Revised Common Lectionary (Semicontinuous)
यातना भोगणारा देवाचा सेवक
13 “माझ्या सेवकाकडे पाहा. तो नक्कीच यशस्वी होईल. [a] त्याला अतिशय महत्व येईल. भविष्यात लोक त्याचा आदर करतील. त्याला मान देतील. 14 माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांना धक्का बसला. त्याला इतकी दुखापत झाली होती की मनुष्य म्हणून त्याला ओळखणे त्यांना शक्य नव्हते. 15 पण त्यांना अधिकच आश्चर्य वाटेल. राजे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहातील पण ते एकही शब्द बोलणार नाहीत. माझ्या सेवकाची गोष्ट ह्या लोकांनी ऐकलेली नाही. काय झाले ते त्यांनी पाहिले. त्यांनी जरी ती गोष्ट ऐकली नसली तरी त्यांना ती सर्व समजलेली आहे.”
53 आम्ही जाहीर केलेल्या गोष्टींवर खरा विश्वास कोणी ठेवला? परमेश्वराने केलेली शिक्षा खरोखरी कोणी स्वीकारली?
2 तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला. ओसाड जमिनीवर वाढणाऱ्या अंकुराप्रमाणे तो होता. त्याच्यात काही विशेष नव्हते. त्याला विशेष शोभा नव्हती. आपण त्याच्याकडे पाहिल्यावर तो आपल्याला आवडावा असे त्याच्यात काहीही वैशिष्ट्य नव्हते. 3 लोकांनी त्याची चेष्टा केली. आणि त्याचे मित्र त्याला सोडून गेले. तो खूप दुखी: व व्यथित माणूस होता. घृणा व दुख: म्हणजे काय हे त्याला चांगले समजले होते. लोक त्याच्याकडे साधे पाहण्याचेही कष्ट घेत नव्हते. तो आमच्या लक्षातही आला नाही.
4 पण त्याने आमचा त्रास स्वतःचा मानला. त्याने आमचे दुख: आणि वेदना स्वतः भोगल्या आम्हाला वाटले की देव त्यालाच शिक्षा करीत आहे, त्याने केलेल्या कर्मांबद्दल त्याला ताडन करीत आहे. 5 पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दुख: सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो. 6 पण त्याने एवढे सगळे केल्यानंतरही आपण मेंढ्यांप्रमाणे भरकटत गेलो. आम्ही प्रत्येकजण स्वतःच्या मार्गाने गेलो परमेश्वराने आपल्याला अपराधातून मुक्त केल्यावर आणि आपले अपराध त्याच्या नावावर केल्यावर आपण असे वागलो.
7 त्याला इजाही झाली आणि शिक्षाही झाली. पण त्याने कधीही तक्रार केली नाही. ठार मारायला नेणाऱ्या मेंढीप्रमाणे तो अगदी गप्प राहिला. मेंढ्यांची लोकर कापताना तो जसा शांत असतो तसा तो शांत होता. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने कधीही तोंड उघडले नाही. 8 लोकांनी बळजबरीने त्याला नेले आणि त्याला योग्य न्याय दिला नाही. त्याला मृत्युलोकातून उचलून आणल्यामुळे त्याच्या वारसांविषयी कोणी काहीही सांगू शकत नाही. माझ्या लोकांच्या पापाची किंमत मोजण्यासाठी त्याला शिक्षा केली गेली. 9 तो मेल्यावर त्याला श्रीमंताबरोबर पुरले. त्याने काहीही चूक केली नव्हती. तो कधीही खोटे बोलला नाही पण तरीही त्याच्या बाबतीत हे घडून आले.
10 परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरविले आणि परमेश्वराने दु:ख भोगलेच पाहिजे असे निश्चित केले. म्हणून सेवक स्वतःचा बळी देण्यास तयार झाला. पण त्याला नवे जीवन मिळेल आणि तो खूप खूप जगेल. तो त्याच्या लोकांना पाहील. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, सेवकाने करायच्या, सर्व गोष्टी तो पूर्ण करील. 11 त्याच्या आत्म्याला खूप क्लेश होतील. पण चांगल्या गोष्टी घडताना तो पाहील. तो जे शिकेल त्याबद्दल तो समाधान पावेल.
