Revised Common Lectionary (Semicontinuous)
भाग दुसरा
(स्त्रोतसंहिता 42-72)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटूंबाकडून मास्कील
42 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते.
त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
2 माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
3 रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
4 म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे.
मला माझे मन रिकामे करु दे.
जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे.
खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन
सण साजरा केल्याची मला आठवण आहे.
5-6 मी दु:खी का व्हावे?
मी इतके का तळमळावे?
मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे.
त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल.
तो मला वाचवेल!
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले.
मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
7 या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला.
समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली,
परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत.
तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.
8 दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून
माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
9 मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो,
“परमेश्वरा, तू मला का विसरलास?
माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला, “तुझा देव कुठे आहे?”
असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.
11 मी इतका दु:खी का आहे?
मी इतका खिन्न का आहे?
मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे.
त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल.
तो मला वाचवेल.
43 देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे.
तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिध्द कर.
माझा बचाव कर.
मला त्या माणसापासून वाचव.
2 देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस
तू मला का सोडलेस?
माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते
तू मला का दाखवले नाहीस?
3 देवा, तुझा प्रकाश आणि सत्य माझ्यावर उजळू दे तुझा प्रकाश आणि सत्य मला मार्ग दाखवेल.
ते मला तुझ्या पवित्र डोंगराकडे नेतील.
ते मला तुझ्या घराकडे नेतील.
4 मी देवाच्या वेदीजवळ जाईन
मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन.
देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.
5 मी इतका खिन्न का आहे?
मी इतका का तळमळतो आहे?
मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी.
मला देवाची स्तुती करायची आणखी संधी मिळेल.
तो मला वाचवेल.
3 चांगल्या, इमानदार लोकांना प्रामाणिकपणा मार्गदर्शन करतो. पण दुष्ट लोक जेव्हा दुसऱ्यांना फसवतात तेव्हा ते स्वतःचाच नाश करुन घेतात.
4 ज्या दिवशी देव लोकांचा न्याय करतो त्या दिवशी पैशाला काही किंमत नसते. परंतु चांगुलपणा लोकांना त्यांच्या मरणापासून वाचवतो.
5 जर चांगला माणूस इमानी असला तर त्याचे आयुष्य सोपे असेल. पण दुष्ट माणसाचा मात्र त्याने केलेल्या वाईट गोष्टींमुळे नाश होईल.
6 इमानी माणसाला चांगुलपणा वाचवतो. पण दुष्ट मात्र त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अडकतात.
7 दुष्ट माणूस मेल्यानंतर त्याला आशेला जागा नसते. तो ज्या ज्या गोष्टींची आशा ठेवतो त्या सर्व कवडीमोल असतात.
8 चांगल्या माणसांचा संकटापासून बचाव होईल. आणि ती संकटे दुष्ट माणसांवर येतील.
9 दुष्ट माणूस काहीतरी बोलून लोकांना दुखवू शकतो. पण चांगल्या माणसांचे त्यांच्या शहाणपणामुळे रक्षण होते.
10 चांगली माणसे जेव्हा यशस्वी होतात तेव्हा सर्व शहर आनंदी होते. जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा लोक आनंदाने ओरडू लागतात.
11 इमानदार लोक त्यांचे आशीर्वाद देतात तेव्हा शहर मोठे होते. पण दुष्टांचा बोलण्यामुळे शहराचा नाश होऊ शकतो.
12 ज्या माणसाला चांगली समज बुध्दी् नसते तो त्याच्या शेजाऱ्याबद्दल वाईट बोलतो. परंतु शहाण्या माणसाला केंव्हा गप्प बसायचे ते कळते.
13 जो माणूस दुसऱ्या लोकांबद्दल काही गुप्त गोष्टी सांगतो तो गुप्तता पाळत नाही. (म्हणून त्याच्यावर विश्वास टाकणे शक्य नसते.) पण जो माणूस विश्वासू असतो तो अफवा पसरवत नाही.
येशू आणखी लोकांना बरे करतो
27 तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “दाविदाच्या पुत्रा, आम्हांवर दया करा.”
28 येशू आत गेला तेव्हा ते आंधळेही आत गेले. त्याने त्यांना विचारले. “मी तुम्हांला दृष्टि देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभु,” त्यांनी उत्तर दिले.
29 मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो.” 30 आणि त्यांना पुन्हा दृष्टि आलि. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.” 31 परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या प्रदेशात सगळीकडे ही बातमी पसरविलि.
32 मग ते दोघे निघून जात असताना लोकांनी एका भूतबाधा झालेल्या माणसाला येशूकडे आणले. 33 जेव्हा येशूने त्यामधून भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांना ह्याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलमध्ये याआधी असे कधीही झालेले पाहण्यात आले नाही.”
34 परंतु परूशी म्हणाले, “हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
2006 by World Bible Translation Center