Revised Common Lectionary (Semicontinuous)
देव त्याच्या खास सेवकाला बोलावितो
49 दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांनो,
माझे म्हणणे ऐका.
जगातील सर्व लोकांनो, माझे ऐका माझ्या जन्मापूर्वीच परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी
मला निवडले मी आईच्या गर्भात असतानाच त्याने माझी निवड केली.
2 परमेश्वर त्याचे म्हणणे माझ्याकडून वदवितो.
तो माझा उपयोग धारदार तलवारीसारखा करतो.
त्याच्या ओंजळीत मला लपवून तो माझे रक्षणही करतो.
परमेश्वर टोकदार बाणाप्रमाणे माझा उपयोग करतो,
पण तो त्याच्या भाल्यात मला लपवितोही.
3 परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस.
मी तुझ्याबाबत विस्मयकारक गोष्टी करीन.”
4 मी म्हणालो, “मी निरर्थक मेहनत केली.
स्वतः झिजून झिजून निरूपयोगी झालो पण काहीही उपयोगी पडणारे केले नाही.
मी माझी सर्व शक्ती खर्च केली
पण माझ्याहातून काहीच झाले नाही.
तेव्हा आता काय करायचे.
ते परमेश्वरानेच ठरविले पाहिजे.
देवानेच मला काय फळ द्यायचे ते निश्चित केले पाहिजे.
5 मी परमेश्वराचा सेवक व्हावे,
याकोबाला आणि इस्राएलला मी परत देवाकडे न्यावे, म्हणून मला देवाने जन्माला घातले.
परमेश्वर माझा सन्मान करील.
मला देवाकडून शक्ती मिळेल.”
6 परमेश्वर मला म्हणाला, “तू माझा फार महत्वाचा सेवक आहेस.
इस्राएलचे लोक कैदी आहेत.
पण त्यांना माझ्याकडे परत आणले जाईल.
याकोबाच्या वंशजांचा गोतावळा माझ्याकडे परत येईल.
पण तुझे काम दुसरेच आहे,
ते ह्या कामा पेक्षा महत्वाचे आहे.
मी तुला सर्व राष्ट्रांना प्रकाश देणारा दिवा करीन.
जगातील सर्व माणसांचे रक्षण करण्याचा माझा मार्ग तू होशील.”
7 परमेश्वर, इस्राएलचा पवित्र देव, इस्राएलला वाचवितो देव म्हणतो,
“माझा सेवक नम्र आहे.
तो अधिपतींची सेवा करतो पण लोक त्याचा तिरस्कार करतात पण राजे त्याला पाहतील आणि उभे राहून त्याला मान देतील.
मोठे नेते त्याच्यापुढे वाकतील.”
परमेश्वराला, इस्राएलच्या पवित्र देवाला हे व्हायला पाहिजे आहे म्हणून असे घडेल, परमेश्वर विश्वासू आहे. ज्याने तुला निवडले तोच तो आहे.
71 परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
2 तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील.
तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
3 माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो,
तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस.
तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे.
4 देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव.
मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
5 प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच
तुझ्यावर विश्वास टाकला आहे.
6 जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे
मी माझ्या आईच्या शरीरात होतो
तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीच तुझी प्रार्थना केली.
7 तू माझ्या शक्तीचा ठेवा आहेस म्हणून,
मी दुसऱ्यांसाठी एक उदाहरण झालो.
8 तू केलेल्या अद्भुत गोष्टींचे मी नेहमी गुणगान करीत असतो.
9 केवळ मी आता म्हातारा झालो आहे म्हणून मला दूर लोटू नकोस,
माझी शक्ती क्षीण होत असताना मला सोडून जाऊ नकोस.
10 माझ्या शंत्रूंनी माझ्याविरुध्द योजना आखल्या आहेत.
ते लोक खरोखरच एकत्र आले, भेटले आणि मला मारण्याची योजना त्यांनी आखली.
11 माझे शत्रू म्हणाले, “जा त्याला पकडा देवाने त्याला सोडले आहे
आणि कोणीही माणूस त्याला मदत करणार नाही.”
12 देवा, मला सोडून जाऊ नकोस.
देवा, त्वरा कर! ये आणि मला वाचव.
13 माझ्या शत्रूंचा पराभव कर.
ते मला इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यांना त्याबद्दल लाज वाटावी अशी माझी इच्छा आहे.
