Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुक गायकासाठी दावीदाचे मास्कील (बोधपर स्तोत्र) “दावीद अहीमलेखाच्या घरी आला आहे” असे देवगअदोमीने शौलाकडे येऊन सांगितले त्यावेळचे स्तोत्र
52 बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस?
तू देवाला एक कलंक आहेस.
तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.
2 तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे.
तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस.
3 तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतोस.
तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते.
4 तुला आणि तुझ्या खोटे बोलणाऱ्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते.
5 म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल.
तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल.
तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.
6 चांगले लोक ते बघतील आणि त्यावरुन.
ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील.
ते तुला हसतील.
7 व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि
त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”
8 पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे.
मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्र्वास ठेवतो.
9 देवा, तू केलेल्या गोष्टींबद्दल मी सर्वकाळ तुझी स्तुती करतो.
तुझ्या इतर भक्तांप्रमाणे मी ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो.
इस्राएलचा शुभ-समय काढून घेतला जाईल
6 सयोनमधील काहींचे जीवन आरामदायी आहे.
शोमरोनच्या पर्वतावरील काही लोकांना नर्धास्त वाटते.
पण तुमच्यावर खूप संकटे येतील.
जगातील उत्तम नगरीतील तुम्ही “महत्वाचे लोक” आहात इस्राएलचे (लोक) मदत मागण्यासाठी तुमच्याकडे येतात.
2 कालनेला जाऊन पाहा.
तेथून महानगरी हमाथला जा.
पलिष्ट्यांची नगरी गथला जा.
तुम्ही ह्या राज्यांपेक्षा चांगले आहात का?
नाही. त्याचे देश तुमच्या देशापेक्षा मोठे आहेत.
3 तुम्ही लोक करीत असलेल्या कृत्यांमुळे शिक्षेचा दिवस जवळ जवळ येत आहे.
तुम्ही त्या हिंसाचाराच्या नियमाला जवळ जवळ आणता.
4 पण तुम्ही सर्व सुखसोयी उपभोगता.
तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि गाद्या-गिर्द्यावर पसरता.
तुम्ही कळपातील कोवळी कोकरे
व गोठ्यातील वासरे खाता.
5 तुम्ही वीणा वाजविता.
आणि दाविदाप्रमाणे वाद्यांवर सराव करता.
6 तुम्ही दिमाखदार प्यालांतून मद्य पिता.
तुम्ही चांगली अत्तरे वापरता.
पण योसेफच्या वंशाचा नाश होत आहे,
ह्याचा तुम्हाला खेदही वाटत नाही.
7 ते लोक त्यांच्या गाद्या-गिर्द्यावर पसरले आहेत पण त्यांचा चांगला काळ संपेल कैद्यांप्रमाणे त्यांना परकीय देशांत नेले जाईल ते अशारीतीने नेले जाणाऱ्यांतील पहिले असतील. 8 परमेश्वराने, माझ्या प्रभूने, स्वतःची शपथ घेतली. सर्वशक्तिमान परमेश्वर देवाने अशी शपथ घेतली,
“याकोबला ज्या गोष्टींचा अभिमान वाटतो,
त्या गोष्टींचा मला तिटकारा करतो.
त्याच्या जबूत मनोऱ्यांचा मी तिटकारा करतो.
म्हणून मी शत्रूला ती नगरी व त्यातील सर्व काही घेऊ देईन.”
फार थोडे इस्राएली जिवंत राहतील
9 त्या वेळी, कदाचित् काही घरांत दहा लोक जिवंत राहतील आणि ते सुध्दा मरतील. 10 प्रेत घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी लपले असेल तर त्याला लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी एखादे प्रेत आहे का?”
तो माणूस म्हणेल, “नाही……”
मग त्या माणसाचा नातेवाईक म्हणेल, “शू! आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नसतो.”
11 पाहा! परमेश्वर देव आज्ञा देईल,
मग मोठ्या घरांचे तुकडे तुकडे होतील.
व लहान घरांचे लहान लहान तुकडे होतील.
12 घोडे खडकावरून धावतात का?
नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का?
नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता.
तुम्ही चांगुलपणा व न्याय यांचे वीष केले.
13 तुम्ही लो-देबारमध्ये सुखी आहात.
तुम्ही म्हणता, “आम्ही आमच्या बळावर कर्नाईम घेतले.”
14 “पण इस्राएल, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन. ते राष्ट्र. तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला अडचणीत आणेल.” सर्वशक्तिमान परमेश्वर देव हे सर्व बोलला.
पेरणी करणाऱ्याची बोधकथा(A)
4 जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे व प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत, तेव्हा येशू बोधकथांचा उपयोग करुन बोलत असे:
5 “एक शेतकरी आपले बी पेरायला गेला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडले व ते तुडविले गेले. आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले. 6 काही बी खडकाळ जमिनीवर पडले आणि उगवल्यावर वाळून गेले कारण त्यात ओलावा नव्हता. 7 काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडुपे त्याच्याबरोबर वाढली व त्याची वाढ खुंटविली. 8 काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगवले, वाढले व जे पेरले होते त्यापेक्षा शंभर पट पीक जास्त आल.” या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला,
“ज्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐकावे!”
9 त्याच्या शिष्यांनी या बोधकथेचा अर्थ काय असे विचारले.
10 म्हणून तो म्हणाला, “तुम्हांला देवाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण इतरांच्यासाठी ते बोधकथेमध्ये दिले आहे.
‘यासाठी की, जरी ते पाहत असले,
तरी त्यांना दिसू नये आणि
ऐकत असले तरी
त्यांना समजू नये.’ (B)
2006 by World Bible Translation Center