Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
29 देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
2 परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा.
तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.
3 परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो
गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.
4 परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते.
त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
5 परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो.
परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6 परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते.
सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
7 परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.
8 परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो
कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.
9 परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो.
परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.
10 महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता
आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो.
परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.
16 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली व परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्वकाही त्याने केले.
17 योग्य वेळी म्हणजे दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवास मंडपाची उभारणी झाली. 18 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवास मंडप उभा केला; प्रथम त्याने खुर्च्या (बैठक) बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळया लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले; 19 त्यानंतर पवित्र निवास मंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.
20 मोशेने करार घेऊन आज्ञापटाच्या कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले. 21 मग मोशेने तो कोश पवित्र निवास मंडपात नेला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून आज्ञापटाचा कोश झाकला; अशा रीतीने त्याने पवित्र कोश सुरक्षित केला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. 22 मग मोशेने पवित्र निवास मंडपाच्या उत्तर बाजूस दर्शन मंडपात अंतरपटाच्या समोर मेज ठेवले; 23 मग त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. 24 मग त्याने पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपात मेजासमोर दीपवृक्ष ठेवला। 25 नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे ठेवले; परमेश्वरने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
26 मग त्याने दर्शनमंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली. 27 नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. 28 मग त्याने पवित्र निवास मंडपाच्या दाराला पडदा लावला.
29 त्याने पवित्र निवास मंडपाच्या दर्शन मंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे वाहिली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
30 मग त्याने दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरले. 31 मोशे, अहरोन व अहरोनाची मुले त्यात आपापले हातपाय धूत असत; 32 ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
33 मग त्याने पवित्र निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला; ह्या प्रकारे परमेश्वराने सांगितल्या प्रमाणे मोशेने सर्व काम संपविले.
परमेश्वराचे तेज
34 मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. 35 दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने पवित्र निवास मंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
36 पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरु करीत; 37 परंतु तो मेघ पवित्र निवास मंडपावर असे पर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाई पर्यंत ते तेथेच थांबत. 38 परमेश्वराचा मेघ दिवसा पवित्र निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांना आपल्या प्रवासात तो दिसत असे.
35 दुसऱ्या दिवशी सकाळी पुढाऱ्यांनी काही शिपायांना पाठविले व तुरुंगाधिकाऱ्याला निरोप दिला की, “त्या लोकांना (पौल व सीला) यांना मोकळे सोडा!”
36 तुरुंग आधिकारी पौलाला म्हणाला, “पुढाऱ्यांनी या शिपायांना तुम्हाला सोडण्याविषयी सांगितले आहे. तुम्ही आता जाऊ शकता. शांतीने जा.”
37 परंतु पौल त्या शिपायांना म्हणाला, “तुमच्या पुढाऱ्यांनी आम्ही चूक केली आहे हे सिद्ध केले नाही. परंतु त्यांनी आम्हांला लोकांसमोर मारले व तुरुंगात टाकले. आम्ही रोमी नागरिक आहोत म्हणून आम्हांला अधिकार आहेत. आता पुढाऱ्यांना वाटते की आम्ही गुप्त्पणे निघून जावे. नाही! पुढाऱ्यांनी येऊन आम्हांना बाहेर काढले पाहिजे!”
38 शिपायांनी पुढाऱ्यांना पौल जे म्हणाला, ते सांगितले, जेव्हा पुढाऱ्यांनी ऐकले की पौल व सीला रोमी नागारिक आहेत, तेव्हा ते घाबरले. 39 मग पुढाऱ्यांनी येऊन त्यांची क्षमा मागितली. पुढाऱ्यांनी येऊन त्यांना सोडविले व शहर सोडण्याविषयी सांगितले. 40 पण जेव्हा पौल व सीला तुरुंगाबाहेर आले, तेव्हा ते लीदीयाच्या घरी गेले. त्यांनी तेथे काही विश्वासणाऱ्यांना पाहिले, व त्यांना धीर दिला, मग पौल व सीला गेले.
2006 by World Bible Translation Center