“माझा सज्जन सेवक, अनेक लोकांना त्यांच्या अपराधांतून, मुक्त करील. आणि त्यांच्या पापांचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेईल. 12 ह्यामुळेच मी त्याला सर्व लोकांत श्रेष्ठ बनवीन. बलवान माणसांबरोबर त्याला प्रत्येक गोष्टीत वाटा मिळेल. मी त्याच्यासाठी हे सर्व करीन कारण तो लोकांसाठी जगला आणि मेला. लोकांनी त्याला गुन्हेगार म्हटले. पण त्याने पुष्कळ लोकांच्या पापांचे ओझे स्वतः वाहिले. आणि तो पापी लोकांकरीता बोलतो आहे.”
प्रमुख गायकासाठी “पहाटेचे हरिण” या सुरांवर बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
22 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस.
तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.
2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली
परंतु तू उत्तर दिले नाहीस
आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले.
3 देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस
तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस.
4 आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला.
होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.
5 देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी बोलावले आणि त्यांची शत्रूंपासून सुटका झाली.
त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला पण त्यांची निराशा झाली नाही.
6 म्हणून मी कीटक आहे का?
मी मनुष्य नाही का?
लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
7 माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो.
ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.
8 ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग.
कदाचित् तो तुला मदत करेल.
तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.”
9 देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस.
मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस.
मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस.
आणि माझे सांत्वन केले आहेस.
10 मी जन्माला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस
मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस.
11 तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत
आणि मला मदत करायला कोणीही नाही.
12 माझ्याभोवती लोक आहेत
ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.
13 प्राण्यांवर गुरगुर करणाऱ्या व त्यांना फाडणाऱ्या
सिंहासारखे त्यांचे तोंड उघडे आहे.
14 माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या
पाण्यासारखी नाहीशी झाली आहे,
माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत
माझे धैर्यही नाहीसे झाले आहे.
15 फुटलेल्या खापरा प्रमाणे माझे तोंड सुकले आहे.
माझी जीभ टाळूला चिकटली आहे.
तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहेस.
16 “कुत्री” माझ्या भोवती आहेत
मला दुष्टांच्या घोळक्यांनी सापळ्यात पकडले आहे
सिंहाप्रमाणे त्यांनी माझ्या हातापायाला जखमा केल्या आहेत. [a]
17 मला माझी हाडे दिसू शकतात.
लोक माझ्याकडे टक लावून पाहतात
आणि पाहातच राहतात.
18 ते माझे कपडे त्यांच्यात वाटून टाकतात
आणि माझ्या लांब झग्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या [b] टाकल्या आहेत.
19 परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस
तूच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.
20 परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव
माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांपासून वाचव.
21 सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर.
बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. [c]
22 परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझ्याबद्दल सांगेन.
सभेत मी तुझे गुणगान गाईन.
23 जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
24 का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो.
परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही.
परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही.
जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही.
25 परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले.
त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन.
26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील.
जे लोक परमेश्वराला शोधत आले, त्यांनी त्याची स्तुती करावी.
तुमचे ह्रदय सदैव आनंदी राहो.
27 दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो.
आणि ते परमेश्वराकडे परत येवोत.
सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.
28 का? कारण परमेश्वरच राजा आहे
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
29 बलवान व निरोगी लोक भोजन करुन
देवापुढे नतमस्तक झाले आहेत.
तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत
व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
30 आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील.
लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील.
31 परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत
त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.
16 “त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी हा करार करीन, अ
से प्रभु म्हणतो,
मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात ठेवीन
आणि ते त्यांच्या मनावर लिहीन.” (A)
17 मग तो म्हणतो,
“आणि मी त्यांची पापे
व नियमविरहित कृत्ये कधीही आठवणार नाही.” (B)
18 जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाच्या आणखी अर्पणाची आवश्यकता भासणार नाही.
