Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यशया 1:1

आमोजचा मुलगा यशया ह्याला पुढीलप्रमाणे देवाचा दृष्टान्त झाला आणि यहूदा व यरूशलेम येथे पुढे घडणाऱ्या गोष्टी देवाने यशयाला दाखविल्या उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया या यहूदी राजांच्या काळात घडून येणाऱ्या गोष्टी यशयाने पाहिल्या.

यशया 1:10-20

10 सदोमच्या नेत्यांनो, परमेश्वराचा संदेश ऐका गमोराच्या लोकांनो, देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या. 11 देव म्हणतो, “तुम्ही माझ्यापुढे सतत यज्ञबलि का करता? मला तुमच्या मेंढ्यांच्या, वासरांच्या चरबीच्या, आणि बैल, कोकरे आणि बकऱ्यांच्या यज्ञबलिंचा आता वीट आला आहे. 12 तुम्ही माझ्या दर्शनाला येता तेव्हा माझ्या अंगणातील प्रत्येक गोष्ट तुडविता. असे करायला तुम्हाला कोणी सांगितले?

13 “माझ्यासाठी निरर्थक यज्ञबलि देणे थांबवा. माझ्यापुढे जळणाऱ्या धुपाचा मला वीट आला आहे. चंद्रदर्शन शब्बाथ व सुटी यांच्या निमित्ताने होणाऱ्या मेजवान्या मला आवडत नाहीत. धार्मिक सभेत तुम्ही करीत असलेली दुष्कृत्ये मला अजिबात पसंत नाहीत. 14 तुमच्या मासिक सभा व मेळावे यांची मला मनापासून घृणा वाटते. ह्या सभांचे मला ओझे झाले आहे. मी ह्याला कंटाळलो आहे.

15 “प्रार्थना करण्यासाठी उचललेल्या तुमच्या हाताकडे मी लक्ष देणार नाही. तुम्ही कितीही प्रार्थना केली तरी ऐकणार नाही. का? कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत.

16 “शुचिर्भूत व्हा. स्वच्छ व्हा. तुमची दुष्कृत्ये थांबवा. मला वाईट गोष्टी बघायच्या नाहीत. चुकीचे वागू नका. 17 चांगल्या गोष्टी करायला शिका. दुसऱ्यांशी न्यायाने वागा. जे दुसऱ्यांना क्लेष देतात त्यांना शासन करा. अनाथ मुलांना मदत करा. विधवांना साहाय्य करा.”

18 परमेश्वर म्हणातो, “या, आपण या गोष्टींची चर्चा करू या. तुमची पातके कितीही काळीकुट्ट (शब्दश: शेंदरासारखी लाल) असली तरी ती धुता येतील आणि तुम्ही हिमाप्रमाणे पांढरेशुभ्र व्हाल. जरी तुमची पापे लाल असली तरी तुम्ही शुभ्र लोकरीसारखे व्हाल.

19 “तुम्ही माझे म्हणणे ऐकाल तर ह्या देशातील चांगल्या वस्तू तुम्हाला प्राप्त होतील. 20 माझे म्हणणे न ऐकणे हे माझ्याविरूध्द जाण्यासारखे होईल आणि शत्रू तुमचा नाश करेल.”

स्वतः परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या.

स्तोत्रसंहिता 50:1-8

असाफचे स्तोत्र

50 0परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे.
    तो पृथ्वीवरील पूर्व व पश्चिमेकडील सर्व लोकांना बोलावतो.
सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.
आमचा देव येत आहे आणि तो गप्प राहाणार नाही.
    त्याच्यासमोर आग लागली आहे.
    त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला
    त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.
देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा.
    माझ्या उपासकांनो, या आपण एकमेकाशी करार केला आहे.”

देव न्यायाधीश आहे
    आणि आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते.

देव म्हणतो, “माझ्या लोकांने माझे ऐका!
    इस्राएलाच्या लोकांनो मी तुमच्या विरुध्द माझा पुरावा देईन.
    मी देव आहे.
    तुमचा देव आहे.
मी तुमच्या होमबलीं बद्दल तक्रार करीत नाही.
    इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही तुमची होमार्पणे माझ्याकडे केव्हाही आणा.
    तुम्ही मला ती रोज द्या.

स्तोत्रसंहिता 50:22-23

22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात.
    मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच
तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले
    तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
23 म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो.
    जर एखाद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”

इब्री लोकांस 11:1-3

विश्वास

11 आता विश्वास म्हणजे, आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरंवसा असणे. यासाठीच म्हणजे त्यांच्या विश्वासासाठीच देवाने पूर्वीच्या लोकांना उंचावले होते.

विश्वासामुळेच आम्हांला समजते की, या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली. म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले.

इब्री लोकांस 11:8-16

जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला. विश्वासाने तो वचनदत्त देशात एखाद्या उपऱ्यासारखा राहिला. इसहाक व याकोब यांच्यासारखा तोदेखील तंबूत राहिला. कारण ते दोघेही अब्राहामाला दिलेल्या त्याच वचनाचे वारसदार होते. 10 ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वतःदेव आहे अशा नगराची ते वाट पाहात होते.

11 आपण दिलेल्या वचनाबाबत देव विश्वासू आहे हे जाणून सारा ही जरी वांझ होती आणि अब्राहामाचे वय लेकरे होण्याच्या अगदी मर्यादेपलीकडे गेले होते, तरी विश्वासाने मुलाला जन्म देण्याची शक्ति त्यांना मिळाली. 12 आणि जवळजवळ मरावयास टेकलेल्या अशा एका अब्राहामापासून आकाशातील ताऱ्यांच्या संख्येएवढी आणि समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांइतकी अगणित संतति जन्मास आली.

13 हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनांचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते. परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याचे स्वागत केले आणि त्यांनी उघडपणे कबूल केले की ते परके आणि प्रवासी आहेत. 14 जे लोक अशा गोष्टी बोलतात ते हेच दर्शवितात की ते त्यांच्या वतनासाठी देश पाहत आहेत. 15 ते जर आपण सोडून आलेल्या देशाबद्दल विचार करीत असते तर त्यांना त्या देशात परत जाण्याची संधी मिळाली असती 16 परंतु ते लोक त्याहून अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गाच्या वतनाची इच्छा धरुन होते. म्हणून देवाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला लाज वाटली नाही. कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.

लूक 12:32-40

धनावर विश्वास ठेवू नका

32 “लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हांला त्याचे राज्य द्यावे हे दयाळू पित्याला समधानाचे वाटते. 33 तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि गरिबांना पैसे द्या. जुन्या न होणाऱ्या व स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी करा. जेथे चोर जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करु शकणार नाही. 34 कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

सदैव तयार असा(A)

35 “तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. 36 लग्नाच्या मेजवानीवरुन त्यांचा मालक परत येईल अशी वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा. यासाठी की जेव्हा तो येतो व दार ठोठावतो तेव्हा त्याच्यासाठी ते ताबडतोब दार उघडतील. 37 धन्य ते नोकर जे त्यांचा मालक परत आल्यावर त्याला जागे व तयारीत असलेले आढळतील. मी तुम्हांला खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील. 38 तो मध्यरात्री येवो अगर त्यांनतर येवो. जर ते त्याला असे तयारीत आढळतील तर ते धन्य.

39 “परंतु याविषयी खात्री बाळगा; जर घराच्या मालकाला चोर केव्हा येणार हे माहीत असते तर त्याचे घर त्याने फोडू दिले नसते. 40 तुम्हीही तयार असा कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा कोणत्याही क्षणी मनुष्याचा पुत्र येईल.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center