Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे मास्कील
74 देवा, तू आम्हाला कायमचाच सोडून गेलास का?
देवा, तू तुझ्या माणसांवर अजूनही रागावलेला आहेस का?
2 तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव.
तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत.
ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का?
3 देवा, ये आणि या प्राचीन अवशेषांमधून चाल.
शत्रूंनी ज्या पवित्र जागेचा नाश केला तिथे परत ये.
4 शत्रूंनी मंदिरात युध्द गर्जना केल्या.
ते युध्द जिंकले आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडकवले.
5 फावड्याने गवत कापणाऱ्यासारखे
शत्रुचे सैनिक दिसत होते.
6 देवा, त्यांनी कुऱ्हाडीचा आणि हातोडीचा उपयोग करुन
तुझ्या मंदिरातील कोरीव काम तोडून टाकले.
7 त्या सैनिकांनी तुझे पवित्र स्थान जाळून टाकले.
तुझ्या नावाला गौरव प्राप्त करुन देण्यासाठी
ते मंदिर बांधले होते पण त्यांनी ते मातीत मिळवले.
8 शत्रूंनी आमचा संपूर्ण नाश करायचे ठरवले.
त्यांनी देशातील प्रत्येक पवित्र स्थान जाळून टाकले.
9 आम्हाला आमचे एकही चिन्ह दिसू शकले नाही.
आता कोणी संदेष्टे राहिले नाही.
कुणालाही काय करावे ते कळत नाही.
10 देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत?
तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का?
11 देवा, तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा का दिलीस?
तू तुझी महान सत्ता वापरलीस आणि आमचा संपूर्ण नाश केलास.
12 देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस
या देशात लढाया जिंकायला तू आम्हाला मदत केलीस.
13 देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी
तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास.
14 समुद्रातल्या मोठ्या राक्षसांचा तू पराभव केलास लिव्याथानाचे डोके तू ठेचलेस
आणि त्याचे शरीर प्राण्यांना खाण्याकरता ठेवून दिलेस.
15 तू नद्या नाल्यांना पाणी आणतोस
आणि तूच नद्या कोरड्या करतोस.
16 देवा, तू दिवसावर आणि रात्रीवर नियंत्रण ठेवतोस.
सूर्य आणि चंद्र तूच निर्माण केलेस.
17 पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तूच सीमित केलीस.
तूच उन्हाळा आणि हिवाळा निर्माण केलास.
18 देवा, या गोष्टींची आठवण ठेव.
शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे.
ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात.
19 त्या जंगली प्राण्यांना तुझे कबुतर घेऊ देऊ नकोस.
तुझ्या गरीब माणसांना कायमचे विसरु नकोस.
20 आपला करार आठव या देशातील
प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात हिंसा आहे.
21 देवा, तुझ्या माणसांना वाईट वागणुक मिळाली.
त्यांना आणखी दु:ख होणार नाही असे पाहा.
गरीब आणि असहाय्य लोक तुझी स्तुती करतात.
22 देवा, ऊठ! आणि युध्द कर!
त्या मूर्खांनी तुला आव्हान दिले याची आठवण ठेव.
23 तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस
त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.
8 अजिबात जागा शिल्लक राहणार नाही अशारीतीने घराला घर व शेताला शेत जोडणाऱ्यांनो तुमचा धिक्कार असो. परन्तु परमेश्वर तुम्हाला शिक्षा करील. असे हे तुम्हाला देशात एकाकी राहण्यास भाग पाडेपर्यंत चालू राहील. [a] 9 सर्वशक्तिमान परमेश्वराने मला हे सांगितले व मी ऐकले, “आता तेथे खूप घरे आहेत पण मी नक्की सांगतो की ती सर्व उध्वस्त होतील. मोठी व सुंदर घरे तेथे आहेत पण ती सर्व रिकामी पडतील. 10 तेव्हा दहा एकराच्या द्राक्षाच्या मळ्यातून अगदी थोडा द्राक्षरस मिळेल आणि खूप पोती बियाणे वापरले तरी अगदी थोडे पीक येईल.”
