माझ्याबरोबर काम करीत आहेत. ते मला आधीच फार मोठा आधार आहेत.
12 एपफ्राससुद्धा तुम्हाला सलाम सांगतो, तो तुमच्यापैकीच ख्रिस्त येशूचा सेवक आहे. तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्क वाढलेले आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात तुम्ही पूर्णपणे गुंतलेले असावे. 13 जे लवादिकीयात व हेरापल्लीत राहत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे. याचा मी साक्षी आहे. 14 प्रिय वैद्य लूक आणि देमास तुम्हांला सलाम सांगतात.
15 लावदिकीयात राहणारे बंधु आणि नेफा आणि तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा. 16 आणि जेव्हा तुम्हाला हे पत्र वाचून दाखविले जाईल, तेव्हा ते लावदकीयाच्या मंडळीतसुद्धा वाचले जाते की नाही ते पाहा आणि तू सुध्दा माझे पत्र वाच. 17 आणि अर्खिप्पाला सांगा, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पुढे चालू ठेव.”
2006 by World Bible Translation Center