Revised Common Lectionary (Semicontinuous)
93 परमेश्वर राजा आहे.
त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे.
तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे.
ते कंपित होणार नाही.
2 देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे.
देवा, तू सदैव जीवंत आहेस.
3 परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे.
आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
4 समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि
त्यांचा आवाज खूप मोठा आहे.
परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
5 परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. [a]
तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.
इतर सैनिक दावीदाला येऊन मिळतात
16 बन्यामिन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले. 17 दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही सदभावनेने आला असाल तर तुमचे स्वागत असो. तुम्ही माझ्याकडे या पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून तुम्हाला शासन करो.”
18 अमासय हा तीस वीरांचा सरदार होता. त्याच्यात परमेश्वरी आत्म्याचा साक्षात्कार झाला आणि तो म्हणाला,
“दावीदा, आम्ही तुझ्या बाजूचे
आहोत इशायाच्या मुला,
आम्ही तुझ्या पाठीशी आहोत शांती असो!
तुला साहाय्य करणाऱ्यांनाही शांती असो.
कारण देव तुझा पाठीराखा आहे.”
तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.
19 मनश्शेच्या वंशातील काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. दावीद पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण दावीदाने आणि त्याच्या सैन्याने पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी दावीदाची मदत घेण्याचा विचार केला पण मग त्यांनी त्याला परत पाठवले. त्यांनी विचार केला, “दावीद जर आपला स्वामी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपला शिरच्छेद होईल.” 20 दावीद सिक्लागला गेला. त्याच्या बरोबर आलेले मनश्शेचे लोक याप्रमाणे: अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, आणि सिलथय. हे सर्व मनश्शे वंशातील सरदार होते. 21 लुटारुंना तोंड द्यायला त्यांनी दावीदाला मदत केली. या लुटारुंच्या टोळ्या देशभर लोकांना त्रस्त करत होत्या. मनश्शे वंशातील लोक मात्र शूर होते. दावीदाच्या सैन्यात ते अधिकारपदावर चढले.
22 दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत रोजच्यारोज भर पडत गेली. त्यामुळे त्यांचे सैन्य वरचढ होत गेले.
5 जो सिंहासनावर बसलेला होता, तो म्हणाला, “पाहा मी सर्व काही नवीन करीत आहे!” मग तो पुढे म्हणाला, “लिही! कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत.”
6 नंतर तो मला म्हणाला, “पूर्ण झाले आहे! मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे, त्याला मी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन. 7 जो विजय मिळवितो, त्याला या सर्व गोष्टी मिळतील, मी त्याचा देव होईन, व तो माझा पुत्र होईल. 8 परंतु भित्रे, विस्वास न ठेवणारे अंमगळ, खुनी, व्यभिचारी, (म्हणजे लैंगिक अनीतीने वागणारे लोक), चेटकी, मूर्तिपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्या तळ्यामध्ये जागा मिळेल. हे दुसरे मरण आहे.”
9 मग ज्या देवदूतांच्या हातात सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या होत्या. त्यांच्यापैकी एक देवदूत आला, आणि तो मला म्हणाला, “इकडे ये! जी कोकऱ्याची वधु आहे, ती मी तुला दाखवितो.” 10 मी आत्म्याने भरुन गेलो असता देवदूत मला एका उंच पर्वतावर घेऊन गेला. आणि त्याने पवित्र नगर, यरुशलेम, स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले.
11 ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होते. त्याचे तेज एखाद्या मोलवान रत्नासारखे होते; स्फटिकासारख्या चमकत असणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते. 12 त्या नगराच्या सभोवती मोठमोठ्या उंच भिंती होत्या. आणि त्याला बारा वेशी होत्या. त्या बारा वेशींजवळ बारा देवदूत उभे होते. आणि त्या वेशींवर इस्राएलाच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती. 13 त्या नगरला पूर्व दिशेला तीन, उत्तर दिशेला तीन, दक्षिण दिशेला तीन आणि पश्चिम दिशेला तीन वेशी होत्या. 14 नगराच्या भिंतीना बारा पाये होते. त्या पायांवर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.
2006 by World Bible Translation Center