Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 74

आसाफाचे मास्कील

74 देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का?
    देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?
तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव.
    तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत.
ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का?
देवा, ये आणि या प्राचीन अवशेषांमधून चाल.
    शत्रूंनी ज्या पवित्र जागेचा नाश केला तिथे परत ये.

शत्रूंनी मंदिरात युध्द गर्जना केल्या.
    ते युध्द जिंकले आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडकवले.
फावड्याने गवत कापणाऱ्यासारखे
    शत्रुचे सैनिक दिसत होते.
देवा, त्यांनी कुऱ्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करुन
    तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले.
त्या सैनिकांनी तुझे पवित्र स्थान जाळून टाकले.
    तुझ्या नावाला गौरव प्राप्त करुन देण्यासाठी
    ते मंदिर बांधले होते पण त्यांनी ते मातीत मिळवले.
शत्रूंनी आमचा संपूर्ण नाश करायचे ठरवले.
    त्यांनी देशातील प्रत्येक पवित्र स्थान जाळून टाकले.
आम्हाला आमचे एकही चिन्ह दिसू शकले नाही.
    आता कोणी संदेष्टे राहिले नाही.
    कुणालाही काय करावे ते कळत नाही.
10 देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत?
    तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का?
11 देवा, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा का दिलीस?
    तू तुझी महान सत्ता वापरलीस आणि आमचा संपूर्ण नाश केलास.
12 देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस
    या देशात लढाया जिंकायला तू आम्हाला मदत केलीस.
13 देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी
    तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास.
14 समुद्रातल्या मोठ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस
    आणि त्याचे शरीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस.
15 तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस
    आणि तूच नद्या कोरड्या करतोस.
16 देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस.
    सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस.
17 पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस.
    तूच उन्हाळा आणि हिवाळा निर्माण केलास.
18 देवा, या गोष्टींची आठवण ठेव.
    शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे.
    ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात.
19 त्या जंगली प्राण्यांना तुझे कबुतर घेऊ देऊ नकोस.
    तुझ्या गरीब माणसांना कायमचे विसरु नकोस.
20 आपला करार आठव या देशातील
    प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात हिंसा आहे.
21 देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली.
    त्यांना आणखी दु:ख होणार नाही असे पाहा.
    गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात.
22 देवा, ऊठ! आणि युध्द कर!
    त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव.
23 तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस
    त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.

यशया 27

27 भूमी यापुढे मृतांना झाकून ठेवणार नाही.
    त्या वेळेला लिव्याथान ह्या कपटी सर्पाचा परमेश्वर न्यायनिवाडा करील.
वेटोळे घालून बसलेल्या लिव्याथान सर्पाला परमेश्वर आपल्या मोठ्या,
    कठीण व बलवान तलवारीने शिक्षा करील.
    समुद्रातील प्रचंड धुडाला तो मारील.

तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे
    गाणे म्हणतील.
“मी स्वतः परमेश्वर, त्या बागेची निगा राखीन.
    मी योग्य वेळी बागेला पाणी देईन.
रात्रंदिवस मी त्या बागेची राखण करीन.
    कोणीही बागेची नासधूस करणार नाही.
मी रागावलेलो नाही,
पण युध्द झाले आणि बागेभोवती कोणी काटेरी कुंपण घातले
    तर मी तेथे जाऊन ते नष्ट करीन.
जर कोणी व्यक्ति माझ्याकडे आश्रयासाठी आली
    व तिला माझ्याबरोबर शांतता करावयाची असली
    तर तिला माझ्याकडे येऊ द्या, व माझ्याबरोबर शांती करू द्या.
ज्याप्रमाणे खोलवर गेलेली मुळे झाडाला भक्कम आधार देतात.
    त्याप्रमाणे माझ्याकडे आलेली ही माणसे याकोबाचे हात मजबूत करतील.
    ही माणसे, फुलू लागलेल्या झाडाप्रमाणे, इस्राएलचा विकास करतील.
    फळांनी बहरलेल्या वृक्षाप्रमाणे इस्राएलची मुले हा देश व्यापून टाकतील.”

देव इस्राएलला दूर पाठवून देईल

परमेश्वर त्याच्या लोकांना कशी शिक्षा करील? पूर्वी जसा शत्रूंनी लोकांना त्रास दिला, तसाच आता परमेश्वर देईल का? पूर्वी जसे अनेक लोक मारले गेले तसेच आता परमेश्वर करील का? तो लोकांना मारील का?

इस्राएलला दूर पाठवून परमेश्वर हा वाद निकालात काढील. परमेश्वर इस्राएलची निर्भत्सना करील. वाळवंटातील गरम वाऱ्याप्रमाणे त्याचे शब्द जळजळीत असतील.

याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल? काय केले असता त्याची पापे नाहिशी होतील? पुढील गोष्टी घडून येतील: वेदीतील चिऱ्यांचा चुरा केला जाईल. पूजेसाठी घडविलेल्या खोट्या देवांच्या मूर्ती व बांधलेल्या वेदी या सर्व नष्ट केल्या जातील.

10 त्या वेळेला तटबंदी असलेले शहर वाळवंटाप्रमाणे ओसाड होईल. सर्व लोक दूर पळून गेलेले असतील. ते शहर चरायचे कुरण होईल. तेथे वासरे चरतील. गुरे वेलींची पाने खातील. 11 वेली सुकतील, त्यांच्या फांद्या तुटून पडतील आणि, बायका त्या सरपणासाठी वापरतील. लोक समजून घेण्याचे नाकारतात. म्हणून त्यांना घडविणारा देव त्यांची समजूत घालणार नाही. आणि तो त्यांच्यावर दया करणार नाही.

12 त्या वेळेस परमेश्वर त्याच्या लोकांना इतरांपासून वेगळे करील. परमेश्वर युफ्राटिसपासून सुरवात करून मिसरच्या नदीपर्यंतच्या सर्व लोकांना गोळा करील.

एक एक करून तुम्ही इस्राएलचे सर्व लोक एकत्र गोळा व्हाल. 13 माझी बरीच माणसे अश्शूरमध्ये गमावली आहेत. माझी काही माणसे मिसरला पळून गेली आहेत. पण त्या वेळी प्रचंड तुतारी फुंकली जाईल आणि ते सर्व लोक यरूशलेमला परत येतील. ते सर्व जण त्या पवित्र डोंगरावरील देवापुढे नमन करतील.

लूक 19:45-48

येशूचा मंदिरात प्रवेश(A)

45 येशूने मंदिरात प्रवेश केला व जे विक्री करीत होते, त्यांना बाहेर हाकलू लागला. 46 तो त्यांस म्हणाला, “असे लिहिले आहे की, ‘माझे घर प्रार्थनेचे घर होईल!’ पण तुम्ही ते ‘लुटारुची गुहा केली आहे.’” [a]

47 तो दररोज मंदिरात शिकवीत असे. मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. 48 पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक त्याच्या शब्दांनी खिळून गेले होते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center