Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र हे स्तोत्र मंदिरअर्पण करण्याच्या वेळचे आहे.
30 परमेश्वरा, तू मला माझ्या संकटांतून वर उचललेस.
तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करु दिला नाहीस
आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन.
2 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी प्रार्थना केली
आणि तू मला बरे केलेस.
3 तू मला थडग्यातून वर उचललेस तू मला जगू दिलेस
तू मला खड्ड्यात झोपलेल्या मृत लोकात राहू दिले नाहीस.
4 देवाचे भक्त परमेश्राची स्तुती करतात.
त्याच्या पवित्र नावाचा महिमा गातात.
5 देव रागावला होता म्हणून
त्याचा निर्णय होता “मृत्यू.”
परंतु त्याने त्याचे प्रेम दाखवले आणि मला “जीवन” दिले आदल्या रात्री मी झोपताना रडत होतो
परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आनंदी होतो व गात होतो.
6 मी जेव्हा सुरक्षित व निर्धास्त होतो
तेव्हा मला कोणीच अपाय करणार नाही असे वाटले.
7 होय, परमेश्वरा तू माझ्याशी दयाळू पणे वागात होतास
तेव्हा कोणीही माझा पराभव करु शकणार नाही असे मला वाटत होते.
परंतु तू माझ्यापासून काही काळापुरता दूर गेलास
आणि मला खूप भीती वाटली.
8 देवा, मी तुझ्याकडे वळलो आणि तुझी प्रार्थना केली.
मी तुला मला दया दाखवण्याची विनंती केली.
9 मी म्हणालो, “देवा, मी मेल्यावर खाली थडग्यात गेलो तर चांगले होईल का?
मेलेले लोक मातीत नुसते झोपतात.
ते तुझी स्तुती करत नाहीत.
आम्ही तुझ्यावर किती अवलंबून आहे हे ते इतरांना सांगू शकत नाहीत.
10 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्यावर दया कर.
परमेश्वरा, मला मदत कर.”
11 मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस.
तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस.
तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुंडाळलेस.
12 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सतत स्तुती करीन.
अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन.
तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल.
भेटीस आलेल्या तीन व्यक्ति
18 काही काळानंतर परमेश्वराने अब्राहामाला पुन्हा दर्शन दिले. अब्राहाम तेव्हा मम्रेच्या एलोन झाडांच्या राईत राहात होता. एके दिवशी भर दुपारी कडक उन्हाच्या वेळी अब्राहाम आपल्या तंबूच्या दाराशी बसला होता. 2 अब्राहामाने वर पाहिले तों आपल्या समोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले; त्यांना पाहून अब्राहाम धावत त्यांना सामोरा गेला आणि त्याने त्यांना लवून नमन केले; 3 अब्राहाम त्यांचे स्वागत करुन म्हणाला, “माझ्या स्वामीनों, मी जो आपला सेवक त्या माझ्या सोबत कृपा करुन काही वेळ राहा; 4 तुमचे पाय धुण्यासाठी मी पाणी घेऊन येतो; तुम्ही झाडा खाली सावलीत अमळ विसावा घ्या; 5 मी तुम्हासाठी थोडी भाकर आणतो; तुम्हाला पाहिजे तेवढे जेवा; मग पुढील प्रवास चालू करा.”
ते तीन पुरुष म्हणाले, “बरं, हे तर ठीक आहे आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो.”
6 अब्राहाम लगेच घाईने पळत तंबूत गेला व साराला म्हणाला, “तिघांना तीन भाकरी पुरतील एवढे पीठ ताबडतोब मळ, त्याच्या भाकरी कर.” 7 नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे पळत गेला, आणि त्यातून त्याने उत्तम कोवळे वासरु घेतले; ते दासाजवळ देऊन त्याने त्याला लवकर कापून जेवणासाठी रांधण्यास सांगितले; 8 अब्राहामाने त्या तीन पुरुषांना वासराचे शिजवलेले मांस, तसेच दूध व लोणी खाण्यासाठी त्यांच्यापुढे वाढले आणि त्यांचे जेवण संपेपर्यंत अब्राहाम राईत झाडाखाली त्यांच्या जवळ त्यांची सेवा करण्याकरीता उभा राहिला.
तुम्हांला बक्षीस दिले जाईल
12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्याला तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, किंवा तुझ्या नातेवाईकांना वा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. 13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. 14 आणि तुला आशीर्वाद मिळतील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही असणार नाही. कारण नीतीमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
2006 by World Bible Translation Center