Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र हे स्तोत्र मंदिरअर्पण करण्याच्या वेळचे आहे.
30 परमेश्वरा, तू मला माझ्या संकटांतून वर उचललेस.
तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करु दिला नाहीस
आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन.
2 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी प्रार्थना केली
आणि तू मला बरे केलेस.
3 तू मला थडग्यातून वर उचललेस तू मला जगू दिलेस
तू मला खड्ड्यात झोपलेल्या मृत लोकात राहू दिले नाहीस.
4 देवाचे भक्त परमेश्राची स्तुती करतात.
त्याच्या पवित्र नावाचा महिमा गातात.
5 देव रागावला होता म्हणून
त्याचा निर्णय होता “मृत्यू.”
परंतु त्याने त्याचे प्रेम दाखवले आणि मला “जीवन” दिले आदल्या रात्री मी झोपताना रडत होतो
परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आनंदी होतो व गात होतो.
6 मी जेव्हा सुरक्षित व निर्धास्त होतो
तेव्हा मला कोणीच अपाय करणार नाही असे वाटले.
7 होय, परमेश्वरा तू माझ्याशी दयाळू पणे वागात होतास
तेव्हा कोणीही माझा पराभव करु शकणार नाही असे मला वाटत होते.
परंतु तू माझ्यापासून काही काळापुरता दूर गेलास
आणि मला खूप भीती वाटली.
8 देवा, मी तुझ्याकडे वळलो आणि तुझी प्रार्थना केली.
मी तुला मला दया दाखवण्याची विनंती केली.
9 मी म्हणालो, “देवा, मी मेल्यावर खाली थडग्यात गेलो तर चांगले होईल का?
मेलेले लोक मातीत नुसते झोपतात.
ते तुझी स्तुती करत नाहीत.
आम्ही तुझ्यावर किती अवलंबून आहे हे ते इतरांना सांगू शकत नाहीत.
10 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्यावर दया कर.
परमेश्वरा, मला मदत कर.”
11 मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस.
तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस.
तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुंडाळलेस.
12 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सतत स्तुती करीन.
अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन.
तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल.
18 मुलगा मोठा होत होता. एकदा हा मुलगा शेतात कापणी चाललेली असताना वडीलांना आणि इतर लोकांना भेटायला गेला. 19 तो वडीलांना म्हणाला, “माझे डोके पाहा किती भयंकर दुखत आहे.”
यावर त्याचे वडील आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”
20 नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोंचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता. मग तो मेला.
ही बाई अलीशाला भेटायला जाते
21 या बाईने आपल्या मुलाला परमेश्वराचा माणूस अलीशाच्या पलंगावर ठेवले. खोलीचे दार लावून घेतले आणि ती बाहेर पडली. 22 नवऱ्याला हाक मारुन ती म्हणाली, “एक नोकर आणि एक गाढव माझ्याबरोबर पाठवा,म्हणजे मी ताबडतोब परमेश्वराच्या माणसाला (अलीशाला) भेटून येते.”
23 त्या बाईचा नवरा तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे कशाला जातेस? आज अमावास्या नाही की शब्बाथ नाही.”
ती म्हणाली, “काही काळजी करु नका. सगळे ठीक होईल.”
24 मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता चल आणि भरभर जाऊ मी सांगितल्या शिवाय वेग कमी करु नको!”
25 परमेश्वराच्या माणसाला (अलीशाला) भेटायला ती कर्मेल डोंगरावर गेली.
अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले. तो गेहजी या आपल्या नोकराला म्हणाला, “बघ, ती शूनेमची बाई येतेय 26 पटकन धावत पुढे जा आणि तिची खबरबात विचार. तिचा नवरा, तिचा मुलगा यांचे कुशल विचार.”
गेहजीने तिला सर्व विचारले, तिने सर्व काही ठीक असल्याचे सांगितले.
27 पण ती डोंगर चढून वर गेली. अलीशाला वंदन करुन त्याचे पाय धरले. तिला दूर करायला गेहजी पुढे झाला. पण अलीशा त्याला म्हणाला, “तू मधे पडू नको, ती काळजीत आहे. परमेश्वराने मला याबद्दल सांगितले नाही. या बाबतीत त्याने मला अंधारात ठेवले.” (त्याने ही बातमी माझ्यापासून लपवली)
28 मग ती शूनेमची बाई म्हणाली, “माझे स्वामी, मी मुलगा मागितला नव्हता. ‘मला खोटी आशा दाखवू नका’ असे मी म्हणाले होते.”
29 तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “चल, निघायची तयारी कर. माझी काठी बरोबर घे. कुणाशीही बोलत थांबू नको. कोणी तुला भेटले तर नमस्कार करण्यापुरताही थांबू नको. कोणाच्या अभिवादनाला उत्तर देऊ नको. माझ्या काठीने त्या मुलाच्या चेहऱ्याला स्पर्श कर.”
30 पण ती मुलाची आई म्हणाली, “परमेश्वराची शपथ आणि तुमची शपथ मी तुमच्या वाचून इथून हलणार नाही!”
तेव्हा अलीशा उठला आणि तिच्याबरोबर निघाला.
31 अलीशा आणि ती बाई यांच्याअगोदरच गेहजी त्या घरी जाऊन पोचला. त्याने काठी त्या मुलाच्या चेहऱ्यावर टेकवली. पण ते मूल बोलले नाही की कसली चाहूल त्याला लागल्याचे दिसले नाही. तेव्हा गेहजी परत फिरला आणि अलीशाला म्हणाला, “मूल काही उठत नाही.”
ख्रिस्ती देणे
8 आणि आता, बंधूनो, आम्हांला असे वाटते की, तुम्ही हे जाणून घ्यावे की, मासेदिनियातील मंडळ्यांना देवाने कशी कृपा दिली. 2 अत्यंत खडतर अशी संकटे असली तरी त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचे आत्यांतिक दारिद्य विशाल उदारतेत उभे राहिले. 3 कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले. आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे स्वतःला दिले. 4 संतांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळावा म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हांला विनंति केली. 5 आणि आम्ही अपेक्षा केली त्याप्रमाणे त्यांनी केले नाही, तर त्यांनी स्वतःला प्रथम देवाला दिले. आणि मग देवाच्या इच्छेला राखून आम्हांला दिले.
6 मग आम्ही तीताला विनंति केली, त्याने अगोदर जशी सुरुवात केली होती तशीच त्याने तुम्हामध्ये या कुपेची पूर्णताही करावी. 7 म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हांवरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेतही फार वाढावे.
2006 by World Bible Translation Center