Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी यदूथून सुरावर आधारलेले आसाफाचे स्तोत्र.
77 मी देवाला मदतीसाठी जोरात हाक मारली,
देवा मी तुझी प्रार्थना करतो. माझ्याकडे लक्ष दे.
2 माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो.
मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोंचण्याचा प्रयत्न केला.
माझ्या आत्म्याने शांत व्हायला नकार दिला.
11 परमेश्वराने काय केले ते मला आठवते आहे.
देवा, खूप पूर्वी तू ज्या अद्भूत गोष्टी केल्यास त्या मला आठवतात.
12 तू केलेल्या गोष्टींचा मी विचार केला.
मी त्या गोष्टींबद्दल विचार केला.
13 देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत,
देवा, तुझ्यासारखा महान कोणीही नाही.
14 अद्भुत गोष्टी करणारा देव तूच आहेस.
तू लोकांना तुझी महान शक्ती दाखवलीस.
15 तू तुझ्या शक्तीने लोकांना वाचवलेस.
तू याकोबाच्या आणि योसेफाच्या वंशजांना वाचवलेस.
16 देवा, पाण्याने तुला पाहिले आणि ते घाबरले,
खोल पाणी भयाने थरथरले.
17 दाट ढगांनी पाणी खाली सोडले,
लोकांनी वरच्या उंच ढगातला गडगडाट ऐकला.
नंतर तुझे विजांचे बाण ढगातून चमकू लागले.
18 तिथे ढगांचा भयानक गडगडाट होत होता.
विजांनी जगाला प्रकाशमय केले होते.
पृथ्वी हलली आणि थरथरली.
19 देवा, तू खोल पाण्यातून चाललास.
तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही.
20 तू मोशेच्या आणि अहरोनच्या मदतीने
तुझ्या माणसांना मेंढ्यांप्रमाणे मार्गदर्शन केलेस.
अहज्यासाठी संदेश
1 अहाबच्या मृत्यूनंतर मवाब इस्राएल पासून वेगळा झाला.
2 एकदा अहज्या आपल्या शोमरोनमधल्या घराच्या माडीवर बसला होता. तेव्हा तिथल्या लाकडी कठडयावरुन तो खाली पडला आणि जबर जखमी झाला. अहज्याने मग आपल्या सेवकांना बोलावले आणि सांगितले. “एक्रोनचे दैवत बाल-जबूब याच्या पुरोहितांना मी या दुखण्यातून बरा होईन का ते विचारुन या.”
3 पण एलीया तिश्बी याला परमेश्वराचा दूत म्हणाला, “राजा अहज्याने शोमरोनहून आपले काही दूत रवाना केले आहेत. त्यांना जाऊन भेट त्यांना म्हण, ‘इस्राएलचा देव परमेश्वर आहे. तेव्हा एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारायला का जाता? 4 राजा अहज्याला हा निरोप सांगा तू बाल-जबूब कडे आपले दूत पाठवलेस याबद्दल परमेश्वर काय म्हणतो ते ऐक तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.’” मग एलीया उठला आणि अहज्याच्या सेवकांना त्याने जाऊन हा निरोप सांगितला.
5 तेव्हा ते दूत अहज्याकडे आले. अहज्याने त्यांना विचारले, “तुम्ही एवढ्या लौकर कसे आलात?”
6 ते अहज्याला म्हणाले, “आम्हाला एकजण भेटायला आला होता. त्याने आम्हाला तुमच्याकडे परत येऊन परमेश्वराचा हा निरोप सांगायला सांगितले, ‘इस्राएलात परमेश्वर आहे. तरी तू एक्रोनचे दैवत बाल-जबूब याच्याकडे आपल्या सेवकांना का पाठवलेस? ज्याअर्थी तू असे केलेस त्याअर्थी तू आता बरा होणार नाहीस. तू मृत्यू पावशील.’”
7 अहज्या आपल्या दूतांना म्हणाला, “ज्याने तुम्हाला भेटून हे सांगितले तो दिसायला कसा होता?”
8 तेव्हा ते दूत म्हणाले, “तो एक केसाळ माणूस होता आणि त्याने कातडयाचा कंबरपट्टा बांधला होता.”
तेव्हा अहज्या म्हणाला, “म्हणजे तो एलीया तिश्बी होता.”
