Revised Common Lectionary (Semicontinuous)
150 परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
2 देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा.
त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा.
3 तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा.
सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा.
4 डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा.
तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.
5 जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा.
झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा.
6 प्रत्येक जिवंत वस्तू परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती कर.
गल्याथचे इस्राएलला आव्हान
17 पलिष्ट्यांनी आपापल्या सैन्यांची जमवाजमव केली आणि ते यहूदामधील सोखो येथ जमले. सोखो आणि अजेका यांच्यामध्ये अफसऱ्दम्मीन येथे त्यांनी छावणी दिली.
2 शौल आणि इस्राएलचे सैन्यही एकत्र आले. त्यांचा तळ एलाच्या खोऱ्यात होता. पलिष्ट्यांशी लढायला शौलचे सैन्य सज्ज झाले. 3 खोऱ्याच्या दुतर्फा असलेल्या टेकड्यांवर ही दोन्ही सैन्ये समोरामसोर ठाकली होती.
4 पलिष्ट्यांकडे गल्याथ नावाचा कुशल योध्दा होता. तो गथ येथील होता. त्याची उंची नऊ फुटापेक्षा [a] जास्त होती. पलिष्ट्यांच्या छावणीतून तो बाहेर आला. 5 पितळी शिरस्त्राण आणि खवल्या खवल्यांचे चिलखत त्याने परिधान केले होते. हे चिलखतही पितळी असून त्याचे वजन जवजवळ एकशेपंचवीस पौंड होते. 6 त्याच्या पायांवरही पितळी कवच असून पाठीवर पितळी बरची होती. 7 त्या बरचीचा लाकडी भाग विणकरच्या दांडक्याएवढा होता. आणि बरचीचं पातं पंधरा पौंड वजनाचं होतं एक ढाल वाहणारा सेवक गल्याथच्या समोर चालला होता.
8 गल्याथ रोज बाहेर पडे आणि इस्राएली सैनिकांना ओरडून आव्हान देई. तो म्हणे, “तुम्ही येथे येऊन युध्दासाठी का उभे आहात? तुम्ही शौलाचे सेवक आहात. मी पलिष्टी आहे. तुमच्यापैकी एकाला निवडा आणि माझ्याकडे पाठवा. 9 त्याने मला मारले तर आम्ही पलिष्टी तुमचे दास बनू. पण मी त्याला मारले तर मी जिंकलो आणि मग तुम्ही आमचे दास व्हाल. तुम्हाला आमची चाकरी करावी लागेल.”
10 तो असेही म्हणे, “आज मी इस्राएल सैन्याला तुच्छ लेखतो. तुम्ही एकाला तरी पाठवा आणि आम्हाला लढू द्या.”
11 गल्याथची हे आव्हान ऐकून शौल व त्याचे सैन्य यांच्यात घबराट निर्माण झाली.
दावीद आघाडीवर जातो
12 यहूदातील बेथलहेम येथील इफ्राथ वंशामधल्या इशायचा दावीद हा मुलगा. इशायला एकंदर आठ मुलगे होते. शौलच्या कारकीर्दीत इशाय एक वयस्क गृहस्थ होता. 13 इशायचे तीन मोठे मलुगे शौलबरोबर युध्दाला गेले होते. पाहिला अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्मा. 14 दावीद सगळ्यात धाकटा होता. मोठी तीन मुलं शौलच्या सैन्यात असली तरी 15 दावीद अनेकदा बेथलहेमला आपल्या वडिलांची मेंढरं राखायला शौलकडून येत जात असे.
16 इकडे हा पलिष्टी गल्याथ रोज सकाळ संध्याकाळ इस्राएल सैन्यासमोर उभे राहून आव्हात देत होता. हा त्याचा क्रम चाळीस दिवस चालला होता.
17 एक दिवस इशाय दावीदला म्हणाला, “आपल्या भावांसाठी एवढं टोपलंभर शिजवलेले धान्य आणि हे दहा पावाच्या लाद्या छावणीवर घेऊन जा. 18 तसंच, तुझ्या भावांच्या छावणीवरच्या हजारी अधिकाऱ्याला या पनीरच्या दहा वड्या दे. भावांची खुशाली विचार. ते सुखरुप आहेत याची पावती म्हणून माझ्यासाठी काहीतरी खूण आण. 19 तुझे भाऊ शौल आणि इतर इस्राएली सैनिक यांच्या बरोबर एलाच्या खोऱ्यात आहेत. पलिष्ट्यांबरोबर त्यांची लढाई आहे.”
20 दुसऱ्या दिवशी दावीदाने आपली मेंढरे दुसऱ्या एका मेंढपाळाच्या हाती सोपवली आणि तो इशायच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सामान घेऊन निघाला. दावीद आपली गाडी घेऊन तळाशी पोचला तेव्हा सर्व सैनिक रणगर्जना करत आपापल्या युध्दव्यूहातल्या जागांवर चालले होते. 21 इस्राएलचे सैन्य आणि पलिष्टी समोरासमोर उभे होते.
22 आपले सामान रसदीच्या राखणदारावर सोपवून दावीद सैन्याकडे धावला. भावांचा शोध घेऊन. 23 त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात पलिष्ट्यांचा गथ येथील झूंजार सैनिक गल्याथ आपल्या सैन्यातून बाहेर येऊन नेहमी प्रमाणे इस्राएलला आव्हान देऊ लागला. ते सर्व दावीदाने ऐकले.
देवाचे पुरावे
12 प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत. 13 आणि इतर लोकांतील कोणी त्यांच्याजवळ उभे राहण्याचे धैर्य करीत नसत. परंतु सर्व प्रेषितांची स्तुति करीत; 14 आणि किती तरी लोक पुढे येऊन प्रभु येशूवर विश्वास ठेवीत. अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या. 15 त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत. 16 लोक यरुशलेम सभोवतालच्या गावांगावातून येऊ लागले, आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना ते आणू लागले. तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली.
2006 by World Bible Translation Center