Revised Common Lectionary (Semicontinuous)
9 त्या रात्री पौलाने एक दृष्टान्त पाहिला, या दृष्टान्तामध्ये “मसेदोनियाला या आणि आम्हांला मदत करा!” अशी विनंति मासेदिनियातील कोणीतरी मनुष्य उभा राहून पौलाला करीत होता. 10 पौलाला हा दृष्टान्त झाल्यावर आम्ही तेथे जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी यासाठी देवाने आम्हांला बोलाविले. हे आम्ही समजलो. आणि लगेच मासेदोनियाला जाण्याच्या तयारीला लागलो.
लीदीयाच्या मनाचा पालट
11 नंतर आम्ही जहाजाने त्रोवस सोडले आणि आम्ही समथ्राकेस येथे समुद्रमार्गे आलो. दुसऱ्या दिवशी नियापोलीस येथे गेलो. 12 नंतर आम्ही फिलिप्पैला गेलो. ते त्या भागातील मासेदोनियातील पहिले नगर आहे. ते रोमी लोकांचे नगर आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.
13 शब्बाथवारी आम्ही त्या नगराच्या वेशीच्या बाहेर प्रार्थना करण्यासाठी नदीकाठी सुरक्षित जागा आढळेल असे वाटल्यावरुन तेथे जाऊन बसलो, आणि तेथे जमा झालेल्या स्त्रियांशी बोलू लागलो. 14 त्यांच्यामध्ये लुदिया नावाची स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती, ती किरमीजी रंगाच्या कापडाचा व्यापार करीत असे, ती चांगली देवभक्त होती. लीदीयाने पौलाचे बोलणे ऐकले. देवाने तिचे अंतःकरण उघडले. पौलाने जे सांगितले त्यावर तिने विश्वास ठेवला. 15 तिचा व तिच्या घरामध्ये राहणाऱ्या सर्वांचा बाप्तिस्मा करण्यात आला. मग लुदियाच्या आम्हांला तिच्या घरी बोलाविले, ती म्हणाली, तुम्हाला जर खरोखरच वाटत असेल की मी प्रभु येशूमध्ये विश्वासणारी आहे, तर माझ्या घरी येऊन राहा. तिने आम्हांला तिच्या घरी राहावे म्हणून गळ घातली.
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तुतिगीत
67 देवा, मला दया दाखव, आणि आशीर्वाद दे.
कृपाकरुन आमचा स्वीकार कर!
2 देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो.
तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
3 देवा, लोक तुझी स्तुती करु देत,
सर्व लोक तुझी स्तुती करु देत.
4 सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे.
का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस
आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.
5 देवा, लोक तुझी स्तुती करोत,
सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6 देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे.
आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.
7 देव आम्हाला आशीर्वाद देवो
आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.
10 मी आत्म्याने भरुन गेलो असता देवदूत मला एका उंच पर्वतावर घेऊन गेला. आणि त्याने पवित्र नगर, यरुशलेम, स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले.
22 त्य नगरात मला कोठेही मंदीर दिसले नाही; 23 प्रभु देवाचे जे तेज ते अखिल नगराला उजेड पुरवीत होते, आणि कोकरा हा त्याचा दिवा आहे. 24 राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील. आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडे आणतील. 25 त्या नगराच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे कधीही रात्र असणार नाही. 26 राष्टांचे वैभव आणि संपत्ती त्या नगरात आणण्यात येतील. 27 जे अशुद्ध आहे, ते त्या नगरात प्रवेश करु शकणार नाही. अथवा लाजिरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे नोंदविली आहेत, केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील.
22 नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती. 2 आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर उगवलेली झाडे जीवनाची झाडे होती. त्यांच्यातील प्रत्येक झाड दरमहा आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्रांना आरोग्य देण्यासाठी उपयोगी पडत होती.
3 त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही. देवाचे सेवक त्याची उपसना करतील. 4 आणि ते त्याचे मुख पाहतील. व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल. 5 त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांना प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरंज पडणार नाही; कारण प्रभु देव आपला प्रकाश त्यांना पुरवील. आणि ते लोक अनंतकाळ राज्य करतील.
23 येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू. 24 जो माझ्यावर प्रीति करीत नाही, तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत. ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत.”
25 “मी तुम्हांजवळ राहत असतानाच तुम्हांस या गोष्टी सांगितल्या आहेत. 26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.
27 “शांति मी तुमच्याजवळ ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका. 28 ‘मी जातो आणि तुम्हांकडे येणार आहे’ असे मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे, जर तुमची माझ्यावर प्रीति असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे. 29 मी तुम्हांला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे. यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा.
तळ्याकाठच्या रोग्याला येशू बरे करतो
5 नंतर एका यहुदी सणासाठी येशू यरुशलेमला गेला. 2 यरुशलेमात एक तळे आहे. त्या तळ्याला लागून पाच पडव्या आहेत. (होत्या) यहूदिभाषेत। [a] त्या तळ्याला बेथेझाथा [b] म्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे. 3 तव्व्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते. [c] 4 कारण की देवदूत वेळोवेळी तव्व्यात उतरुन पाणी हालवीत असे आणि पाणी हालविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. 5 तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक रोगी पडून होता. 6 येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले, तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले. “तुला बरे व्हावयाला पाहिजे का?”
7 त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले, “महाराज, पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ति नाही. सर्वांत अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की, माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो.”
8 मग येशू म्हणाला, “उठून उभा राहा! आपली खाट उचल आणि चालू लाग.” 9 तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला, तो आपली खाट उचलून चालू लागला.
हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता.
2006 by World Bible Translation Center