Revised Common Lectionary (Semicontinuous)
148 परमेश्वराची स्तुती करा.
स्वर्गातल्या देवदूतांनो
स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
2 सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 सूर्य-चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा.
ताऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
4 सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा.
आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
5 परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा.
का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
6 देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती
त्या सदैव राहाव्यात म्हणून केली.
देवाने कधीही न संपणारे नियम केले.
7 पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा.
महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
8 देवाने अग्नी आणि गारा, बर्फ
आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
9 देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे
आणि देवदार वृक्ष निर्मिले.
10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि
पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले.
त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या.
देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा.
त्याच्या नावाला सदैव मान द्या.
स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
14 देव त्याच्या माणसांना बलवान करील.
लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील.
लोक इस्राएलची स्तुती करतील.
हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो.
परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्र
8 “मानवपुत्रा, मी तुला ज्या गोष्टी सांगतो, त्या तू लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेस. त्या बंडखोर लोकांप्रमाणे माझ्याविरुद्ध जाऊ नकोस. तुझे तोंड उघड आणि माझे शब्द स्विकार कर. मग ते त्या लोकांना सांग. आता ते खाऊन टाक.”
9 नंतर मी (यहेज्केलने) एक हात माझ्यापर्यंत येताना पाहिला. त्या हातात शब्द लिहिलेला पट होता. 10 मी तो पट उलगडला. त्यावर पुढे व मागे, अनेक प्रकारची शोकगीते, शोककथा व इशारे लिहिलेले होते.
3 देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू जे पाहतोस, ते खा. तो पट खा. मग त्या गोष्टी इस्राएलच्या लोकांना जाऊन सांग.”
2 मग मी तोंड उघडले व त्याने तो पट माझ्या तोंडात घातला. 3 नंतर देव म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुला हा पट देत आहे. तो गीळ. त्याने तुझे पोट भरु दे.”
मग मी तो पट सेवन केला. तो मला मधासारखा गोड लागला.
4 त्या नंतर देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांकडे जा. त्यांना माझे शब्द ऐकव. 5 तुला ज्यांचे बोलणे समजू शकणार नाही, अशा परदेशीयांकडे मी तुला पाठवीत नाही. तुला दुसरी भाषा शिकायची गरज नाही. मी तुला इस्राएल लोकांकडे पाठवीत आहे. 6 तुला समजत नसणाऱ्या भाषा बोलणाऱ्या निरनिराळ्या देशांत मी तुला पाठवीत नाही. जर तू त्या लोकांशी जाऊन बोलला असतास तर त्यांनी तुझे ऐकले असते. पण तुला त्या कठीण भाषा शिकण्याची जरुरी नाही. 7 नाही! मी तुला झ्स्राएल लोकांकडेच पाठवीत आहे. त्यांची मनेच फक्त कठोर आहेत! ते हट्टी आहेत. ते तुझे ऐकायला नकार देतील. त्यांना माझे म्हणणे ऐकण्याची इच्छा नाही. 8 पण मी तुला त्यांच्याप्रमाणेच कठोर बनवीन. तुला त्यांच्याप्रमाणे निष्ठुर बनवीन. 9 हिरा गारगोटीच्या दगडापेक्षा कठीण असतो. त्याचप्रमाणे तू त्यांच्यापेक्षा कठोर होशील. तू जास्त हट्टी होशील, म्हणजे तू त्या लोकांना घाबरणार नाहीस. माझ्या विरुध्द नेहमी जाणाऱ्या लोकांना तू घाबरणार नाहिस.”
10 मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, माझा प्रत्येक शब्द तू ऐकला पाहिजेस, आणि ते शब्द लक्षात ठेवले पाहिजेस. 11 मग परागंदा झालेल्या तुझ्या सर्व लोकांना जाऊन सांग, ‘परमेश्वराने, आपल्या प्रभूने पुढील गोष्टी सांगितल्या:’ ते तुझे ऐकणार नाहीत. पाप करायचे थांबवणार नाहीत, तरी तू ह्या गोष्टी सांगच.”
देवदूत आणि लहान गुंडाळी
10 मग मी आणखी एक शक्तीशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता, त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते. 2 त्याने लहान गुंडाळी धरली होती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता. 3 आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना कली. जेव्हा तो ओरडला, तेव्हा त्या सात मेघगर्जनांनी आपापले शब्द उच्चारले.
4 जेव्हा त्या सात मेघगर्जना बोलल्या, त्यावेळी मी लिहिणार एवढ्यात मला आकाशातून वाणी आली, ती म्हणाली, “सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द बंद करुन ठेव. ते लिहू नको.”
5 मग ज्या देवदूताला मी समुद्रात व जमिनीवर पाहिले होते त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उचलला. 6 जो अनंतकाळ जगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला, “आता आणखी विलंब होणार नाही! 7 पण जेव्हा सातवा देवदूत कर्णा वाजविण्याच्या तयारीत असेल त्या दिवसात देवाची गुप्त योजना पूर्ण होईल. त्याचे सेवक जे संदेष्टे (भविष्यवदी) त्यांना दिलेल्या वचनानुसार घडून येईल.”
8 तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली, “जा, गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे.”
9 म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणला, “ही घे, आणि ही खा. ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल. पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल.” 10 मी ती लहान गुंडाळी देवदूताच्या हातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मदासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझे पोट कडवट झाले. 11 तेव्हा मला सांगण्यात आले, “तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना व राजांना संदेश सांगितले पाहिजेत.”
2006 by World Bible Translation Center