11 लवकर उठून नशा आणणाऱ्या पेयाच्या शोधास लागणाऱ्यांनो तुमचा धिक्कार असो. तुम्ही मद्यपानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता. 12 मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता आणि परमेश्वराची करणी तुम्हाला दिसत नाही. परमेश्वराने आपल्या हाताने अनेक गोष्टी घडवल्या आहेत पण त्या तुमच्या लक्षात येत नाहीत. हे तुमच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही.
13 परमेश्वर म्हणतो, “माझ्या लोकांना पकडून नेले जाईल. का? कारण ते समजदार नाहीत. त्यांच्यातील उच्चपदस्थांची उपासमार होईल. त्यांतील बहुसंख्य तहानेने तळमळतील. 14 पण ती सर्व मोठी माणसे मरतील व (शिओल) अधोलोकात अधिक भर पडेल. मृत्यु आपला अजस्त्र जबडा पसरेल आणि ते सर्व लोक खाली अधोलोकात जातील.”
15 लोक हीनदीन होतील. गर्विष्ठ माणसांच्या माना खाली जातील. 16 सर्वशक्तिमान परमेश्वर प्रामाणिकपणाने योग्य न्याय करील आणि लोकांना त्याची महानता कळेल. पवित्र देव योग्य त्याच गोष्टी करेल आणि लोक त्याचा आदर करतील. 17 देव इस्राएल लोकांना त्यांचा देश सोडून जाण्यास भाग पाडेल. सर्व भूमी ओसाड होईल. शेळ्या-मेंढ्यांना मोकळे कुरण मिळेल. एकेकाळी श्रीमंतांची मालकी असलेल्या जमिनीवर कोकरे चरतील.
18 त्या लोकांकडे पाहा लोक दोरांनी गाड्या खेचून नेतात तसे ते आपले गुन्हे व पापे वाहून नेत आहेत. 19 ते लोक म्हणतात, “देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे जे करायचे ते लवकरात लवकर करावे, म्हणजे आम्हाला काय घडणार आहे ते तरी कळेल. परमेश्वराची इच्छा लवकर पूर्ण व्हावी म्हणजे आम्हांला त्याची योजना कळेल.”
20 ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत व वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश समजतात. त्यांना आंबट गोड लागते व गोड आंबट लागते. 21 ते स्वतःला फार चलाख समजतात. त्यांना वाटते आपण फार बुध्दिमान आहोत. 22 मद्य पिण्यात त्यांची प्रसिध्दी आहे आणि मद्याचे मिश्रण करण्यात ते तरबेज आहेत. 23 जर त्यांना पैसे चारले तर गुन्हेगारालाही ते माफ करतील पण ते सज्जनांना प्रामणिकपणे न्याय मिळू देणार नाहीत.
खोट्या शिक्षकांविरुद्ध योहानाचा इशारा
4 प्रिय मित्रांनो, प्रत्येक संदेष्ट्याचा आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका. त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांची परीक्षा करा व ते (खरोखर) देवापासून आहेत का ते पाहा. मी हे तुम्हांला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत. 2 अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता: प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो कबूल करतो की, “येशू ख्रिस्त या जगात मानवी रुपात आला.” तो देवापासून आहे. 3 आणि प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो येशूविषयी कबुली देत नाही तो देवापासून नाही. अशी व्यक्ति म्हणजे ख्रिस्तविरोधी होय. ज्याच्या येण्याविषयी तुम्ही ऐकले आहे. तो अगोदरच जगात आला आहे.
4 माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात, म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोध्याच्या अनुयायांना जिंकले आहे, कारण जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे. 5 ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेत यासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. 6 पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा आणि लोकांना दूर नेणारा आत्मा कोणता हे आपण ओळखू शकतो.
2006 by World Bible Translation Center