Revised Common Lectionary (Semicontinuous)
14 ईयोब म्हणाला:
“आपण सर्व मनुष्यप्राणी आहोत.
आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.
2 माणसाचे आयुष्य फुलासारखे आहे.
तो लवकर वाढतो आणि मरुन जातो.
माणसाचे आयुष्य छायेसारखे आहे.
ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते.
3 ते खरे आहे पण देवा, माझ्याकडे एका माणसाकडे तू लक्ष देशील का?
आणि तू माझ्याबरोबर न्यायालयात येशील का?
आपण दोघेही आपापली मते मांडू या का?
4 “परंतु एखाद्या घाणेरड्या वस्तूचे स्वच्छ वस्तूशी काय साम्य असू शकते काहीच नाही.
5 माणसाचे आयुष्य मर्यादित आहे देवा,
माणसाने किती जगायचे ते तूच ठरवतोस.
तूच त्याची मर्यादा निश्र्चित करतोस आणि ती कुणीही बदलू शकत नाही.
6 देवा, म्हणून तू आमच्यावर नजर ठेवणे बंद कर.
आम्हाला एकटे सोड.
आमची वेळ संपेपर्यंत आमचे हे कष्टप्रद आयुष्य आम्हाला भोगू दे.
7 “वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते.
ते पुन्हा वाढू शकते त्याला नवीन फांद्या फुटतच राहतात.
8 त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली
आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले.
9 तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते.
आणि त्याला नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात.
10 परंतु माणूस जेव्हा मरतो तेव्हा तो संपतो.
माणूस मरतो तेव्हा तो कायमचा जातो.
11 नद्या सुकून जाईपर्यंत तुम्ही समुद्रातील पाणी घेऊ शकता.
तरीही माणूस मरुन जातो.
12 माणूस मरतो तेव्हा तो झोपतो
आणि पुन्हा कधीही उठत नाही.
आकाश नाहीसे होईपर्यंत मेलेला माणूस उठणार नाही.
मनुष्यप्राणी [a] त्या झोपेतून कधीच जागा होत नाही.
13 “तू मला माझ्या थडग्यात लपवावेस असे मला वाटते.
तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस.
नंतर तू तुझ्या सोयीने माझी आठवण करु शकतोस.
14 मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊ शकतो का?
मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन.
एकजण स्वतःच्या दु:खाची कारणमीमांसा करतो
3 खूप संकटे पाहिलेला मी एक माणूस आहे.
परमेश्वराने आम्हाला काठीने मारताना मी प्रत्यक्ष पाहिले.
2 परमेश्वराने मला प्रकाशाकडे
न नेता, अंधाराकडे नेले.
3 परमेश्वराने त्याचा हात माझ्याविरुध्द केला.
दिवसभर, त्याने आपला हात, पुन्हा पुन्हा, माझ्याविरुद्ध चालविला.
4 त्यांने माझी त्वचा आणि मांस नष्ट केले
आणि माझी हाडे मोडली.
5 परमेश्वराने माझ्याभोवती दु:ख व त्रास ह्यांच्या भिंती उभारल्या.
त्यांने दु:ख व त्रास माझ्याभोवती उभे केले.
6 त्याने मला अंधकारात बसायला लावले.
माझी स्थिती एखाद्या मृताप्रमाणे केली.
7 परमेश्वराने मला बंदिवान केल्यामुळे मी बाहेर येऊ शकलो नाही.
त्याने मला मोठमोठ्या बेड्या घातल्या.
8 मी जेव्हा मदतीसाठी आक्रोश करतो,
तेव्हासुध्दा परमेश्वर माझा धावा ऐकत नाही.
9 त्याने दगडधोड्यांनी माझ्या रस्त्यात अडथळा निर्माण केला आहे.
त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे.
19 परमेश्वरा, लक्षात ठेव.
मी फार दु:खी आहे, व मला घर नाही.
तू दिलेल्या कडू विषाचे (शिक्षेचे) स्मरण कर.
20 मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे.
म्हणूनच मी दु:खी आहे.
21 पण मी पुढील काही गोष्टींचा विचार
केला की मला आशा वाटते.
22 परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही.
परमेश्वराची करुणा चिरंतन आहे.
23 ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते.
परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे.
24 मी मनाशी म्हणतो, “परमेश्वर माझा देव आहे.
म्हणूनच मला आशा वाटेल.”
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
31 परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे,
माझी निराशा करु नकोस
मला वाचव व माझ्यावर दया कर.
2 देवा, माझे ऐक त्वरीत येऊन
मला वाचव माझा खडक हो.
माझे सुरक्षित स्थळ हो.
माझा किल्ला हो, माझे रक्षण कर.
3 देवा, तू माझा खडक आहेस
तेव्हा तुझ्या नावाखातर पुढे हो व मला मार्गदर्शन कर.
4 माझ्या शत्रूंनी माझ्यासमोर सापळा रचला आहे.
