Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी महलथ् [a] सुरांवर बसवलेले दावीदाचे मास्कील (शिक्षण).
53 केवळ मूर्ख माणूसच देव नाही असा विचार करतो.
तसले लोक भ्रष्टाचारी, वाईट, द्वेषपूर्ण असतात
आणि ते कसले ही सत्कृत्य करीत नाहीत.
2 देव खरोखरच स्वर्गात आहे आणि तो आपल्यावर नजर ठेवतो.
देवाला शोधणाऱ्या शहाण्या लोकांच्या शोधात देव आहे.
3 परंतु प्रत्येक जण देवापासून दूर गेला आहे.
प्रत्येक जण वाईट आहे.
कोणीही काही सत्कृत्य करीत नाही,
अगदी एकही नाही.
4 देव म्हणतो, “त्या दुष्टांना सत्य माहीत आहे.
पण ते माझी प्रार्थना करीत नाहीत.
दुष्ट लोक अन्न खायला जसे तत्पर असतात तसेच
ते माझ्या लोकांचा नाश करायला तत्पर झाले आहेत.”
5 परंतु त्या दुष्टांना भीती वाटेल,
पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भीतील.
ते दुष्ट लोक इस्राएलचे शत्रू आहेत.
देवाने त्या दुष्टांना नाकारले आहे.
म्हणून देवाची माणसे त्यांचा पराभव करतील.
आणि देव त्या दुष्टांची हाडे इतस्तत फेकेल.
6 सियोनातून इस्राएलला कोण विजय मिळवून देईल?
देव त्यांना विजय मिळवण्यात मदत करेल,
देव त्याच्या माणासांना हद्दपारीतून परत आणेल
याकोबाला हर्ष होईल आणि इस्राएलखूप आनंदी होईल.
प्रायश्चिता:चा दिवस
26 परमेश्वर मोशेला म्हणाला, 27 “सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करुन नम्र व्हावे व परमेश्वराला अर्पण अर्पावे. 28 त्या दिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवश आहे; त्या दिवशी तुमच्या परमेश्वरासमोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.
29 “त्या दिवशी जो माणूस काही न खाता आपल्या जिवास दंडन करुन आपणाला नम्र करणार नाही त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. 30 त्या दिवशी कोणाही माणसाने जर कसलेही काम केले तर मी देव त्याला त्याच्या लोकातून नाहीसा करीन. 31 तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहात असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हाला हा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय. 32 तो दिवस तुम्हाला पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्या दिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास दंडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करुन दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”
मंडपाचा सण
33 परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला, 34 “इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा; 35 पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कसलेही काम करु नये. 36 सात दिवस परमेश्वराला अर्पण अर्पावे; आठव्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वराला अर्पण अर्पावे; त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये.
37 “परमेश्वराने हे सण नेमलेले आहेतः त्या दिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यांत योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वराला अर्पावे. 38 परमेश्वराच्या नेहमीच्या शब्बाथ पालना शिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत; तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडीची अर्पणे, तुम्ही परमेश्वराला अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे, ह्यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत.
39 “जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवस पर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. 40 पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन परमेश्वरासमोर सात दिवस उत्सव करावा. 41 प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यान्पिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.
स्वर्गात लोक देवाची स्तुति करतात
19 यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते:
“हालेलुया!
तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत
2 कारण त्याचे न्यायनिवाडे खरे
आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने
आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली,
तिला देवाने शिक्षा केली आहे.
त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.”
3 ते पुन्हा म्हणाले,
“हालेलुया!
तिच्यापासून निघालेला धूर अनंतकाळ वर जातो.”
4 मग चोवीस वडीलजन आणि चार जिवंत प्राणी जो देव सिंहासनावर बसला आहे त्याच्या पाया पडले व त्यांनी त्याची उपासना केली. ते म्हणाले:
“आमेन, हालेलुया!”
5 मग सिंहासनावरुन एक वाणी झाली, ती म्हणाली,
“देवाच्या सर्व सेवकांनो,
त्याची स्तुति करा,
जे तुम्ही त्याचे भय धरता ते तुम्ही सर्व लहानथोर
देवाची स्तुति करा!”
6 नंतर मोठ्या लोकसमुदायाच्या गर्जनेसारखा आवाज मी ऐकला, तो आवाज महापूराच्या आणि मेघांच्या मोठया गडगडाटासारखा होता. तो लोकसमुदास असे मोठ्याने म्हणत होता की:
“हालेलुया!
कारण आमच्या सर्वसमर्थ देवाने
सत्ता गाजविण्यास सुरुवात केली आहे.
7 आपण उल्हास करु व आनंदात राहू!
आणि त्याचे गौरव करु
कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे.
आणि त्याच्या वधूने स्वतःला नटवून तयार केले आहे
8 तिला स्वच्छ, चमकणारे तागाचे कपडे
नेसायला दिले आहेत.”
(देवाच्या पवित्र लोकांनी केलेली नीतीमत्त्वाची कामे म्हणजेच तलम तागाचे कपडे आहेत.)
2006 by World Bible Translation Center