Revised Common Lectionary (Semicontinuous)
एक गाणे कोरहाच्या मुलांचे स्तोत्र
48 परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात,
त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
2 देवाचे पवित्र शहर सुंदर आहे.
त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते
सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे.
हे त्या महान राजाचे शहर आहे.
3 इथे त्या शहराच्या राजवाड्यांत
देवाला किल्ला म्हणतात.
4 एकदा काही राजे भेटले.
त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली
ते सगळे चालून आले.
5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले.
ते घाबरले आणि पळत सुटले.
6 भयाने त्यांना घेरले,
भीतीने त्यांचा थरकाप झाला.
7 देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास
आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस.
8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात,
आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले.
देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो.
10 देवा तू प्रसिध्द आहेस.
पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात
तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.
11 देवा, सियोन पर्वत आनंदी आहे
यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
12 सियोन भोवती फिरा,
शहर बघा, बुरुज मोजा.
13 उंच भिंती बघा, सियोनच्या राजवाड्याचे कौतुक करा.
नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14 देव खरोखरच नेहमी आपला देव असेल.
तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.
बलामचा तिसरा संदेश
24 इस्राएलला आशीर्वाद द्यायची परमेशवराची इच्छा आहे हे बलामने पाहिले. म्हणून त्याने ते कुठल्याही प्रकारची जादू वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने वाळवंटाकडे पाहिले. 2 बलामने वाळवंटाच्या कडे पाहिले आणि त्याला इस्राएलचे सगळे लोक दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गंटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला. 3 आणि बलामने हे शब्द उच्चारले:
“हा निरोप बौराचा मुलगा बलाम याच्याकडून आहे.
मला ज्या गोष्टी स्पष्ट दिसतात त्याविषयी मी बोलतो.
4 मी हा निरोप देवाकडून ऐकला.
सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले.
मला जे दिसले त्याबद्दल मी नतमस्तक होऊन सांगत आहे.
5 “याकोबाच्या माणसांने तुमचे तंबू सुंदर आहेत.
इस्राएल लोकांनो तुमचीघरे सुंदर आहेत.
6 तुम्ही झऱ्याच्या काठी लावलेल्या बागेसारखे आहात.
नदीकाठी वाढणाऱ्या बागे प्रमाणे तुम्ही आहात.
तुम्ही परमेश्वराने लावलेल्या, गोड सुगंध असणाऱ्या झुडपाप्रमाणे आहात.
पाण्याजवळ वाढणाऱ्या सुंदर झाडाप्रमाणे तुम्ही आहात.
7 तुमच्याकडे नेहमी भरपूर पाणी असेल.
तुमचे बी वाढण्यासाठी लागणारे पाणी तुमच्याकडे भरपूर असेल.
तुमचा राजा अगागच्या राजापेक्षा थोर असेल.
तुमचे राज्य खूप महान असेल.
8 “देवाने त्या लोकांना मिसरमधून आणले.
ते रानटी बैलासारखे शक्तिशाली आहेत.
ते त्यांच्या सर्व शत्रूंचा पराभव करतील.
ते त्यांची हाडे मोडतील आणि त्यांचे बाण तोडतील.
9 इस्राएल सिंहासारखा आहे.
तो वेटोळे करून झोपला आहे.
होय! तो लहान सिंहाप्रमाणे आहे
आणि त्याला उठवायची कोणीही इच्छा धरत नाही.
जो माणूस तुला आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद मिळेल.
जो माणूस तुझ्या विरुद्ध बोलेल त्याच्यावर संकटे येतील.”
10 बालाक बलामवर खूप रागावला. तो बलामला म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंविरुद्ध बोलण्यासाठी बोलावले, पण तू त्यांना आशीर्वाद दिलास. तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास. 11 आता इथून जा. घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते. परंतु परमेश्वराने तुझे इनाम हिरावून घेतले.”
12 बलाम बालाकाला म्हणाला, “तूच माझ्याकडे माणसे पाठविलीस. त्या माणसांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो, 13 ‘बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वतः काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेव्हढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या माणसांना सांगितले होते.’ 14 आता मी माझ्या माणसांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांना काय करतील ते सांगतो.”
कुमारी मरीया
26-27 अलीशिबाच्या सहाव्या महिन्यात, देवाने गब्रीएल दूताला गालीलातील नासरेथ गावी पाठविले.योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती, तिच्याकडे गब्रीएलाला पाठविण्यात आले. योसेफ हा दाविदाच्या [a] घराण्यातील होता. तिचे नाव मरीया होते. 28 गब्रीएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, “अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभु तुझ्याबरोबर आहे.”
29 परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करु लागली.
30 देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. 31 ऐक! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. 32 तो महान होईल व त्याला सर्वोच्य देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभु देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल. 33 याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी तो सत्ता चालवील त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.”
34 तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल?”
35 देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील. 36 आणि याकडे लक्ष दे: तुझी नातेवाईक अलीशिबा जरी वांझ असली तरी तीसुद्धा गरोदर आहे व तिच्या पोटी पुत्र आहे. आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले की तुला मूल होणार नाही तिला आता सहावा महिना आहे! 37 कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”
38 मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, आपण म्हणालात तसे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिला सोडून गेला.
2006 by World Bible Translation Center