Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 104:24-34

24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
    तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
25 समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे!
    आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात.
तिथे लहान मोठे प्राणी आहेत.
    मोजता न येण्याइतके.
26 समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान,
    तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो.

27 देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत.
    तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.
28 देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस.
    तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.
29 आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात.
    त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात.
    ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.
30 पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात
    आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.

31 परमेश्वराचे वैभव सदैव राहो!
    परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो.
32 परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते.
    त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.

33 मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन.
    मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.
34 मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते.
    मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.

स्तोत्रसंहिता 104:35

35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो.
    दुष्ट लोक कायमचे निघून जावोत.

माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
    परमेश्वराची स्तुती कर.

यशया 32:11-17

11 स्त्रियांनो, आता तुम्ही शांत आहात पण तुम्हाला भिती वाटली पाहिजे. आता तुम्हाला सुरक्षित वाटते, पण तुम्ही चिंता केली पाहिजे. तुमची चांगली वस्त्रे काढा आणि शोकप्रदर्शक कपडे घाला. ते कपडे तुमच्या कमरेभोवती गुंडाळा. 12 दु:खाने भरलेल्या छातीवर शोकप्रदर्शक कपडे चढवा. रडा! कारण तुमची शेते उजाड झाली आहेत. तुम्हाला द्राक्षे देणारे तुमचे द्राक्षमळे ओस पडले आहेत. 13 माझ्या लोकांच्या भूमीसाठी शोक करा. कारण तेथे फक्त काटेकुटे आणि तण माजतील. एकेकाळी आनंदाने भरलेल्या शहरासाठी व हर्षभरित घरांसाठी आता शोक करा.

14 लोक राजधानी सोडून जातील. राजवाडा व बुरूज रिकामी पडतील. लोक घरांत न राहता गुहेत राहतील. रानगाढवे व मेंढ्या शहरात राहतील. जनावरे गवत खाण्यास तेथे जातील.

15-16 देव वरून त्याचा आत्मा आम्हांला देईपर्यंत असेच घडत राहील. आता या भूमीवर चांगुलपणा राहिला नाही. ही भूमी जणू वाळवंट झाली आहे. पण भविष्यात, ते वाळवंट कर्मेल प्रमाणे होईल. तेथे योग्य न्याय नांदेल आणि कर्मेल हिरव्यागार रानासारखे होईल. चांगुलपणा तेथे वस्ती करील. 17 तो चांगलुपणा कायमची शांती आणि सुरक्षितता आणील.

गलतीकरांस 5:16-25

आत्मा आणि मानवी स्वभाव

16 पण मी म्हणतो: तुम्ही आत्म्यात चाला, आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही. 17 कारण आपला देह ज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे, आणि आत्मा जी इच्छा करतो, ती देहाविरुद्ध आहेत. परिणाम म्हणून तुम्हांला जे करावयास पाहिजे ते करता येत नाही. 18 पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.

19 देहाची कर्मे तर उघड आहेत, ती म्हणजे, जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, 20 मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी, मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद, 21 दारुबाजी, रंगेलपणा, अशासारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी. या गोष्टीविषयी मी तुम्हांला सूचना देत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हांला सूचना केल्या होत्या. जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्या राज्यात वाटा मिळणार नाही. 22 पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, 23 सौम्यता व आत्मसंयमन. अशा गोष्टीविरुद्ध नियमशास्त्र नाही. 24 जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहस्वभावला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे. 25 जर आम्ही आत्म्याने जगतो, तर तो जसा चालवितो तसे आम्हीसुद्धा त्याच्यामागे चालू या.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center