Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
29 देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
2 परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा.
तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.
3 परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो
गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.
4 परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते.
त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
5 परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो.
परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6 परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते.
सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
7 परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.
8 परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो
कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.
9 परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो.
परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.
10 महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता
आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो.
परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.
पवित्र करारकोश मंदिरात आणण्यात येतो
2 पुढे शलमोनाने परमेश्वराचा करारकोश दावीदनगराहून म्हणजेच सीयोनमधून आणण्यासाठी इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी, आपापल्या घराण्यांचे प्रमुख, यांना यरुशलेम येथे बोलावून घेतले. 3 सातव्या महिन्यातील मंडपाच्या सणाच्या दिवशी सर्व इस्राएल लोक शलमोनाकडे आले.
4 सर्व इस्राएलाचे वडीलधारे जमल्यावर लेवींनी करारकोश उचलून घेतला. 5 याजक आणि लेवी यांनी मिळून तो यरुशलेमला आणला. दर्शन मंडप आणि तेथे असलेली सर्व पवित्र उपकरणेही त्यांनी बरोबर आणली. 6 राजा शलमोन आणि इस्राएलाचे लोक करारकोशाला सामोरे गेले. कोशासमोर त्यांनी मेंढरांचे आणि गुराढोरांचे बळी अर्पण केले. मोजदाद करता येऊ नये इतके प्राणी त्यांनी बळी दिले. 7 एवढे झाल्यावर, मंदिराच्या आतल्या मुद्दाम तयार करवून घेतलेल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्यात याजकांनी तो परमेश्वराचा करारकोश आणला. करुबांच्या पखांच्या बरोबर खाली तो त्यांनी ठेवला. 8 कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि त्याचे दांडे त्यांनी झाकले. 9 हे दांडे सर्वांत पवित्र गाभाऱ्यासमोरुन दिसतील इतके लांब होते. पण मंदिराच्या बाहेरुन ते दिसत नसत. आजपर्यंत ते तेथे आहेत. 10 दोन दगडी पाट्यांखेरीज या करार कोशात काहीही नव्हते. होरेब पर्वतावर मोशेने त्या दोन पाट्या या करार कोशात ठेवल्या होत्या. इस्राएल लोक मिसरमधून बाहेर पडल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी जो करार केला तो या होरेब पर्वतावरच.
11 एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले. ते सर्व शुचिर्भूत झाले होते. ते सर्व नेमके कोणकोणत्या गटातले होते हे यावेळी महत्वाचे नव्हते. आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले. 12 मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले. आसाफ, हेमान आणि यदुथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते. त्यांची मुले आणि भाऊबंददेखील आले होते. यासर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती. झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये त्यांनी हातात घेतली होती. या लेवी गायकांबरोबर 120 याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते. 13 गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्याला धन्यवाद दिले. कर्णे, झांजा इत्यादी वाद्यांचा एक जल्लोष उडाला. त्यांच्या गाण्याचा आशय असा होता:
“परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे.
त्याची खरी प्रीति सर्वकाळ राहाते.”
तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले. 14 त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, इतके परमेश्वराच्या तेजाने देवाचे मंदिर भरुन गेले होते.
पौल त्याच्या कामाविषयी सांगतो
19 यासाठी, “अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टान्त झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही. 20 उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरुशलेमातील, यहूदा प्रांतातील सर्व आणि यहूदीतर विदेशी लोकांनासुद्धा प्रभुच्या वचनाची साक्ष दिली. त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले.
21 “या कारणांमुळे मी मंदिरात असताना यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे. 22 जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही. 23 त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त (मशीहा) तो दु:ख सहन करील. आणि मेलेल्यांतून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल. यहूदी लोकांना तसेच इतर विदेशी लोकांना देव प्रकाशात नेईल.”
पौल अग्रिप्पाचे मन वळविण्याचा प्रयत्न करतो
24 पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्याला मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे!”
25 पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे. 26 येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे, आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो. त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते. मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही. 27 अग्रिप्पा महाराज, भविष्यावाद्यांनी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे हे मला नक्की माहीत आहे.”
28 यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?”
29 पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंति आहे.”
2006 by World Bible Translation Center