Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “कराराची लिली” या चालीवर बसवलेले शिकवण्यासाठी लिहीलेले दावीदाचे मिक्ताम, अराम नहराईम आणि अराम सोबा याच्याशी तो लढला आणि क्षाराच्या खोऱ्यात परत गेल्यावर 12,000 अदोमातील सैनिकांचा त्याने पराभव केला तेव्हाचे स्तोत्र
60 देवा, तू आमच्यावर रागावला होतास म्हणून तू आमचा त्याग केलास
आणि आमचा नाश केलास.
कृपाकरुन आमच्याकडे परत ये.
2 तू पृथ्वी हादरवलीस आणि तिला दुभंगवलेस,
सारे जग कोलमडून पडले.
आता ते पुन्हा एकत्र आण.
3 तू तुझ्या लोकांना खूप त्रास दिलास.
आम्ही दारु पिऊन झोकांड्या खाणाऱ्या आणि खाली पडणाऱ्या लोकांप्रमाणे आहोत.
4 जे तुझी उपासना करतात त्यांना तू इशारा दिला होतास,
त्यामुळे आता ते शत्रूंपासून सुटका करुन घेऊ शकतील.
5 तू तुझी महान शक्ती वापर आणि आम्हाला वाचव.
माझ्या प्रार्थनेला उत्तर दे आणि तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्या लोकांना वाचव.
6 देव त्याच्या मंदिरात म्हणाला
“मी युध्द जिंकेन आणि विजयामुळे आनंदी होईन.
मी ही जमीन माझ्या लोकांबरोबर वाटून घेईन.
मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
7 गिलाद आणि मनश्शे माझे असेल,
एफ्राईम, माझे शिरस्त्राण असेल
आणि यहुदा माझा राजदंड असेल.
8 मवाब माझे पाय धुण्याचे पात्र असेल,
अदोम माझा जोडा नेणारा गुलाम असेल.
मी पलिष्टी लोकांचा पराभव करीन आणि माझ्या विजयाबद्दल ओरडून सांगेन.”
9-10 मला त्या शक्तिशाली आणि सुरक्षित शहरात कोण नेईल?
अदोमाशी लढायला मला कोण नेईल?
देवा, हे करण्यासाठी मला फक्त तूच मदत करु शकतोस परंतु तू आम्हाला सोडून गेलास.
तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
11 देवा, तू आम्हाला शत्रूचा पराभव करण्यासाठी मदत कर.
कारण लोक आम्हाला मदत करु शकत नाहीत.
12 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो
देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो.
इस्राएलने आपला नाश स्वतःच करून घेतला
13 इस्राएलमध्ये एफ्राईमने स्वतःचे महत्व वाढविले तो बोलत असे व लोक भीतीने थरथर कापत. पण एफ्राईमने पाप केले त्याने बआल देवताला पूजणे सुरु केले. 2 ते इस्राएली अधिकच पाप करतात. ते स्वतःसाठी मूर्ती तयार करतात. कारागिर चमत्कतिपूर्ण चांदीच्या मूर्ती घडवितात व ते लोक त्या मूर्तीशी बोलतात. ते त्या मूर्तीपुढे बळी देतात. सोन्याच्या वासरांचे ते चुंबन घेतात. 3 ह्याच कारणामुळे ते लोक लवकरच अदृश्य होतील. सकाळच्या धुक्याप्रमाणे त्यांची स्थिती होईल. सकाळी धुके थोड्यावेळ दिसते. व लगेच नाहीस होते. इस्राएलींची दशा खळ्यातून उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे होईल. धुराड्यातून निघणारा धूर काही क्षणातच दिसेनासा होतो, तसे त्याचे होईल.
4 “तुम्ही मिसर देशात असल्यापासून मी परमेश्वर तुमचा परमेश्वर आहे माझ्याशिवाय दुसरा देव तुम्हाला माहीत नव्हता. ज्याने तुम्हाला वाचविले तो मीच. 5 वाळवंटात, त्या रूक्ष प्रदेशात, मी तुम्हाला ओळखले. 6 मी इस्राएल लोकांना अन्न दिले. त्यांनी ते खाल्ले व ते संतुष्ट झाले,तृप्त झाले. ते गर्विष्ठ झाले आणि ते मलाच विसरले.
