Revised Common Lectionary (Semicontinuous)
27 त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले. 28 तो म्हणाला, “आम्ही तुम्हांला (येशू) या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती. आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात. आणि या मनुष्याच्या (येशूच्या) मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.”
29 पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्हांला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही! 30 तुम्ही येशूला मारले. तुम्ही त्याला वधस्तंभावर खिळले. परंतु त्याच देवाने, जो आमच्या वाडवडिलांचा (पूर्वजांचा) देव होता, त्याने येशूला मरणातून उठविले! 31 देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसाविले. देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले. देवाने हे यासाठी केले की, यहूदी लोकांनी त्यांची ह्रदये व जीविते बदलावीत. ह्या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या. 32 पवित्र आत्मासुद्धा हे खरे आहे हे दर्शवितो. जे लोक देवाची आज्ञा पाळतात त्या सर्वांना त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे.”
14 परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे.
परमेश्वर मला वाचवतो.
15 चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता.
परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
16 परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत.
परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
17 मी जगेन आणि मरणार नाही
आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
18 परमेश्वराने मला शिक्षा केली
परंतु त्याने मला मरु दिले नाही.
19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा.
मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि
केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता
तो कोनाशिला झाला.
23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे
आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे.
आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
25 लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराने आपला उध्दार केला. [a]
26 परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा.”
याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.
27 परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो.
बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.”
28 परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो.
तुझी स्तुती करतो.
29 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.
150 परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
2 देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा.
त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा.
3 तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा.
सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा.
4 डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा.
तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.
5 जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा.
झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा.
6 प्रत्येक जिवंत वस्तू परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती कर.
योहान येशूचा संदेश मंडळ्यांना कळवितो
4 योहानाकडून,
आशिया [a] प्रांतातील सात मंडळ्यांना:
जो आहे, जो होता व जो येणार आहे त्या एकापासून (देवापासून): आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हांस कृपा व शांति असो. 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी आहे, जो मेलेल्यांमधून उठविले गेलेल्यांमध्ये पहिला आहे.
पृथ्वीवरील राजांचा तो सत्ताधीश आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले; 6 ज्याने आम्हांला राज्य आणि देवपित्याची सेवा करणारे याजक बनविले त्या येशूला गौरव व सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असोत! आमेन.
7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक व्यक्ति त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व लोक त्याच्यामुळे आक्रोश करतील, होय, असेच होईल! आमेन.
8 प्रभु देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगा [b] आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे.”
येशू त्याच्या शिष्यांना दिसतो(A)
19 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.” 20 असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
21 पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हांला पाठवितो.” 22 आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला, “पवित्र आत्मा स्वीकारा. 23 जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्याला पापक्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही.”
येशू थोमाला दिसतो
24 आता थोमा (याला दिदुम म्हणत) बारा शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. 25 तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की, “आम्ही प्रभूला पाहिले आहे!” पण तो त्यांना म्हणाला, “त्याच्या हातांमधील खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणांत माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही.”
26 एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो.” 27 मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव.”
28 थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभु आणि माझा देव!”
29 मग येशू त्याला म्हणाला, “तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस, पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत.”
योहानाने हे पुस्तक का लिहिले?
30 आणखी या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ अदभुत चिन्हे येशूने त्याच्या शिष्यांच्या समवेत केली. ती या पुस्तकात लिहिली नाहीत. 31 पण ही लिहिली यासाठी की, तुम्ही विश्वास ठेवावा की, येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हांला जीवन मिळेल.
2006 by World Bible Translation Center