Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र हे स्तोत्र मंदिरअर्पण करण्याच्या वेळचे आहे.
30 परमेश्वरा, तू मला माझ्या संकटांतून वर उचललेस.
तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करु दिला नाहीस
आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन.
2 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी प्रार्थना केली
आणि तू मला बरे केलेस.
3 तू मला थडग्यातून वर उचललेस तू मला जगू दिलेस
तू मला खड्ड्यात झोपलेल्या मृत लोकात राहू दिले नाहीस.
4 देवाचे भक्त परमेश्राची स्तुती करतात.
त्याच्या पवित्र नावाचा महिमा गातात.
5 देव रागावला होता म्हणून
त्याचा निर्णय होता “मृत्यू.”
परंतु त्याने त्याचे प्रेम दाखवले आणि मला “जीवन” दिले आदल्या रात्री मी झोपताना रडत होतो
परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आनंदी होतो व गात होतो.
6 मी जेव्हा सुरक्षित व निर्धास्त होतो
तेव्हा मला कोणीच अपाय करणार नाही असे वाटले.
7 होय, परमेश्वरा तू माझ्याशी दयाळू पणे वागात होतास
तेव्हा कोणीही माझा पराभव करु शकणार नाही असे मला वाटत होते.
परंतु तू माझ्यापासून काही काळापुरता दूर गेलास
आणि मला खूप भीती वाटली.
8 देवा, मी तुझ्याकडे वळलो आणि तुझी प्रार्थना केली.
मी तुला मला दया दाखवण्याची विनंती केली.
9 मी म्हणालो, “देवा, मी मेल्यावर खाली थडग्यात गेलो तर चांगले होईल का?
मेलेले लोक मातीत नुसते झोपतात.
ते तुझी स्तुती करत नाहीत.
आम्ही तुझ्यावर किती अवलंबून आहे हे ते इतरांना सांगू शकत नाहीत.
10 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्यावर दया कर.
परमेश्वरा, मला मदत कर.”
11 मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस.
तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस.
तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुंडाळलेस.
12 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सतत स्तुती करीन.
अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन.
तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल.
शूनेममधली बाई अलीशाला एक खोली देते
8 एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहात होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा जेव्हा तिकडून जाई तेव्हा तेव्हा या बाईकडे जेवणासाठी मुक्काम करत असे.
9 एकदा ही बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा आपल्या इथे नेहमी येतो तो अलीशा परमेश्वराचा पवित्र माणूस आहे, तो नेहमी आपल्या घरावरुन जातो. 10 तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या आणि एक पलंग, एक टेबल खुर्ची आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्याला उतरायला ही खोली होईल.”
11 मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला. 12 अलीशाने तेव्हा आपला सेवक गेहजी याला त्या शूनेमच्या बाईला बोलावून आणायला सांगितले.
त्याप्रमाणे गेहजीने त्या बाईला बोलावले. ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली. 13 अलीशा आपल्या नोकराला म्हणाला, तिला सांग, “तू आमची चांगली बडदास्त ठेवली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?”
ती बाई म्हणाली, “मी सुखासमाधानाने माझ्या माणसांमध्ये राहात आहे.”
14 अलीशा गेहजीला म्हणाला, “आपण तिच्यासाठी काय करु शकतो?”
गेहजी म्हणाला, “मला माहीत आहे की तिला मूलबाळ नाही आणि तिचा नवरा वृध्द आहे.”
15 मग अलीशा म्हणाला, “बोलाव तिला”
गेहजीने पुन्हा तिला बोलावले ती येऊन दाराशी उभी राहिली. 16 अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या पोटच्या मुलाला कुशीत घेऊन बसलेली असशील.”
ती म्हणाली, “नाही, माझे स्वामी, तुम्ही परमेश्वराचे माणूस आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.”
शूनेमच्या बाईला मुलगा होतो
17 या बाईला दिवस राहिले. अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंतात तिने एका मुलाला जन्म दिला.
मनुष्याच्या मनातील लढा
14 कारण आम्हांला माहीत आहे की, नियमशास्त्र आत्मिक आणि मी दैहिक मनुष्य आहे. मी गुलाम म्हणून पापांत शरणागत राहावे म्हणून विकलेला असा आहे. 15 मी काय करतो हे मला माहीत नाही कारण काय करायचे हे मला माहीत नाही. कारण ज्या गोष्टींचा मी द्वेष करतो, त्याच गोष्टी मी करतो. 16 आणि ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्याच करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे हे मान्य करतो. 17 परंतु खरे तर मी त्या करतो असे नव्हे तर माझ्या ठायी वसत असलेले पाप त्या गोष्टी करते. 18 होय, मला माहीत आहे की, जे चांगले आहे ते माझ्यामध्ये वसत नाही. 19 चांगले करण्याची माझ्या ठायी इच्छा आहे, परंतु तसे मी करीत नाही, त्याऐवजी जे फार वाईट व जे मला करावेसे वाटत नाही तेच करतो. 20 आणि ज्याअर्थी, ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाहीत त्या मी करतो, तेव्हा खरे तर त्या गोष्टी मी करतो असे नाही तर माझ्याठायी असणारे पाप त्या गोष्टी करते.
21 तर माझ्यामध्ये मला हा नियम आढळतो की, माझ्यातील मनुष्याला चांगले करावेसे वाटते पण वाईट ही एकच गोष्ट माझ्याबरोबर आहे. 22 माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो. 23 परंतु माझ्या अवयवात मला निराळाच नियम कार्य करताना दिसतो. तो माझ्या मनावर अमल करणाऱ्या नियमाबरोबर लढतो, आणि पापाने मजवर लादलेल्या नियमाचा, जो माझ्या शरीरात कार्य करतो, त्याचा कैदी करतो. 24 मी अत्यंत दु:खी मनुष्य आहे! मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडवील? 25 परंतु आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.
तर मग माझ्या मनाने मी देवाच्या नियमाचा गुलाम आहे. पण माझ्या पापी स्वभावाने मी पापाने माझ्यावर लादलेल्या नियमाचा गुलाम आहे.
2006 by World Bible Translation Center