Revised Common Lectionary (Semicontinuous)
ज्ञान, एक चांगली स्त्री
8 ऐक, ज्ञान आणि समजूतदारपणा तुला
तू ऐकावेस म्हणून तुला बोलावत आहेत.
2 ते टेकडीच्या माथ्यावर जिथे रस्ते मिळतात,
तिथे उभे आहेत.
3 ते शहराच्या दरवाजाशी आहेत.
ते उघड्या दरवाजातून बोलावत आहेत.
4 ज्ञान (रुपी स्त्री) म्हणते, “लोक हो! मी तुम्हाला बोलावत आहे.
मी सगळ्या लोकांना बोलावत आहे.
22 “खूप पूर्वी सुरुवातीला परमेश्वराने
प्रथम माझीच निर्मिती केली.
23 आरंभीला मला निर्माण केले गेले.
जगाची सुरुवात होण्यापूर्वी मी निर्माण झाले.
24 महासागराच्या आधी माझा जन्म झाला.
पाणी उत्पन्न होण्या आधी मी होते.
25 पर्वतांच्या आधी माझा (ज्ञानाचा) जन्म झाला.
डोंगरांच्या आधी माझा जन्म झाला.
26 परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्याआधीच मी जन्मले.
शेतांच्या आधी माझा जन्म झाला.
देवाने पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच माझा जन्म झाला होता.
27 परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते.
परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते.
त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते.
28 परमेश्वराने आकाशात ढग ठेवण्याआधी माझा जन्म झाला.
आणि परमेश्वराने समुद्रात पाणी ठेवले तेव्हाही मी तिथे होते.
29 परमेश्वराने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते.
पाणी परमेश्वराच्या संमती शिवाय चढू शकत नाही.
परमेश्वराने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा मी तिथे होते.
30 एखाद्या कसलेल्या कामगारासारखी मी त्याच्या बाजूला होते.
माझ्यामुळे परमेश्वर रोज आनंदी असे.
मी त्याचा आनंद होते.
31 त्याने निर्माण केलेल्या जगाविषयी परमेश्वर उत्सुक होता.
तो तिथे निर्माण केलेल्या लोकांबद्दल आनंदी होता.
प्रमुख गायकासाठी गित्तीथ सुरावर [a] बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
8 परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे.
तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करुन दिला आहे.
2 मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू
येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.
3 परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो.
आणि मला आश्चर्य वाटते.
4 लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात?
तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस?
लोक [b] तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत?
तू त्यांची दखल तरी का घेतोस?
5 परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात.
तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.
6 तू लोकांना तू निर्माण केलेल्या
सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस.
7 लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात.
8 ते आकाशातल्या पक्ष्यांवर
आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात.
9 परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.
देवाशी नीतिमान
5 ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमान ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे. 2 आता आपण ज्या कृपेमध्ये आहोत, त्यात त्याच्याद्धारे विश्वासाने आम्हीसुद्धा प्रवेश मिळविला आहे. आणि आम्ही देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या आशेने अभिमान बाळगतो. 3 याशिवाय आम्ही संकटांतही अभिमान बाळगतो; कारण आम्हांस ठाऊक आहे की, या संकटांमुळे आम्हांला अधिक धीर येतो. 4 आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्र होते. 5 आणि आशा लाजवित नाही. कारण आपणांस दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीति ओतली आहे.
12 “मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे. तुम्हांला झेपणार नाही इतके सांगायचे आहे. 13 पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो, तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्यात मार्गदर्शन करील, तो त्याचे स्वतःचे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे, त्याविषयी तो तुम्हांला सांगेल. 14 जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हांला कळवून तो माझे गौरव करील. 15 जे सर्व पित्याचे आहे, ते माझे आहे. या कारणासाठीच मी म्हणालो, की आत्मा जे माझे आहे त्यातून घेईल आणि ते तुम्हांला कळवील.
2006 by World Bible Translation Center