देवाच्या जवळ या
19 म्हणून बंधु आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो. 20 त्याच्या शरीराद्वारे, त्याने उघडलेल्या नवीन आणि जिवंत अशा मार्गामुळे आपण न भीता परमपवित्र स्थानात पाऊल ठेवू शकतो. 21 आणि देवाच्या घराण्यावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे. 22 म्हणून आपण आपली मळीन विवेकबद्धि शुद्ध करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने आपण विश्वास, आश्वासन तसेच तळमळ यांनी भरलेल्या अंतःकरणाने देवाच्या जवळ जाऊ. 23 आपल्याला जी आशा आहे तिला आपण चिकटून राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
Help Each Other Be Strong
24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रेम आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ. 25 आणि काही जणांना जी वाईट सवय असते तसे आपण एकत्र येण्याचे बंद करू नये, परंतु एकमेकांना उत्तजेन देऊ या, आणि तो दिवस [a] जवळ येत असताना तसे उत्तेजन देण्याची अधिकच गरज आहे.
देवासमोर येण्यास येशू आपणांस मदत करतो
14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान मुख्य याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरू या. 15 कारण आपल्याला लाभलेला महान याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला. 16 म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.
7 येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या काळात, त्याने देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्याला मृत्युपासून वाचवू शकत होता. आणि देवाविषयीच्या त्याच्या सन्माननीय आदरामुळे येशूच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. 8 जरी तो पुत्र होता, तरी त्याने ज्या गोष्टी सोशिल्या त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंतकाळच्या तारणासाठी तो उगम झाला
येशूला अटक(A)
18 या गोष्टी बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती, त्या बागेत तो व त्याचे शिष्य गेले.
2 आणि त्याला धरून शत्रूच्या हाती देणार यहूदा यालाही ही जागा ठाऊक होती. कारण येशू आपल्या शिष्यांबरोबर नेहमी तेथे येत असे. 3 तेव्हा शिपायांची तुकडी, मुख्य याजकाचे काही अधिकारी, परुशी यांना वाट दाखवीत यहूदा तेथे बागेत आला. ते मशाल, कंदील आणि हत्यारे घेऊन आले होते.
4 मग येशू आपल्या बाबतीत जे काही होणार हे सर्व जाणून पुढे जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्हांला कोण पाहिजे?”
5 “नासरेथचा येशू.” ते म्हणाले.
येशूने उत्तर दिल, “तो मी आहे” (आणि विश्वासघात करणारा यहूदा तेथे त्यांच्यामध्ये उभा होता) 6 जेव्हा येशू म्हणाला, “तो मी आहे,” ते मागे सरले आणि जमिनीवर पडले.
7 पुन्हा त्याने त्यांना विचारले, “तुम्हांला कोण पाहिजे?”
आणि ते म्हणाले, “नासरेथचा येशू.”
8 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले की तो मी आहे. जर तुम्ही मला शोधत असाल तर या लोकांना जाऊ द्या.” 9 हे यासाठी घडले की, जे शब्द बोलण्यात आले होते. ते सर्व पूर्ण व्हावेत, “जे तू मला दिलेस त्यांतील एकही मी गमावला नाही.”
10 मग शिमोन पेत्र, ज्याच्याकडे तलवार होती, त्याने ती बाहेर काढली व मुख्य याजकाच्या सेवकाचा कान कापला (सेवकाचे नाव मल्ख होते) 11 येशूने पेत्राला आज्ञा केली, “तुझी तलवार तिच्या जागेवर ठेव! पित्याने दिलेला प्याला मी पिऊ नये काय?”
येशूला हन्नाकडे आणतात(B)
12 मग शिपायांची तुकडी व त्यांचा सरदार आणि यहूदी रक्षक यांनी येशूला अटक केली. त्याला त्यांनी बांधले आणि 13 त्याला प्रथम हन्नाकडे आणले. तो कयफा या प्रमुख याजकाचा सासरा होता. कयफा त्या वर्षीचा प्रमुख याजक होता. 14 आणि कयफा हाच असे म्हणणारा होता की सर्व माणसांसाठी एका माणसाने मरणे बरे.
येशूला ओळखण्याविषयी पेत्र खोटे बोलतो(C)
15 शिमोन पेत्र व दुसरा शिष्य येशूच्या मागून चालले. कारण हा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, म्हणून तो येशूच्या बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात आत गेला. 16 परंतु पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला. म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन तेथे कामावर असणाऱ्या मुलीला सांगून पेत्राला आत आणले. 17 ती मुलगी पेत्राला म्हणाली, “तुही त्या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?”
पेत्राने उत्तर दिले, “मी नाही.”
18 थंडी असल्याने नोकरांनी व रक्षकांनी स्वतःला गरम राखण्यासाठी शेकोटी पेटविली होती व ते शेकत उभे राहिले होते. पेत्रही त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला होता.
