Revised Common Lectionary (Semicontinuous)
93 परमेश्वर राजा आहे.
त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे.
तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे.
ते कंपित होणार नाही.
2 देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे.
देवा, तू सदैव जीवंत आहेस.
3 परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे.
आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
4 समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि
त्यांचा आवाज खूप मोठा आहे.
परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
5 परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. [a]
तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.
20 आणि हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मीखाचा मुलगा अब्दोन, चिटणीस शाफान आणि आपला सेवक असाया यांना योशीयाने आज्ञा केली की. 21 “माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वराला जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्याला विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.”
22 हिल्कीया आणि राजाचे सेवक हुल्दा या संदेष्टीकडे गेले. हुल्दा ही शल्लूमची बायको. शल्लूम ताकहतचा आणि ताकहत इस्त्राचा मुलगा. इस्त्रा राजाच्या वस्त्रागाराचा प्रमुख होता. हुल्दा यरुशलेमच्या नवीन भागात राहात होती. हिल्कीया आणि राजाचे सेवक [a] यांनी तिला सर्व हकीगत सांगितली. 23 हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलचा परमेश्वर देव याचे म्हणणे असे आहे: राजा योशीयाला म्हणावे: 24 परमेश्वर म्हणतो, ‘या प्रदेशावर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाला जे पुस्तक वाचून दाखवण्यात आले. त्यातील मजकुरात आहेत ती सर्व संकटे त्यांच्यावर ओढवतील. 25 माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूंप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला क्रुध्द् केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही.’
26 “पण यहूदाचा राजा योशीया याला सांग. त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की ‘तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणतो: 27 योशीया, पश्चात्तापाने तू माझ्यापुढे विनम्र झालास. खेदाने आपले कपडे फाडलेस. तू रडलास. तू मृदू अंतःकरणाचा असल्यामुळे 28 तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन. [b] तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत.’” हिल्कीया आणि राजाचे सेवक या सर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला.
29 तेव्हा राजा योशीयाने यहूदा आणि यरुशलेममधील सर्व वडीलधाऱ्यांना भेटीसाठी एकत्र बोलावले. 30 राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. यहूदातील सर्व प्रजा, यरुशलेममधील सर्व थोर तसेच सामान्य माणसे, याजक आणि लेवी हे सर्व राजासोबत होते. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने तेथे राजाने त्यांना वाचून दाखवली. 31 मग राजा उभा राहिला. त्याने परमेश्वराशी करार केला. परमेश्वराला अनुसरायचे, त्याचे आज्ञा, नियम आणि विधी पाळायचे त्याने कबूल केले. हे सर्व त्याने मनःपूर्वक करायचे मान्य केले. नियमशास्त्रातील वचनांप्रमाणे वागायचे कबूल केले. 32 मग त्याने यरुशलेम आणि बन्यामिन मधील लोकांना ही या करारपालनात सामील करुन घेतले. यरुशलेमचे लोक आपल्या पूर्वजांच्या देवाचा कारार पाळू लागले. 33 इस्राएलमध्ये वेगवेगळ्या देशांमधल्या विविध मूर्ती होत्या. पण त्या सर्व अनिष्ट मूर्ती योशीयाने फोडून तोडून टाकल्या. इस्राएल लोकांना त्याने परमेश्वर देवाची सेवा करायला लावले. आणि योशीया जिवंत असेपर्यंत लोक आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचीच उपासना करत होते.
शिमोन येशूला पाहतो
25 यरुशलेम येथे एक मनुष्य होता, त्याचे नाव शिमोन होते; तो नीतिमान आणि भक्तिशील होता. इस्राएलाचे सांत्वन होण्याची तो वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता. 26 पवित्र आत्म्याने त्याला दाखवून दिले की, प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तो मरणार नाही. 27 आत्म्याने भरलेला तो मंदिरात गेला. आणि येशूच्या आईवडिलांनी बाळाला नियमशास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे करण्यासाठी त्याच्याजवळ आणले. 28 शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले, आणि त्याने देवाची स्तुति केली. तो म्हणाला:
29 “आता, प्रभु, आपल्या वचनाप्रमाणे आपल्या सेवकाला जाऊ दे,
30 कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे,
31 जे तू सर्व लोकांच्या समोर केलेस.
32 तो यहूदीतर लोकांना तुझा मार्ग प्रगट करण्यासाठी प्रकाश असा आहे.
आणि तो तुझे लोक इस्राएल यांच्यासाठी गौरव असा आहे.”
33 त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले. 34 मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, तो येशूची आई मरीया हिला म्हणाला, “इस्राएलात, हे मूल, अनेकांचे पडणे व उठणे यांस कारणीभूत ठरेल. जे चिन्ह नाकारले जाईल ते होण्याकरिता याची नेमणूक झाली आहे. 35 अनेकांच्या मनातील विचार प्रगट होण्यासाठी तुझ्या जिवातून तरवार आरपार जाईल.”
हन्ना येशूला पाहते
36 तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी स्त्री होती. ती फनूएलाची मुलगी होती. ती अशेर वंशाची होती. ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली. 37 ती विधवा असून आता चौऱ्याऐंशी वर्षांची होती. तिने मंदिर कधीही सोडले नाही; उपास व प्रार्थना करुन ती रात्रंदिवस उपासना करीत असे.
38 ती त्यावेळी बालकाच्या आईवडिेलांकडे आली व तिने देवाचे आभार मानले. आणि जे यरुशलेमच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
2006 by World Bible Translation Center