7 “म्हणूनच मी त्यांच्याशी सिंहासारखा वागेन. रस्त्यावर दबा धरून बसलेल्या चित्याप्रमाणे मी होईन. 8 जिची पिल्ले तिच्यापासून हिरावून घेतली गेली आहेत अशी अस्वलाची मादी जसा हल्ला करील, तसाच मीही त्याच्यावर तुटून पडेन. मी त्यांच्यावर चढाई करीन. मी त्यांच्या छाती फाडीन. सिंह किंवा इतर हिस्र पशू आपली शिकार जशा फाडून खातात तसेच मी करीन.”
परमेश्वराच्या क्रोधापासून इस्राएलला कोणीही वाचवू शकणार नाही
9 “इस्राएल, मी तुला मदत केली. पण तू माझ्याविरुध्द गेलास म्हणून आता मी तुझा नाश करीन. 10 तुझा राजा कोठे आहे? तुझ्या सर्व नगरांत तो तुला वाचवू शकत नाही. तुझे न्यायाधीश कोठे आहेत? ‘मला राजा व नेते दे’ अशी विनवणी तू केली होतीस. 11 मी रागावलो आणि तुला राजा दिला. माझा क्रोध अधिक भडकताच, मी तुझा राजा काढून घेतला.
12 “एफ्राईमने आपला अपराध लपविण्याचा प्रयत्न केला.
त्याचे पाप म्हणजे गुप्त गोष्ट हे असे
त्याला वाटले पण त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळेल.
13 त्याची शिक्षा प्रसूतिवेदनांप्रमाणे असेल.
तो सुज्ञ मुलगा नसेल
त्याची जन्मवेळ येईल,
तेव्हा तो वाचणार नाही.
14 “मी त्यांना थडग्यापासून वाचवीन मी
त्यांचा मृत्यूपासून बचाव करीन.
मरणा, तुझी रोगराई कोठे आहे?
थडग्या, तुझी शक्ती कोठे गेली?
मला सूड घ्यायचा नाही.
15 इस्राएल त्यांच्या भावांत वाढतो आहे.
पण पूर्वेकडून जोराचा वारा येईल.
परमेश्वराचा वारा वाळवंटाकडून वाहील.
मग इस्राएलची विहीर आटून जाईल.
त्याचा झरा कोरडा पडेल.
वारा इस्राएलच्या खजिन्यातील प्रत्येक मौल्यवान वस्तू काढून घेईल.
16 शोमरोनला शिक्षा झालीच पाहिजे, का?
कारण तिने परमेश्वराकडे पाठ फिरविली.
इस्राएली तलवारीला बळी पडतील.
त्यांच्या मुलांची खांडोळी केली जाईल.
त्यांच्या गर्भवती स्त्रियांना फाडून टाकले जाईल.”
पौल ख्रिस्ती लोकांना काही गोष्टी करावयास सांगतो
2 नेहमी प्रार्थना करीत राहा. उपकारस्तुति करीत त्यामध्ये दक्ष राहा. 3 त्याचवेळी आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा, यासाठी की, ख्रिस्ताविषयीचे जे रहस्य देवाने आम्हांला कळविले, त्याविषयी बोलण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी, देवाने आमच्यासाठी दार उघडावे. कारण त्या उपदेश करण्याने मी बंधनात आहे. 4 ते रहस्य ज्या रीतीने मी सांगावयास पाहिजे, त्याप्रकारे सांगण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा.
5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा आणि प्रत्येक संधीचा चांगला फायदा करुन घ्या. 6 तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. यासाठी की प्रत्येक मनुष्याला कसे उत्तर द्यावे हे तुम्हांला कळावे.
2006 by World Bible Translation Center