मुख्य याजकाकडून येशूची चौकशी(D)
19 तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणुकीविषयी विचारले, 20 येशूने त्याला उत्तर दिले की, “मी उघडपणे जगाशी बोललो, सभास्थानात व मंदिरात जेथे सर्व यहूदी एकत्र जमतात तेथे मी नेहमी शिकविले आणि मी गुप्त असे काहीच बोललो नाही. 21 मला तू का विचारतोस? ज्यांनी माझी शिकवण ऐकली, त्यांना विचार, मी काय बोललो ते त्यांना माहीत आहे.”
22 येशूने असे म्हटले तेव्हा तेथे उभे असलेल्या रक्षकाने येशूला चपराक मारली. रक्षक म्हणाला, “तू प्रमुख याजकाला असे उत्तर देतोस काय?”
23 येशूने त्याला उत्तर दिले, “जर मी वाईट बोललो असेन तर तसे सांग की मी चुकीचे बोललो पण जर चांगले बोललो असलो तर तू मला का मारतोस?”
24 हन्नाने त्याला बांधलेलेच मुख्य याजक कयफाकडे पाठविले.
पेत्र पुन्हा खोटे बोलतो(E)
25 शिमोन पेत्र शेकत असता, त्याला विचारले गेले, “तू त्याच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?”
त्याने ते नाकारले, “मी नाही.”
26 मुख्य याजकाच्या नोकरांपैकी एकजण ज्याचा कान पेत्राने कापला होता त्याचा नातेवाईक होता. तो म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोब बागेत पाहिले नाही काय?”
27 पेत्राने पुन्हा ते नाकारले, आणि त्या क्षणी कोंबडा आरवला.
येशूला पिलातासमोर आणतात(F)
28 नंतर यहूदी येशूला कयफाच्या घरातून रोमन राजवाड्याकडे घेऊन गेले. तेव्हा पहाट झाली होती. आपण विटाळले जाऊ नये व वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते राजवाड्यात गेले नाहीत. 29 म्हणून पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या माणसावर कोणता आरोप करीत आहात?”
30 तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले, “हा जर दुष्कर्मी नसता तर आम्ही याला तुमच्या स्वाधीन केले नसते.”
31 मग पिलाताने त्यांना म्हटले, “तुम्ही याला घेऊन आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.”
यहूदी म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” 32 आपल्याला कसले मरण येणार हे सुचवून येशू जे वचन बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
33 मग पिलात पुन्हा राजवाड्यात गेला. येशूला बोलावले आणि विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
34 येशूने विचारले, “तू हे स्वतःहून विचारतोस की, दुसऱ्यांनी तुला माझ्याविषयी सांगितले.”
35 पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझे लोक आणि तुझ्या मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले, तू काय केले आहेस?”
36 येशू म्हणाला, “माझे राज्य या जगाचे नाही, जर ते असते तर यहूद्यांपासून माझी सुटका करण्यासाठी माझे सेवक लढले नसते का? पण माझे राज्य दुसऱ्या ठिकाणचे आहे.”
37 पिलात म्हणाला, “तर तू एक राजा आहेस!”
येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे तू म्हणतोस तेव्हा बरोबर म्हणतोस. खरे पाहता, या कारणासाठी मी जन्मलो आणि सत्याविषयी साक्ष देण्यासाठी मी या जगात आलो. जे सर्व सत्याच्या बाजूचे आहेत ते माझे ऐकतात.”
38 पिलताने विचारले, “सत्य काय आहे?” असे म्हणून तो पुन्हा यहूद्यांकडे गेला. आणि म्हणाला, “मला याच्यात काहीच अपराध सापडत नाही. 39 पण वल्हांडण सणात मी तुम्हांसाठी एकाला सोडावे अशी तुमच्यामध्ये रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
40 ते ओरडले, “नको, त्याला नको! आम्हांला बरब्बाला सोडा!” बरब्बा एक दरोडेखोर होता.
19 मग पिलाताने येशूला नेऊन फटके मारण्याची आज्ञा दिली. 2 आणि शिपायांनी काट्यांचा मुगुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला, व त्याला जांभळे वस्त्र घातले. 3 ते त्याच्याजवळ वारंवार येऊन त्याला म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” आणि त्यांनी त्याच्या तोंडावर मारले.
