Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
126 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील
तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2 आपण हसत आनंदाचे गाणे गात असू.
इतर देशांतील लोक म्हणतील,
“इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3 होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली
तर आपण खूप आनंदी होऊ.
4 परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात.
तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5 एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल.
पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6 तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल.
पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
21 म्हणून मग मोशेने इस्राएली लोकांच्या सर्व वडीलधाऱ्यां लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकएक कोकरू घ्यावे; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञाकरिता त्याचा वध करावा. 22 मग एजोब झाडाच्या पानांच्या जुड्या घेऊन त्या पात्रातील कोकराच्या रक्तात बुचकाळाव्या आणि त्याचे रक्त दाराच्या दोन्ही बाजूंच्या चौकटींना व कपाळ पट्ट्यांवर लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराबाहेर जाऊ नये. 23 कारण त्यावेळी परमेश्वर मिसरमधील प्रथम जन्मलेल्यांना ठार मारण्यासाठी फिरणार आहे; तो जेव्हा घराच्या दारावरील कपाळ पट्टीवर व दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला लावलेले रक्त पाहील तेव्हा तो त्या घराचे संरक्षण करील; नाश करणाऱ्याला तुमच्या घरात प्रवेश करु देणार नाही, व तुम्हाला काही अपाय होऊ देणार नाही. 24 तुम्ही या आज्ञेची आठवण ठेवली पाहिजे की तुम्ही व तुमचे वंशज यानी पाळावयासाठी हा नियम कायमचा नियम आहे. 25 परमेश्वर त्याच्या वचनानुसार जो देश तुम्हाला देणार आहे त्यात तुम्ही गेला तर तेथेही तुम्ही हा नियम पाळण्याची आठवण ठेवावी. 26 जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील की ‘हा विधी आपण का करीत आहोत?’ 27 तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, ‘हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; कारण आम्ही जेव्हा मिसरमध्ये होतो तेव्हा या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांना मारले परंतु इस्राएल लोक राहात असलेली घरे ओलाडूंन तो पुढे गेला व त्या घरातील आम्हा सर्वाना त्याने वाचवले त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन त्याची उपासना केली.’”
यहूदी पुढारी येशूला ठार मारण्याचा कट करतात(A)
45 जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 46 पण त्यांच्यातील काहींनी परुश्यांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितले. 47 तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, “हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे. 48 आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”
49 तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाची व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही! 50 तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”
51 तो हे स्वतः होऊन बोलला नाही तर त्यावर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे. 52 केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की, त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे, म्हणून तो मरणार आहे.
53 म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली. 54 यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहूघांमध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील ऐफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला.
55 तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले. 56 ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?” 57 पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.
2006 by World Bible Translation Center