Revised Common Lectionary (Semicontinuous)
36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे. 37 जेव्हा पेत्र लोदमध्ये होता. तेव्हा तबिथा आजारी पडली व मेली. त्यांनी (लोकांनी) तिचे शरीर धुतले व ते माडीवरच्या एका खोलीत ठेवले. 38 यापो येथीला अनुयायांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे. (लोद हे यापोजवळ आहे,) म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली. त्यांनी त्याला विंनति केली. ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या!”
39 पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्कस (तबीथा) जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. 40 पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ!” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली. 41 त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने विश्वासणाऱ्यांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलाविले. त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती!
42 यापोमधील सर्व लोकांना हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. 43 पेत्र यापोमध्ये बरेच दिवस राहिला. तो शिमोन नावाच्या चांभाराकडे राहिला.
दावीदाचे स्तोत्र.
23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
ते मला नेहमी मिळत राहील.
2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
4 मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]
मोठा समुदाय
9 यानंतर मी पाहिले, तेव्हा अफाट लोकसमुदाय मला दिसला. तेथे इतके लोक होते की, कोणालाही ते मोजता आले नसते. ते प्रत्येक राष्ट्राचे, वंशाचे, जमातीचे, आणि भाषेचे लोक होते, हे लोक सिंहासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे होते. त्या सर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातले होते आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या होत्या. 10 ते मोठ्याने ओरडत होते, “तारण आमच्या देवाचे आहे. व आमच्या कोकऱ्याचे आहे, जो सिंहासनावर बसतो.”
11 सर्व देवदूत सिंहासनाभोवती उभे होते आणि वडिलजनांच्या आणि चार प्राण्यांच्या भोवती उभे होते. ते सिंहासनासमोर पालथे पडले आणि त्यांनी देवाची आराधना केली. 12 ते म्हणाले, “आमेन! स्तुति गौरव, शहाणपण, आभार, सन्मान, सामर्थ्य आणि पराक्रम अनंतकाळासाठी आमच्या देवाची आहेत. आमेन!”
13 मग वडीलांपैकी एकाने मला विचारले, “हे पांढरे झगे घातलेले कोण आहेत? व कोठून आले आहेत?”
14 मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.”
आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतली आहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत. 15 म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्या मंदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यांचे रक्षण करील. 16 त्या लोकांना पुन्हा केव्हाच भूक लागणार नाही. त्यांना पुन्हा केव्हाच तहान लागणार नाही, सूर्यामुळे त्यांना बाधा होणार नाही. कोणतीही उष्णता त्यांना जाळून टाकणार नाही. 17 सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. ज्या झऱ्यांचे पाणी जीवन देते तेथे तो त्यांना नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रु पसून टाकील.”
येशूच्या विरोधात यहूदी पुढारी
22 यरुशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सण [a] जवळ आला. तो हिवाळा होता. 23 येशू मंदिरातील शलमोनाच्या देवडीत [b]होता. 24 यहूदी लोक येशूच्याभोवती जमा झाले, आणि म्हणाले. “किती दिवस तुम्ही आम्हांला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्हीच ख्रिस्त असाल तर आम्हांला तसे स्पष्टच सांगा!”
25 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला आधीच सांगितले. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो, ती कामे सुध्दा मी कोण आहे याची साक्ष देतात. 26 पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे (लोक) नाहीत. 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. आणि ती माझ्यामागे येतात. 28 मी माझ्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत. आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही. 29 माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही. 30 माझा पिता आणि मी एक आहोत.”
2006 by World Bible Translation Center