Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
133 जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात,
तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
2 ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे,
अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
3 हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.
सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.
9 “तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा, आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील झाडून सारेच पीक कापू नका व पीक काढून घेतल्यावर सरवा वेचू नका. 10 आपला द्राक्षमळाही झाडुन सारा खुडू नका, तसेच द्राक्षमळयात खाली पडलेली फळे गोळा करु नका; गोरगरीबांसाठी व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ती राहू द्यावी; मी तुमचा देव परमेश्वर आहे!
11 “तुम्ही चोरी करु नये, कोणाला फसवू नये व एकमेकाशीं खोटे बोलू नये. 12 तुम्ही माझ्या नांवाने खोटी शपथ वाहू नये; तसे कराल तर तुम्ही माझे मय न धरता माझ्या नांवाला कलंक लावाल. मी परमेश्वर आहे!
13 “आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करु नका व त्याला लुबाडू नका; मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका.
14 “बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका; आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका; पण आपल्या देवाचा मान राखा-त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!
15 “न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्यांना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या. 16 इतर लोकाविषयी खोट्यानाट्या गोष्टी सांगत इकडे तिकडे फिरु नका; आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे.
17 “आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगूं नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघाडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये. 18 लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरुन जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
चांगला शोमरोनी
25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”
26 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यांत काय वाचतोस?”
27 तो म्हणाला, “‘तू तुझा देव प्रभु याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीति कर.’ [a] व ‘स्वतःवर जशी प्रीति करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीति कर.’” [b]
28 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू चिरकाल राहशील.”
2006 by World Bible Translation Center