Revised Common Lectionary (Semicontinuous)
97 परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते.
दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
2 परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत.
चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
3 अग्नी परमेश्वराच्या पुढे जातो
आणि शत्रूंचा नाश करतो.
4 त्याची वीज आकाशात चमकते.
लोक ती बघतात आणि घाबरतात.
5 परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात.
ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.
6 आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा
प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
7 लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात.
ते त्यांच्या “देवाला” नावजतात.
परंतु त्या लोकांना लाज वाटेल.
त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
8 सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का?
कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
9 परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस.
तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
10 जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो.
देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
11 चांगल्या लोकांवर प्रकाश
आणि सुख चमकते.
12 चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा.
त्याच्या पवित्र नावाला मान द्या.
मोशे परमेश्वराचे तेज पाहातो
12 मोशे परमेश्वराला म्हणाला, “ह्या लोकांना घेऊन जाण्यास तू मला सांगितलेस, परंतु तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार ते तू सांगितले नाहीस; तू मला म्हणालास, ‘मी तुला तुझ्या नांवाने ओळखतो आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.’ 13 जर मी तुला खरोखर संतोष दिला असेल तर तू मला तुझे मार्ग शिकव. तुला जाणून घेण्याची माझी इच्छा आहे मग तुला सतत संतोष देणे मला जमेल. हे सर्व लोक तुझे आहेत याची तू आठवण ठेव.”
14 परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वतः तुझ्या बरोबर येईन व तुला विसावा देईन.”
15 मग मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग आम्हाला या ठिकाणापासून पुढे पाठवू नकोस. 16 तसेच तू माझ्या विषयी व लोकांविषयी संतुष्ट आहेस ते आम्हाला कसे कळेल? जर तू आमच्याबरोबर येशील तर मग मात्र आम्हाला खातरीने कळेल! जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग मी व हे लोक त्यांच्यात आणि पृथ्वीवरल कोणत्याही लोकात काही फरक राहणार नाही.”
17 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मागतोस त्याप्रमाणे मी करीन, कारण मी तुजवर संतुष्ट आहे आणि मी तुला तुझ्या नांवाने ओळखतो.”
6 नंतर देवदूत मला म्हणाला, “हे शब्द विश्वासयोग्य आणि खरे आहेत. जो प्रभु संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा प्रभु आहे, त्याने आपला दूत पाठविला. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या सेवकांना दाखवून देण्यासाठी त्याने आपला दूत पाठविला आहे.” 7 “पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य!”
8 ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पाया पडून मी त्याची उपासना करु लागलो. 9 परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करु नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे ह्या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक सेवक आहे. देवाची उपासना कर!”
2006 by World Bible Translation Center