14 नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन
आणि मी तुझी जास्त स्तुती करीन.
ख्रिस्तामध्ये देवाचे सामर्थ्य आणि ज्ञान
18 कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे. 19 कारण पवित्र शास्त्रांत असे लिहिले आहे,
“शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन,
आणि बुद्धिवंतांची बुध्दि मी बाजूला करीन.” (A)
20 ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले नाही का? 21 म्हणून, देवाच्या ज्ञानात असतानाही, जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वासणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाने निवडले.
22 कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, 23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण, आणि यहूदीतरांसाठी मूर्खपणा असा आहे. 24 परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे. 25 तथापि ज्यांस तुम्ही देवाचा “मूर्खपणा” म्हणता ते मानवप्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे. आणि ज्यांस तुम्ही देवाचा “दुर्बळपणा” समजता ते मानवप्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तिशाली आहे.
26 तर आता बंधुभागिनींनो, देवाने तुम्हांला केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे नव्हते. तुमच्यापैकी पुष्कळसे सामर्थ्यशाली नव्हते. तुमच्यापैकी पुष्कळसे उच्च कुळातले नव्हते, 27 त्याऐवजी जगातले जे मूर्ख पण त्यांना त्याने निवडले, यासाठी की, शहाण्या माणसास फजित करावे. 28 आणि देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे “नगण्य” त्यांना निवडले. यासाठी की जे “काहीतरी” आहेत त्यांना नगण्य करावे. 29 यासाठी की कोणीही देवासमोर बढाई मारु नये. 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली खंडणी असा झाला. 31 यासाठी की शास्त्रात असे लिहिले आहे, “जो बढाई मारतो त्याने देवाविषयी बढाई मारावी.”
येशू जीवन आणि मरण याविषयी बोलतो
20 आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते. 21 ते फिलिप्पाकडे आले, जो गालीलातील बेथसैदा येथील होता, त्यांनी विनंति केली, “महाराज, येशूला पाहावे अशी आमची इच्छा आहे.” 22 फिलिप्प अंद्रियाकडे हे सांगण्यास गेला; नंतर अंद्रिया व फिलिप्प यांनी येशूला सांगितले.
23 येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. 24 मी तुम्हांला खरे सांगतो, गव्हाचा दाणा भूमीत पडून मेला नाही, तर एकटाच राहतो, पण तो मेला तर पुष्कळ फळ देतो. 25 जो आपल्या जिवावर प्रीति करतो तो त्याला गमावेल पण जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखील. 26 जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरले पाहिजे. जेथे मी असेन तेथे माझे सेवकही असतील. जो माझी सेवा करतो त्याचा सन्मान माझा पिता करील.”
येशू त्याच्या मरणाविषयी बोलतो
27 “माझे अंतःकरण व्याकूळ झाले आहे. आणि मी आता काय सांगू? ‘पित्या माझी या घटकेपासून सुटका कर?’ केवळ याच कारणासाठी या वेळेला मी आलो. 28 पित्या, तुझे गौरव कर!”
तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “मी त्याचे गौरव केले आहे व पुन्हाही त्याचे गौरव करीन.”
29 जो जमाव तेथे होता त्याने हे ऐकले व म्हटले, “गडगडाट झाला.”
दुसरे म्हणाले, “देवदूत त्याच्याशी बोलला.”
30 येशू म्हणाला, “हा आवाज तुमच्यासाठी होता. माझ्यासाठी नव्हे. 31 या जगाचा न्याय होण्याची आता वेळ आली आहे. या जगाच्या राजकुमारला हाकलून देण्यात येईल. 32 परंतु मी, जेव्हा पृथ्वीपासून वर उचलला जाईन, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढीन.” 33 त्याने हे यासाठी म्हटले की कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार आहे हे त्याला दाखवायचे होते.
34 जमाव म्हणाला, “ख्रिस्त सर्वकाळ राहतो असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे तुम्ही का म्हणता? मनुष्याचा पुत्र कोण आहे?”
35 मग येशू त्यांना म्हणाला. “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्यामध्ये असणार आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला. यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करु नये. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. 36 तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे म्हणून तुम्हांला प्रकाश आहे तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला, मग तो निघून गेला. आणि त्यांच्यापासून गुप्त राहिला.
2006 by World Bible Translation Center