4 पुन्हा एकदा पिलात बाहेर आला आणि यहूद्यांना म्हणाला, “पाहा! मी त्याला बाहेर तुमच्याकडे आणत आहे, तुम्हांला हे समजावे म्हणून की, मला त्याच्यावर दोषारोप ठेवायला कोणतेच कारण सापडत नाही.” 5 जेव्हा येशू काट्यांचा मुगुट व जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला, तेव्हा पिलात त्यांना म्हणाला, “हा पहा तो मनुष्य!”
6 मुख्य याजक व त्यांचे रक्षक त्याला पाहताक्षणीच मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा! वधस्तंभावर खिळा!”
पण पिलाताने उत्तर दिले, “तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खिळा. माझ्या दृष्टीने त्याच्यावर आरोप ठेवण्यास कोणतेही कारण मला दिसत नाही.”
7 यहूद्यांनी जोर देऊन म्हटले, “आम्हांला नियमशास्त्र आहे, आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे त्याने मेलेच पाहिजे. कारण त्याने स्वतःदेवाचा पुत्र असल्याचा दावा केला.”
8 जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा तो अधिकच घाबरला. 9 आणि तो आत राजवाड्यात परत गेला. येशूला त्याने विचारले, “तू कोठून आला आहेस?” पण येशूने त्याला उत्तर दिले नाही. 10 पिलात म्हणाला, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला वधस्तंभावर खिळण्याची किंवा मुक्त करण्याची ताकद मला आहे, हे तुला समजत नाही का?”
11 येशूने उत्तर दिले, “जर वरून अधिकार देण्यात आला नसता, तर तुला माझ्यावर अधिकार नसता. म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे.”
12 तेव्हापासून पिलाताने येशूला सोडण्याचा प्रयत्न केला, पण यहूदी मोठमोठयाने ओरडत राहिले, “जर तुम्ही या माणसाला जाऊ दिले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतः राजा असल्याचा दावा करतो, तो कैसराला विरोध करतो.”
13 जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने येशूला बाहेर आणले आणि “फरसबंदी नावाची जागा,” (जिला इब्री भोषेत गब्बाथा) म्हणतात तेथे तो न्यायासनावर बसला. 14 तो तर वल्हांडणाची तयारी करण्याचा दिवस असून दुपारची वेळ झाली होती.पिलात त्या यहूद्यांना म्हणाला, “पहा हा तुमचा राजा.”
15 यहूदी ओरडले, “त्याला घेऊन जा! त्याला घेऊन जा! आणि वधस्तंभावर खिळून मारा!”
पिलाताने त्यांना विचारले, “मी तुमच्या राजाला वधस्तंभी द्यावे काय?”
मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हांला कैसराशिवाय दुसरा कोणी राजा नाही.”
16 मग त्याने त्याला वधस्तंभी खिळण्यासाठी त्यांच्या हाती दिले.
येशूला वधस्तंभावर खिळून मारतात(G)
मग शिपायांनी येशूचा ताबा घेतला. 17 येशूने स्वतःचा वधस्तंभ वाहिला. तो बाहेर कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी गेला. (इब्री भाषेत त्याला गुलगुथा म्हणतात.) 18 गुलगुथा येथे त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकले. त्यांनी आणखी दोन मनुष्यांनासुद्वा वधस्तंभावर खिळले. त्या दोघांना त्यांनी येशूच्या दोन्ही बाजूंना खिळले व मध्ये येशूला खिळले.
19 आणि पिलाताने एक वाक्य लिहिले आणि ते वधस्तंभावर लावले. त्यावर असे लिहिले होते की, “ येशू नासरेथकर-यहूद्यांचा राजा.” 20 ती पाटी यहूदी भाषेत लिहिली होती. पुष्कळ यहूदी लोकांनी ती पाटी वाचली, कारण येशूला जेथे वधस्तंभावर देण्यात आले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते. तसेच ते लॅटीन, ग्रीक, आरामी भाषेतही होते.
21 यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलाताला विरोध केला. ते म्हणाले, “‘यहूद्यांचा राजा’ असे लिहू नका तर हा मनुष्य यहूदी लोकांचा राजा आहे, ‘असा दावा करतो, असे लिहा.’”
