Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” या चालीवर आधारलेले दावीदाचे मिक्ताम दावीदला मारण्यासाठी शौलाने त्याच्या घरावर नजर ठेवायला माणसे पाठविली त्या वेळचे.
59 देवा, मला माझ्या शत्रूंपासून वाचव माझ्याशी लढायला जे लोक आले आहेत
त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी मला मदत कर.
2 वाईट कृत्ये करणाऱ्यांपासून मला वाचव.
मला त्या खुन्यांपासून वाचव.
3 बघ, ते बलवान लोक माझी वाट पहात आहेत.
ते मला मारण्यासाठी थांबले आहेत.
परंतु मी पाप केले नाही किंवा कुठला गुन्हा केला नाही.
4 ते माझा पाठलाग करीत आहेत परंतु मी काहीही चूक केली नाही.
परमेश्वरा, ये आणि स्वत:च बघ.
5 तू सर्वशक्तिमान परमेश्वर आहेस.
इस्राएलचा देव आहेस.
ऊठ आणि त्या लोकांना शिक्षा कर.
त्या दुष्ट देशद्रोह्यांना अजिबात दयामाया दाखवू नकोस.
6 ते दुष्ट लोक संध्याकाळच्या वेळी गावात
येणाऱ्या कुत्र्यांसारखे गुरगुरत आणि शहरातून फिरत येतात.
7 त्यांच्या धमक्या आणि अपमानित करणारे शब्द ऐक.
ते अतिशय दुष्ट गोष्टी बोलतात
आणि कुणी ते ऐकेल याची त्यांना पर्वा नसते.
8 परमेश्वरा, त्यांना हास,
त्या सर्वांचा उपहास कर.
9 देवा, तू माझी शक्ती आहेस.
मी तुझी वाट पाहात आहे देवा, तू माझी उंच पर्वातावरील सुरक्षित जागा आहेस.
10 देव माझ्यावर प्रेम करतो.
आणि तो मला जिंकण्यासाठी मदत करतो.
तो मला माझ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी मदत करील.
11 देवा, तू त्यांना फक्त मारुन टाकू नकोस नाही तर माझे लोक त्यांना विसरुन जातील.
माझ्या रक्षणकर्त्या तू त्यांची दाणादाण उडव आणि तुझ्या शक्तीने त्यांचा पराभव कर.
12 ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात.
ते ज्या गोष्टी बोलले त्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
त्यांचा अंहकार त्यांना सापळ्यात अडकवू दे.
13 रागाने तू त्यांचा नाश कर,
त्यांचा सर्वनाश कर.
नतंर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्या करतो.
14 ते दुष्ट लोक गुरगुरणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे
रात्री शहरातून हिंडत येतात.
15 ते खाण्यासाठी अन्न शोधतील पण त्यांना काही मिळणार नाही
आणि झोपायला जागाही मिळणार नाही.
16 परंतु मी तुझी स्तुती करणारे गाणे गाईन.
रोज सकाळी मी तुझ्या प्रेमाचा आनंद घेईन का?
कारण तू माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहेस
आणि संकटात मी तुझ्याकडे धाव घेऊ शकतो.
17 मी तुझे गुणवर्णन करणारे गाणे गाईन.
का? कारण तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस.
माझ्यावर प्रेम करणारा देव तूच आहेस.
येहू इज्रेल येथे जातो
14 निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामविरुध्द कट रचला.
यावेळी, अरामचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. 15 राजा योरामने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता.
तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”
16 योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योरामला भेटायाला इज्रेलला आला होता.
17 इज्रेलमध्ये बुरुजावर एक पहारेकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावानिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय”
योरामने त्याला सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव ते सद्भावाने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”
18 तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?”
येहू त्याला म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागोमाग ये.”
पहरेकऱ्याने योरामला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला माणूस अजून परत आलेला नाही.”
19 तेव्हा योरामने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहू कडे आला आणि राजा योरामच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले.
येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?”
20 पहारेकऱ्याने योरामला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा माणूसही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच पध्दत आहे.”
21 योरामने मग स्वतःचा रथ तयार ठेवण्यास सांगितले.
तेव्हा सेवकाने योरामचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची येहूशी गाठ पडली.
22 येहूला पाहून योरामने त्याला विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?”
येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?”
23 योरामने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”
24 पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामचा बरोबर दोन बाहुंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.
25 येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना? 26 परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले, तेंव्हा या शेतात मी अहाबला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”
ख्रिस्तामध्ये एक
11 म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते. 12 आठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला. 13 पण आता, ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.
14 कारण त्याच्याद्वारे आम्हांला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला. 15 त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक मानव निर्माण करुन शांति करणे त्याला शक्य व्हावे. 16 आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल. 17 म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, 18 कारण त्याच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्याच्या द्वारे देवाजवळ प्रवेश होतो.
19 यामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात. 20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. 21 संपूर्ण इमारात त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभुमध्ये एक पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे. 22 त्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.
2006 by World Bible Translation Center