Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 19:1-4

सिनाय पर्वतावर एलीया

19 अहाब राजाने घडलेली सर्व हकीकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले. तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार आहे. यात मला यश आले नाही तर देवतांनीच मला मारावे.”

एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैरशेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झुडुपाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्याला वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?”

1 राजे 19:5-7

एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करुन म्हणाला, “उठ खाऊन घे.” एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली गोड भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.

आणखी काही वेळाने तो देवदूत पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.”

1 राजे 19:8-15

तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्याबळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला. तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली.

तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?”

10 एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”

11 यावर परमेश्वर एलीयाला म्हणाला, “जा, या डोंगरावर माझ्यासमोर उभा राहा. मी तुझ्या जवळून जातो” मग जोराचा वारा सुटला. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठे मोठे खडक परमेश्वरासमोर पडले. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. त्यानंतर धरणीकंप झाला, पण त्यातही परमेश्वर नव्हता. 12 धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला. पण त्यातही परमेश्वर नव्हता. अग्री शमल्यावर मात्र शांत, मंजुळ स्वर ऐकू आला.

13 एलीयाने हा ध्वनी ऐकला तेव्हा अंगरख्याने चेहरा झाकून घेऊन तो गुहेच्या दाराशी जाऊन उभा राहिला. “एलीया, तू इथे का आला आहेस?” अशी वाणी त्याला ऐकू आली.

14 एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे. पण इस्राएल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदींचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे. आणि आता ते माझ्या जिवावर उठलेत.”

15 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोंचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि अरामचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर.

स्तोत्रसंहिता 42

भाग दुसरा

(स्त्रोतसंहिता 42-72)

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटूंबाकडून मास्कील

42 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते.
    त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे.
    मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
    सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”

म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे.
मला माझे मन रिकामे करु दे.
    जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे.

खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन
    सण साजरा केल्याची मला आठवण आहे.

5-6 मी दु:खी का व्हावे?
    मी इतके का तळमळावे?
मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे.
    त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल.
    तो मला वाचवेल!
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले.
    मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला.
    समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली,
परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत.
    तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.

दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून
    माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो,
    “परमेश्वरा, तू मला का विसरलास?
    माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला, “तुझा देव कुठे आहे?”
    असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.

11 मी इतका दु:खी का आहे?
    मी इतका खिन्न का आहे?
मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे.
    त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल.
    तो मला वाचवेल.

स्तोत्रसंहिता 43

43 देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे.
    तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिध्द कर.
    माझा बचाव कर.
    मला त्या माणसापासून वाचव.
देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस
    तू मला का सोडलेस?
माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते
    तू मला का दाखवले नाहीस?
देवा, तुझा प्रकाश आणि सत्य माझ्यावर उजळू दे तुझा प्रकाश आणि सत्य मला मार्ग दाखवेल.
    ते मला तुझ्या पवित्र डोंगराकडे नेतील.
    ते मला तुझ्या घराकडे नेतील.
मी देवाच्या वेदीजवळ जाईन
    मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन.
देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.

मी इतका खिन्न का आहे?
    मी इतका का तळमळतो आहे?
मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी.
    मला देवाची स्तुती करायची आणखी संधी मिळेल.
    तो मला वाचवेल.

गलतीकरांस 3:23-29

23 हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणांस कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते. आणि हा येणारा विश्वास आम्हांला प्रगट होईपर्यंत आम्हांला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. 24 त्यामुळे आपल्या विश्वासाच्या आधारे आपण नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र जे आपणांला ख्रिस्ताकडे घेऊन येणारे होते, ते आपले पालक होते. 25 पण आता हा विश्वास आलाच आहे, तर यापुढे आम्ही या कडक पालकाच्या अधीन नाही.

26-27 कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. 28 तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. 29 आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि देवाने अब्राहामाला दिलेल्या वचनानुसार वारस आहात.

लूक 8:26-39

भुते अंगात असलेला माणूस(A)

26 नंतर ते गालील सरोवरापलीकडील गरसेकरांच्या प्रदेशात गेले. 27 जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला, तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भुते होती. बराच काळपर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता.

28-29 जेव्हा त्याने येशूला पाहिले, तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्यापुढे पडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, “येशू, सर्वोच्च देवाच्या पुत्रा, तुला माझ्यापासून काय पाहिजे? मी तुला विनंति करतो की, मला त्रास देऊ नको.”तो असे म्हणाला कारण येशूने भुताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती. कारण त्याने त्याला पुष्कळ वेळ धरले होते. त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते. पायात बेड्या होत्या व त्याला पहाऱ्यात ठेवले होते परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे व भुते त्याला एकांतात घेऊन जात असत.

30 येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?”

तो म्हणाला, “सैन्य,” कारण त्याच्यात अनेक भुते शिरली होती. 31 भुतांनी येशूला विनवणी केली की, आम्हांला अनंतकाळच्या अंधारात [a] जाण्याची आज्ञा करु नको. 32 डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भुतांनी त्याला विनंति केली, “आम्हांला त्या डुकरांच्या मध्ये जाऊ दे.” आणि येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. 33 मग भुते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डुकरात शिरली. नंतर डुकरांचा कळप सरोवराकडे जोरात पळाला आणि तो सारा कळप सरोवरात बुडून मेला.

34 जेव्हा डुकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले, तेव्हा ते दूर पळाले व त्यांनी नगरात व त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले. 35 काय झाले हे पाहण्यासाठी लोक बाहेर आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी ज्या माणसाच्या अंगातून भुते निघाली होती, त्याला येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांनी पाहिले. त्याने नीट कपडे घातले होते व तो पूर्ण शुद्धीवर होता. या घटनेचे त्यांना भय वाटले. 36 ज्यांनी हे पाहिले त्यांनी तो भूत लागलेला मनुष्य कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. 37 तेव्हा गरसेकर प्रदेशातील सर्व लोकांनी येशूला त्यांना सोडून जाण्यास सांगितले. कारण ते सर्व फार घाबरले होते.

मग येशू नावेत बसून परत गेला. 38 ज्याच्या अंगातून भुते तिघाली होती तो त्याच्याबरोबर जाण्यासाठी विनवणी करु लागला. पण येशूने त्याला परत जायला सांगितले आणि म्हणाला, 39 “घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले आहे ते सांग.”

तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले ते नगारातील सर्व लोकांना त्याने सांगितले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center