अहज्याने पाठवलेले सरदार आगीत भस्मसात
9 अहज्याने आपला एक सरदार पन्नास माणसांसह एलीयाकडे पाठवला. हा सरदार एलीयाकडे गेला. एलीया तेव्हा एका डोंगराच्या माथ्यावर बसला होता. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा (संदेष्ट्या), राजाने तुला खाली बोलावले आहे.”
10 एलीयाने या सरदाराला उत्तर दिले, “मी खरेच देवाचा माणूस (संदेष्टा) असेन तर आकाशातून अग्नी प्रकट होऊन तुला आणि या पन्नास जणांना भस्मसात करु दे.”
तेव्हा आकाशातून अग्नी खाली आला आणि त्यात सरदारासह ती पन्नास माणसे जळून खाक झाली.
11 अहज्याने दुसऱ्या सरदाराला पन्नास जणांसह पाठवले. तो सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, ‘खाली ये असा राजाचा निरोप आहे.’”
12 एलीयाने त्या सर्वाना सांगितले “मी परमेश्वराचा माणूस असेन तर आकाशातून अग्नी उतरुन त्यात तुम्ही सर्व जळून जाल.”
तेव्हा आकाशातून परमेश्वराचा अग्नी उत्पन्न झाला आणि त्यात ते सर्वजण जळून गेले.
गलतीया येथील ख्रिस्ती लोकांकरिता पौलाचे प्रेम
8 गतकाळात जेव्हा तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा खऱ्या अर्थाने जे देव नव्हते, त्यांचे तुम्ही गुलाम होता. 9 परंतु आता तुम्ही देवाला ओळखता किंवा आता देवाने तुमची ओळख करुन घेतली आहे. तर मग आता तुम्ही ज्यांचे गुलाम होण्याचे प्रयत्न करीत आहात त्या दुर्बल आणि निरुपयोगी नियमाकडे कसे वळता? 10 तुम्ही विशेष दिवस, महिने, ऋतू आणि वर्षे पाळता. 11 मला तुमच्याविषयी भीती वाटते मला वाईट वाटते की, मी तुमच्यासाठी केलेले श्रम व्यर्थ आहेत.
12 बंधूनो, मी तुम्हांला कळकळीची विनंति करतो की कृपा करुन माझ्यासारखे व्हा. कारण मी तुमच्यासारखा झालो, असे काही नाही की, तुम्ही माझे काही वाईट केले होते. 13 तुम्हांला माहीत आहे की, माझ्या शारीरिक दुर्बलतेमुळे प्रथमतः मी तुम्हांला सुवार्ता सांगितली. 14 आणि माझ्या शारीरिक दुर्बलतेबाबत तुमची कठीण परीक्षा होत असतानाही उलट माझे एखाद्या देवदूतासारखे तुम्ही स्वागत केले, जणू काय मीच स्वतः ख्रिस्त असल्यासारखे स्वागत केले. 15 मग जो आनंद तुम्हांला मिळाला तो कोठे आहे? कारण मी तुम्हांविषयी साक्ष देतो की, जर तुम्ही समर्थ असता तर तुम्ही तुमचे स्वतःचे डोळे काढून ते मला दिले असते. 16 तुम्हांला खरे सांगितले म्हणून मी तुमचा वैरी झालो काय?
17 तुम्ही नियमशास्त्र पाळावे असे ज्यांना वाटते त्यांना तुमच्याविषयी उत्साहवर्धक आस्था आहे, पण चांगल्या हेतूसाठी नाही. मझ्यापासून तुम्हांला वेगळे करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. यासाठी की तुम्हांला त्याच्याविषयी उत्साहवर्धक आस्था वाटेल. 18 हे नेहमीच चांगले असते की, कोणासाठी तरी विशेष (उत्साहवर्धक) आस्था असावी पण ती कोणत्या तरी चांगल्या गोष्टीसाठी आणि मी जेव्हा तुमच्याबरोबर असतो, फक्त तेव्हाच नव्हे. 19 माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा प्रसूतिवेदनातून जात आहे आणि तुम्ही ख्रिस्तासारखे होईपर्यंत मला तसे करावेच लागेल. 20 आता मला तुमच्याबरोबर तेथे हजर राहावेसे व स्वर बदलून वेघळ्या प्रकारे बोलावेसे वाटते, कारण तुमच्याविषयी मी गोंधळात पडलो आहे.
2006 by World Bible Translation Center