त्यांच्या सापळ्यापासून मला वाचव तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
15 माझे जीवन तुझ्या हाती आहे.
मला माझ्या शत्रूंपासून वाचव.
काही लोक माझा पाठलाग करीत आहेत
त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
16 कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर.
माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
बदललेली जीवने
4 ख्रिस्ताने जसा शरीरिक दु:खसहनाचा अनुभव घेतला, तसेच तुम्हीसुद्धा ख्रिस्ताची जशी चित्तवृति होती तशा प्रकारच्या चित्तवृत्तीने सज्ज व्हा. मी असे म्हणतो कारण ज्याने शारीरिक दु:खसहनाचा अनुभव घेतला आहे तो पाप करण्याचे सोडून देतो. 2 म्हणून तो या जगात राहत असता आपल्या उरलेल्या पृथ्वीवरील जीवनात मानवी वासनांच्या आहारी जाणार नाही तर देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष देईल. 3 कारण तुम्ही आजपर्यंत विदेशी लोकांसारखे आयुष्य जगत आला म्हणजे तुम्ही कामातुरपणाच्या कृतीत चालला, देहवासना, मद्यापान, बदफैलीपणा, रंगेलपणा आणि अमंगळ मूर्तिपूजा यात बेभान जीवन जगलात.
4 आता तुम्ही त्यांच्यासारखे वाहवत जात नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. म्हणून तुम्हांस शिव्याशाप देतात. 5 ते त्यांच्या वागणुकीचा हिशोब येशू ख्रिस्त जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास तयार आहे, त्यास देतील, 6 कारण जे मेलेले आहेत त्यांनासुद्धा सुवार्ता सागण्यात आली होती यासाठी की, मनुष्यांप्रमाणेच शारीरिकदृष्ट्या त्यांचा न्याय व्हावा आणि आध्यात्मिकदृष्ट्या देवासमान सार्वकालिक जीवन जगावे.
देवाने दिलेल्या देणग्यांचे चांगले कारभारी व्हा
7 सर्व गोष्टींचा शेवट होण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून पूर्णपणे सावधानतेने वागा आणि प्रार्थना करण्यास सतत तयार राहा. 8 सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एकमेकांवर सत्याने प्रेम करा. कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरुण घालते.
येशूला पुरतात(A)
57 संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य तेथे आला. तो अरिमथाईचा होता व येशूचा अनुयायी होता. 58 योसेफ पिलाताकडे गेला. आणि त्याने त्याचे शरीर मागितले. पिलाताने येशूचे शरीर योसेफाला देण्याचा हुकूम शिपायांना केला. 59 नंतर योसेफाने येशूचे शरीर घेतले आणि नवीन तागाच्या कपड्यात ते गुंडाळले. 60 मग योसेफाने खडकात खोदलेल्या नव्या कबरेत येशूचे शरीर ठेवले. नंतर कबरेच्या तोंडवर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली. या गोष्टी केल्यानंतर योसेफ निघून गेला. 61 मरीया मग्दालिया, आणि मरीया नावाची दुसरी स्त्री कबरेभोवती बसल्या होत्या.
येशूच्या कबरेवर पहारा
62 त्या दिवसाला तयारीचा दिवस [a] म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परुशी पिलाताकडे गेले. 63 ते म्हणाले, “महाराज, तो लबाड मनुष्य (येशू) जिवंत असताना असे म्हणाला होता की, ‘मी मरण पावल्यानंतर तीन दिवसांनी परत उठेन.’ 64 म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याचा हुकुम द्या. (कारण) त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांना सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.”
65 पिलात म्हणाला, “तुम्ही शिपाई घेऊ शकता. जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.” 66 म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला. आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.
येशूला कबरेत ठेवतात(A)
38 नंतर अरिमथाई येथील योसेफाने पिलातला येशूचे शरीर मागितले. योसेफ हा येशूचा शिष्य होता, पण गुप्त रीतीने, कारण त्याला यहूद्यांची भीति वाटत होती. पिलाताच्या परवानगीने तो आला व शरीर घेऊन गेला.
39 त्याच्याबरोबर निकदेम होता. याच मनुष्याने रात्रीच्या वेळी येशूची भेट घेतली होती. निकदेम शंभर पौंड [a] गंधरस व अगरू [b] घेऊन आला. 40 मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूदी लोकांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंधित द्रव्यासहित तागांनी ते गुंडाळले. 41 जेथे त्याला वधस्तंभी मारले होते तेथे एक बाग होती. आणि त्या बागेत एक नवीन थडगे होते, व त्या थडग्यात आतापर्यंत कोणालाच ठेवलेले नव्हते. 42 तो यहूद्यांच्या सणाच्या पूर्वतयारीचा दिवस असल्याने व ते थडगे जवळ असल्याने त्यांनी येशूला तेथेच ठेवले.
2006 by World Bible Translation Center