Revised Common Lectionary (Semicontinuous)
10 परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस?
संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत.
2 गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात.
आणि गरीब लोकांना त्रास देतात.
3 दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात.
आधाशी लोक देवाला शाप देतात.
अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात.
4 वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत
ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात.
5 दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात.
देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत.
देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत.
6 आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात, “आपण मजा करु
आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
7 ते लोक नेहमी शाप देत असतात.
ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात.
ते सतत वाईट योजना आखत असतात.
8 ते गुप्त जागी लपून बसतात
आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात.
ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात.
9 ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात.
ते गरीबांवर हल्ला करतात.
दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात.
10 ते दुष्ट गरीब आणि आधीच पीडलेल्या लोकांना
पुन्हा पुन्हा त्रास देतात.
11 “देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला.
आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही”
असा विचार गरीब लोक करतात.
12 परमेश्वरा, ऊठ!
आणि काहीतरी कर.
देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस.
13 वाईट लोक देवाविरुध्द का जातात?
कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते.
14 परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट
आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर.
संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात.
परमेश्वरा, निराधाराला मदत करणारा तूच एक आहेस.
म्हणून त्यांना मदत कर.
15 परमेश्वरा, दुष्टांचे निर्दालन कर.
16 त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे.
17 परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकलेस.
त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना काय हवे ते दे.
18 परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण कर.
दुखी: लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस.
दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घाबरवून सोड!
16 “यिर्मया, तुला सांगतो, यहूदाच्या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस. त्यांच्यासाठी याचना व आळवणी करु नकोस. त्यांच्या मदतीकरिता मला विनवू नकोस. तू त्यांच्याकरिता केलेली प्रार्थना मी ऐकणार नाही. 17 ते लोक यहूदांच्या गावांतून काय करीत आहेत, हे तू पाहतोस, हे मला माहीत आहे. यरुशलेमच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसू शकते. 18 यहूदातील लोक काय करीत आहेत ते पाहा. मुले लाकडे गोळा करतात. वडील त्याचा उपयोग सरपण म्हणून करतात. ते विस्तव पेटवितात. बायका स्वर्गातील राणीला अर्पण करण्यासाठी भाकर तयार करतात. यहूदातील हे लोक इतर दैवतांची पूजा करताना दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेय ओततात. ते मला संताप आणण्यासाठी हे करतात. 19 पण यहूदातील लोक खरोखर ज्याला दुखवीत आहेत, तो मी नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते फक्त स्वतःला दुखवीत आहेत. ते स्वतःलाच लज्जित करीत आहेत.”
20 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी ह्या जागेवर माझा राग काढीन. मी माणसांना, प्राण्यांना, रानातील झाडांना आणि पिकांना शिक्षा करीन. माझा राग तप्त अग्नीप्रमाणे असेल. कोणीही तो विझवू शकणार नाही.”
परमेश्वराला बळींपेक्षा आज्ञापालन हवे आहे
21 सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलचा देव म्हणतो, “जा आणि तुम्हाला हवी तितकी होमार्पणे करा. तुम्हाला पाहिजे तितके यज्ञ द्या. त्या यज्ञ दिलेल्या पशूंचे मांस तुम्हीच खा. 22 मी तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले. मी त्यांच्याशी बोललो. पण अर्पण करण्याच्या गोष्टींबद्दल व बळींबद्दल मी त्यांना आज्ञा दिली नाही. 23 मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. ‘माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी माणसे व्हाल. मी आज्ञा करीन ते करा म्हणजे तुमचे भले होईल.’
24 “पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते दुराग्रही होते आणि त्यांना पाहिजे त्याच गोष्टी त्यांनी केल्या. ते सज्जन झाले नाहीत. उलट जास्तच दुष्ट झाले. पुढे येण्याऐवजी ते मागे गेले. 25 तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजपावेतो मी माझे सेवक तुमच्याकडे पाठविले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठविले. 26 पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते खूप दुराग्रही होते. त्यांनी त्यांच्या वडिलांपेक्षा वाईट कृत्ये केली.
फिलदेल्फिया येथील मंडळीला
7 “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही:
“जो पवित्र, सत्य, जो दाविदाची किल्ली ठेवतो त्याचे हे शब्द आहेत, जे तो उघडतो, ते कोणी बंद करु शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.
8 “मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करुन ठेवले आहे. जे कोणीही बंद करु शकणार नाही. मला माहीत आहे की, तू दुर्बळ आहेस, तरी तू माझा शब्द पाळला आहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस. 9 जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन. आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीति केली आहे. 10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हांला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहातात त्यांची परीक्षा होण्यासाठी होईल.
11 “मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्याला घट्ट धरुन राहा यासाठी की कोणीही तुझा मुगुट घेऊ नये. 12 जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिराचा खांब बनवीन. तो पुन्हा कधीही त्याला सोडणार नाही. मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवाच्या शहराचे नाव नवे यरुशलेम असे लिहीन. जे माझ्या देवापासून स्वर्गातून खाली येत आहे. आणि मी त्याच्यावर माझे नवे नाव लिहीन. 13 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
2006 by World Bible Translation Center