22 पिलाताने म्हटले, “मी जे लिहिले ते लिहिले.”
23 जेव्हा शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळले, तेव्हा त्यांनी त्याची वस्त्रे घेतली. आणि चौघात ती वाटून घेतली. फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा पोशाख वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता. त्याला शिवलेले नव्हते. 24 म्हणून ते एकमेकांस म्हणाले, “हा आपण फाडू नये, तर यासाठी चिठ्ठ्या टाकून कोणाला मिळतो ते ठरवू या.” हे यासाठी घडले की, पवित्र शास्त्रात जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.
“त्यांनी माझी वस्त्रे आपआपसांत वाटून घेतली
आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.” (H)
म्हणून शिपायांनी असे केले.
25 येशूच्या वधस्तंभाशोजारी त्याची आई, त्याच्या आईची बहीण, क्लोपाची आई मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या. 26 जेव्हा येशूने त्याच्या आईला तेथे पाहिले. आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती तो जवळच उभा होता, तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला, “आई, हा तुझा मुलगा आहे,” 27 आणि त्या शिष्याला येशू म्हणाला, “ही तुझी आई आहे.” म्हणून त्या दिवसापासून या शिष्याने तिला आपल्या घरी नेले.
येशू प्राण सोडतो(I)
28 नंतर, हे ओळखून की आता सर्व पूर्ण झाले आहे, आणि पवित्र शास्त्रातील वचनांची परिपूर्ती व्हावी म्हणून, येशू म्हणाला, “मला तहान लागली आहे.” 29 तेथे एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी बोळा आंबेत बुडवून भरून एजोबाच्या काठीवर ठेवून त्याच्या तोंडला लावला. 30 येशू आंब घेतल्यावर म्हणाला, “पूर्ण झाले आहे.” मग त्याने आपले डोके लववून आपला आत्मा सोडून दिला.
31 तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शब्बाथाचा दिवस होता. शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत अशी यहूदी लोकांची इच्छा होती. त्यांनी पिलाताला पाय तोडण्याची आणि शरीरे वधस्तंभावरून खाली घेण्याविषयी विचारले, 32 म्हणून शिपायांनी येऊन येशूबरोबर वधस्तंभी खिळलेल्या पहिल्याचे व नंतर दुसऱ्याचे पाय मोडून टाकले. 33 पण जेव्हा ते येशूकडे आले. तेव्हा त्यांना आढळून आले की, तो अगोदरच मेला आहे. तेव्हा त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत.
34 तरी शिपायांपैकी एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले. 35 ज्या मनुष्याने हे पाहिले, त्याने साक्ष दिली आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहीत आहे की, तो खरे बोलतो व तो साक्ष देतो यासाठी की, तुम्ही विश्वास धरावा. 36 या गोष्टी अशासाठी घडल्या की, पवित्र शास्त्राची परिपूर्ती व्हावी: “त्याचे एकही हाड मोडणार नाही.” [a] 37 आणि दुसऱ्या शास्रभागात म्हटले आहे: “ज्याला त्यांनी भोसकले त्याला ते पाहतील.” [b]
येशूला कबरेत ठेवतात(J)
38 नंतर अरिमथाई येथील योसेफाने पिलातला येशूचे शरीर मागितले. योसेफ हा येशूचा शिष्य होता, पण गुप्त रीतीने, कारण त्याला यहूद्यांची भीति वाटत होती. पिलाताच्या परवानगीने तो आला व शरीर घेऊन गेला.
39 त्याच्याबरोबर निकदेम होता. याच मनुष्याने रात्रीच्या वेळी येशूची भेट घेतली होती. निकदेम शंभर पौंड [c] गंधरस व अगरू [d] घेऊन आला. 40 मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूदी लोकांच्या प्रेत पुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंधित द्रव्यासहित तागांनी ते गुंडाळले. 41 जेथे त्याला वधस्तंभी मारले होते तेथे एक बाग होती. आणि त्या बागेत एक नवीन थडगे होते, व त्या थडग्यात आतापर्यंत कोणालाच ठेवलेले नव्हते. 42 तो यहूद्यांच्या सणाच्या पूर्वतयारीचा दिवस असल्याने व ते थडगे जवळ असल्याने त्यांनी येशूला तेथेच ठेवले.
2006 by World Bible Translation Center