Revised Common Lectionary (Semicontinuous)
भाग दुसरा
(स्त्रोतसंहिता 42-72)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटूंबाकडून मास्कील
42 हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते.
त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे.
2 माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
3 रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
4 म्हणून मला या सर्व गोष्टी आठवू दे.
मला माझे मन रिकामे करु दे.
जमावाला मी देवाच्या मंदिरापर्यत नेल्याची मला आठवण आहे.
खूप लोकांबरोबर स्तुतीचे आनंदी गाणे गाऊन
सण साजरा केल्याची मला आठवण आहे.
5-6 मी दु:खी का व्हावे?
मी इतके का तळमळावे?
मी देवाकडून मदतीसाठी थांबले पाहीजे.
त्याची स्तुती करण्याची मला पुन्हा संधी मिळेल.
तो मला वाचवेल!
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले.
मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
7 या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत मी तुझ्या लाटांचा आपटण्याचा आवाज ऐकला.
समुद्रातल्या लाटांसारखी संकटे माझ्यावर पुन्हा कोसळली,
परमेश्वरा तुझ्या लाटा माझ्यावर चहु बाजूंनी आदळत आहेत.
तुझ्या लाटांनी मला पूर्णपणे झाकले आहे.
8 दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून
माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
9 मी देवाशी माझ्या खडकाशी बोलतो मी म्हणतो,
“परमेश्वरा, तू मला का विसरलास?
माझ्या शत्रूच्या क्रूरतेमुळे मी इतके दु:ख का सहन करावे?”
10 माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला, “तुझा देव कुठे आहे?”
असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.
11 मी इतका दु:खी का आहे?
मी इतका खिन्न का आहे?
मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे.
त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल.
तो मला वाचवेल.
43 देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे.
तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिध्द कर.
माझा बचाव कर.
मला त्या माणसापासून वाचव.
2 देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस
तू मला का सोडलेस?
माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते
तू मला का दाखवले नाहीस?
3 देवा, तुझा प्रकाश आणि सत्य माझ्यावर उजळू दे तुझा प्रकाश आणि सत्य मला मार्ग दाखवेल.
ते मला तुझ्या पवित्र डोंगराकडे नेतील.
ते मला तुझ्या घराकडे नेतील.
4 मी देवाच्या वेदीजवळ जाईन
मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन.
देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.
5 मी इतका खिन्न का आहे?
मी इतका का तळमळतो आहे?
मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी.
मला देवाची स्तुती करायची आणखी संधी मिळेल.
तो मला वाचवेल.
इसहाकासाठी पत्नी
24 अब्राहाम आता फार म्हातारा झाला होता; परमेश्वराने अब्राहामाला व त्याने जे जे केले त्या सर्व गोष्टीना आशीर्वादित केले होते. 2 अब्राहामाचा सर्वात म्हातारा सेवक होता; तो त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरदाराचा कारभार पाहणारा मुख्य कारभारी होता. एकदा अब्राहामाने त्याला बोलावून म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव 3 आणि आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर याजसमोर मला वचन दे की माझा मुलगा इसहाक याला तू कनान देशातील कोणत्याच मुलीबरोबर लग्न करु देणार नाहीस; आपण या कनान देशात राहतो हे खरे परंतु या देशातील कोणत्याच मुलीबरोबर त्याला लग्न करु देणार नाहीस. 4 माझ्या देशाला, माझ्या लोकांकडे जा आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी शोधून तिला येथे आण.”
5 त्याचा सेवक त्याला म्हणाला, “यदा कदाचित ती स्त्री माझ्याबरोबर या देशात येण्यास तयार होणार नाही, तर मग माझ्याबरोबर तुमच्या मुलास ज्या देशातून तुम्ही आला त्या देशात घेऊन जाऊ काय?”
6 अब्राहाम त्याला बजावून म्हणाला, “नाही, नाही, माझ्या मुलास त्या देशाला घेऊन जाऊ नकोस. 7 स्वर्गाच्या ज्या परमेश्वराने मला माझ्या बापाच्या घरातून व आमच्या वंशजांच्या जन्मभूमीतून काढून वचन देऊन येथे आणले व ही येथील नवीन भूमी मला व माझ्या वंशजास वतन म्हणून दिली तो परमेश्वर तू तेथे जाऊन पोहोंचण्यापूर्वी त्याचा दूत पाठवील आणि तू तेथून माझ्या मुलाकरीता नवरी आणशील. 8 परंतु ती मुलगी तुझ्याबरोबर येथे येण्यास कबूल झाली नाही तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील; परंतु काहीही झाले तरी माझ्या मुलाला तिकडे बिलकूल घेऊन जाऊ नकोस.”
9 तेव्हा त्याच्या सेवकाने आपल्या धन्याच्या मांडीखाली हात ठेवून तशी शपथ घेतली.
