Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरील शेमीनीथवरचे [a] दावीदाचे स्तोत्र.
6 परमेश्वरा, रागाने मला सुधारु नकोस.
रागावू नकोस आणि मला शिक्षा करु नकोस.
2 परमेश्वरा माझ्यावर दया कर.
मी आजारी आहे आणि अशक्त झालो आहे.
मला बरे कर,
माझी हाडे खिळखिळी झाली आहेत.
3 माझे सर्व शरीर थरथरत आहे.
परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे? [b]
4 परमेश्वरा, तू परत ये व मला पुन्हा शक्ती दे.
तू दयाळू आहेस म्हणून मला वाचव.
5 मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत.
मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करु शकत नाहीत.
म्हणून तू मला बरे कर.
6 परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली.
माझ्या अश्रुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे.
माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत.
तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शक्तिहीन, दुबळा झालो आहे.
7 माझ्या शंत्रूंनी मला खूप त्रास दिला.
त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे.
आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहेत.
8 वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा.
का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
9 परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली.
त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले.
10 माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील.
एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लज्जित होऊन निघून जातील.
19 तेव्हा अलीशाने नामानला निर्धास्तपणे जायला सांगून निरोप दिला.
मग नामान तिथून निघाला आणि थोडा पुढे गेला असेल तेवढ्यात 20 अलीशाचा नोकर गेहजी याला वाटले, “पाहा, माझ्या धन्याने या अरामच्या नामानला तसेच, त्याच्या कडून भेट न स्वीकारता जाऊ दिले. मीच आता धावत जाऊन त्याला गाठतो आणि काहीतरी पदरात पाडून घेतो.” 21 आणि गेहजी नामानच्या मागे निघाला.
नामानने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले. तेव्हा तो रथातून उतरला. त्याला गेहजी दिसला. नामान म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?”
22 गेहजी म्हणाला, “हो, तसे सगळे ठीक आहे. माझे स्वामी अलीशा यांनी मला पाठवले आहे. त्यांनी सांगितले आहे, ‘एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांची दोन तरुण मुले आमच्याकडे आली आहेत. तेव्हा त्यांना पंचाहत्तर पौंड चांदी आणि दोन वस्त्रांचे जोड द्या.’”
23 नामान म्हणाला, “जरुर, ही घ्या दीडशे पौंड चांदी.” नामानने गेहजीला ती चांदी घ्यायला लावली. नामानने ती दीडशे पौंड चांदी दोन थैल्यांमध्ये भरली आणि दोन वस्त्रांचे जोड घेतले. मग या वस्तू आपल्या दोन नोकरांच्या हवाली करुन गेहजीकडे त्या पोचवायला सांगितल्या. 24 डोंगराशी आल्यावर गेहजीने नोकरांकडून ते सर्व घेतले आणि त्यांना परत पाठवले. नोकर माघारी आले. गेहजीने मग हा ऐवज आपल्या घरात लपवला.
25 गेहजी आला आणि आपले स्वामी अलीशा यांच्यासमोर उभा राहिला अलीशाने गेहजीला विचारले, “तू कुठे गेला होतास?”
गेहजी म्हणाला, “मी कुठेच गेलो नव्हतो.”
26 अलीशा त्याला म्हणाला, “हे खरे नव्हे, नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे ह्दय तुझ्यापाशीच होते. पैसाअडका, कपडेलत्ते जैतूनाची फळे, द्राक्षे, शेळ्या, गायी, किंवा दास दासी भेटी दाखल घेण्याची ही वेळ नव्हे. 27 नामानचा रोग आता तुला आणि तुझ्या मुलांना होईल. तुमच्यावर हे कोड सतत राहिल.”
अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.
28 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले, आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे!” 29 शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला. आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदिनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले. 30 पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छीत होता पण येशूचे अनुयायी त्याला असे करु देईनात 31 पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगुहात जाऊ नये अशी कळकळीची विनंति केली.
32 एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करु लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करु लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला. आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या नाय्यभवनात एकत्र का आलोत. 33 यहूदी लोकांनी अलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्याला ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले. तो आपल्या हातांनी खुणावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करु लागला. 34 पण जेव्हा लोकांना समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरंची अर्तमी देवी थोर आहे!”
35 शहराचा लेखनिक लोकांना शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी माणूस जगात आहे काय? 36 ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे. उतावळेपणा करु नये.
37 “तुम्ही या दोघांना (गायस व अरिस्तार्ख) येथे घेऊन आलात. वस्तुतःत्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही. 38 जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत. तेथे ते एकमेकांवर आरोप करु शकतात!
39 “परंतु जर तुम्हांला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल. 40 आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरु केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीति आहे.” 41 असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.
2006 by World Bible Translation Center