Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
8 भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस.
तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस.
तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस
आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
9 तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस.
त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस.
थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.
10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले,
मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली.
11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या,
तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.
12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास?
आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात.
रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली
तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.
15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ.
तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.
16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली
तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
18-23 त्या वेळी परमेश्वर ह्या स्त्रियांना ज्यांचा अभिमान वाटतो अशा सर्व गोष्टी म्हणजे पैजण, चंद्रसूर्याप्रमाणे असलेले हार, कर्णभूषणे, तोडे, बुरखे, गळपट्टे, पायातल्या साखळ्या, कमरपट्टे, अत्तरांच्या बाटल्या, ताईत, विशेष प्रकारच्या अंगठ्या, नथी, उंची रेशमी वस्त्रे, शेले व शाली, बटवे, आरसे, सुती वस्त्रे फेटे, लांब शाली काढून घेईल.
24 आता या स्त्रियांजवळ मधुर सुवासाची अत्तरे आहेत पण देव त्यांना शिक्षा करील त्या वेळी त्या अत्तरांना बुरशी येऊन कुजट घाण येईल. आता या स्त्रिया कमरपट्टे वापरतात पण त्या ऐवजी दोऱ्या वापरण्याची वेळ त्यांच्यावर येईल. आता त्या विविध केशरचना करतात पण नंतर त्यांच्या डोक्यावर केसच नसतील. त्यांचे केशवपन होईल. त्यांच्या मेजवान्यांसाठी असलेल्या विशेष वस्त्रप्रावरणांऐवजी त्यांना जे कपडे घालावे लागतील त्यातून त्यांची वाईट स्थिती दिसून येईल. त्यांच्या चेहेऱ्यावरील सौंदर्यखुणांच्या जागी भाजल्याचे डाग पडतील.
25 त्याच वेळी लढाईत तुमची माणसे तलवारीने मारली जातील. वीर लढाईत कामी येतील. 26 वेशीजवळ असलेल्या सभा-संमेलनाच्या जागी शोककळा पसरेल. चोर व लुटारूंनी सर्वस्व लुटलेल्या स्त्रीप्रमाणे यरूशलेम नगरी एकटीच बसून शोक करेल.
4 त्यावेळी सात स्त्रिया एका माणसाला पकडून म्हणतील, “आम्ही आमचे अन्न व वस्त्र स्वतः मिळवू. फक्त तू आमच्याशी लग्न कर. तुझे नाव आम्हाला लावू दे. कृपया आमच्या अब्रूचे रक्षण कर.”
2 ह्याच वेळी परमेश्वराचे रोपटे (यहुदा) खूप सुंदर व महान होईल. त्या वेळी इस्राएलमध्ये राहणाऱ्यांना भूमीतून पिकणाऱ्या सर्व गोष्टींचा अभिमान वाटेल. 3 त्यावेळी सीयोन व यरूशलेम येथे जे लोक राहत असतील त्यांना पवित्र मानले जाईल. देवाची कृपा झाल्याने त्यांची नावे खास यादीत समाविष्ट केली गेली आहेत. त्या सर्व लोकांच्या बाबतीत हे घडेल. त्या सर्व यादीतील लोकांना जिवंत राहण्याची संमत्ती दिली जाईल.
4 सीयोनमधील स्त्रियांचे रक्त परमेश्वर धुवून टाकील. यरूशलेमलाही परमेश्वर निर्मळ करील. देव न्यायीपणाचा आत्मा वापरून योग्य न्याय करील आणि प्रत्येक गोष्ट जळणाऱ्या आत्म्याद्वारे शुध्द् करील. 5 ह्यावेळी आपण आपल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे देव सिध्द् करील. दिवसा तो धुराचा ढग तयार करील व रात्री अग्नीचा झगझगीत प्रकाश निर्माण करील. प्रत्येक इमारतीवरच्या आकाशात आणि सीयोनच्या डोंगरावरील मेळाव्याच्या जागेवर देवाच्या कृपेच्या ह्या निशाण्या दिसतील. संरक्षणासाठी प्रत्येक माणसावर आच्छादन असेल. 6 हे आच्छादन म्हणजे सुरक्षित ठिकाण असेल. ते माणसाचा उन्हापासून बचाव करील तसेच सर्व प्रकारच्या पुरांपासून आणि पावसापासून रक्षण करण्यासाठी लपून बसण्याची ती सुरक्षित जागा असेल.
15 “दानीएल संदेष्ट्याने एका अमंगळ गोष्टीविषयी सांगितले की, जिच्यामुळे नाश ओढवेल. अशी अमंगळ गोष्ट ही पवित्र जागी- मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.) 16 “त्यावेळी यहूदातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. 17 जो कोणी छपरावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी उतरु नये. 18 जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये.
19 “त्याकाळी गर्भवती असलेल्या अगर तान्ही बालके असलेल्या स्रियांना फार कठीण जाईल. 20 जेव्हा या गोष्टी होतील आणि तुम्हांला पळून जावे लागेल तेव्हा थंडीचे दिवस नसावेत अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. 21 कारण त्याकाळी फार पीडा येतील. जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी पीडा त्या काळी भोगावी लागेल.
22 “आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीच वाचले नसते. परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थोडे करील.
23 “त्या वेळी जर एखाद्याने तुम्हांला म्हटले, ‘पहा! ख्रिस्त येथे आहे,’ किंवा ‘तो तेथे आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. 25 या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हांला सावध केले आहे.
26 “एखादा मनुष्य तुम्हांला सांगेल, ‘पाहा, मशीहा ओसाड रानात आहे.’ तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, ‘ख्रिस्त, आतल्या खोलीत लपला आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 27 मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वाना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेदेखील असेल.
2006 by World Bible Translation Center