शोध सुरु होतो
10 अब्राहामाचे दहा उंट घेऊन त्याचा सेवक निघाला; त्याने आपल्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर व मोलवान वस्तू देणग्या देण्यासाठी घेतल्या; तो अराम-नहाराईम मेसोपोटेमीयातील (म्हणजे मसोपटेम्या) नाहोर राहात असलेल्या नगरात गेला. 11 तो सेवक नगराबाहेरच्या विहिरीजवळ गेला संध्याकाळी पाणी नेण्यासाठी बायका तेथे येत असत. त्याने उटांना विसावा घेण्यासाठी तेथे बसवले.
12 सेवक म्हणाला, “हे परमेश्वर देवा, तू माझा स्वामी अब्राहाम याचा परमेश्वर आहेस; आजच त्याच्या मुलासाठी मला मुलगी सापडावी असे कर; कृपया, माझा मालक अब्राहाम ह्याच्यावर एवढी दया कर. 13 मी येथे या विहिरीजवळ उभा राहात आहे. 14 मी तर इसहाकासाठी योग्य मुलगी निवडण्याकरिता काही विशेष खुणेचा शोध करीत आहे; तर असे घडू दे, की मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरुन मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर असे म्हणेल, ‘प्या बाबा, आणि मी तुमच्या उंटांसही पाणी पाजते;’ जर असे घडून येईल तर मग तीच इसहाकासाठी योग्य नवरी असल्याचे तू सिद्ध केले आहेस असे होईल आणि तू माझ्या स्वामीवर दया केली आहेस असे मला कळेल.”
नवरी सांपडते
15 मग त्या सेवकाची प्रार्थना संपली नाहीं तोंच अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या, रिबका नावाची एक तरुणी खांद्यावर घागर घेऊन विहिरीपाशी आली; 16 ती फार देखणी व सुंदर मुलगी होती; ती कुमारी होती; ती पुरुषाबरोबर कधीच निजली नव्हती. विहिरीत उतरुन तिने घागर भरली. 17 तेव्हा सेवक धावत जाऊन तिला म्हणाला, “मुली, तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज.”
18 तेव्हा ताबडतोब रिबकेने आपल्या खांद्यावरील घागर उतरुन त्याला पाणी पाजले; ती म्हणाली, “प्या बाबा;” 19 त्याचे पुरेसे पाणी पिऊन झाल्यावर ती म्हणाली, “तुमच्या उंटांनाही भरपूर पाणी पाजते.” 20 मग तिने लगेच उंटासाठी घागर डोणीत ओतली आणि आणखी पाणी आणण्याकरिता ती धावत विहिरीकडे गेली, या प्रमाणे तिने सगळ्या उंटांना भरपूर पाणी पाजले.
21 तेव्हा तो सेवक अचंबा करुन तिच्याकडे पाहात राहिला; परमेश्वराने आपल्या प्रार्थनेचे उत्तर देऊन आपला प्रवास यशस्वी केला की काय अशी खात्री करण्याकरिता तो शांतपणे विचार करीत उभा राहिला.
यहूदी आणि नियमशास्त्र
17 परंतु आता तुम्ही जे स्वतःला यहूदी समजता आणि नियमशास्त्रावर विश्वास ठेवता व आपण देवाच्या जवळचे आहोत असा अभिमान बाळगता, 18 त्या तुम्हांला त्याची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या तुम्ही स्वीकारता कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हांला शिक्षण मिळाले आहे. 19 तुम्हाला वाटतें की ज्यांना योग्य मार्ग माहित नाही त्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात, जे लोक अंधारात (पापांत) आहेत, त्यांचा तुम्ही प्रकाश आहात आणि तुमची खात्री झाली आहे की तुम्ही आंधळ्यांचें पुढारी, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, 20 मूर्खांचे शिक्षक, बालकांचे गुरु आहात, कारण नियमशास्त्रात तुम्हांला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरुप मिळाले आहे. 21 तर मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता ते तुम्ही स्वतःला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करु नये असा उपदेश करता पण तुम्ही स्वतः चोरी का करता? 22 तुम्ही व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही मूर्तिचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता? 23 तुम्ही नियमशास्त्राविषयी बढाई मारता, ते तुम्ही नियमशास्त्र मोडून देवाचा अपमान का करता? 24 शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुमच्यामुळे “विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे.” [a]
25 तुम्ही नियमशास्त्र पाळीत असला तर सुंतेला मोल आहे. पण जर तुम्ही नियमशास्त्र पाळीत नाही तर, तुमची सुंता न झाल्यासारखी आहे. 26 सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर त्याची सुंता न होणे हे सुंता झाल्याप्रमाणे समजण्यात येणार नाही काय? 27 ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुंता झाली नाही आणि जो नियमशास्त्र पूर्ण करतो, तो ज्या तुम्हांला लिखित नियम व सुंता आहे, तरी नियमशास्त्र मोडता त्या तुमचा न्याय करील.
28 कारण जो बाहेरुन यहूदी आहे तो खरोखर यहूदी नाही व देहाची बाह्यत्कारी सुंता ही सुंता नव्हे. 29 पण जो अंतःकरणाचा यहूदी, तो यहूदी आहे आणि खरी सुंता लेखी नियमांद्वारे नव्हे तर आत्म्याने अंतःकरणाची केलेली सुंता होय, त्याची प्रशंसा माणसांकडून नव्हे, तर देवाकडून होते.
2006 by World Bible Translation Center