Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र.
32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
आहे तो अत्यंत सुखी आहे
ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
2 परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.
3 देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
4 देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.
5 परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
या विषयी मार्गदर्शन करीन.
मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
9 म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!
7 त्याच वेळी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून बाहेर आणले त्यांनी महाभयंकर पाप केले आहे. 8 मी त्यांना करावयास संगितलेल्या गोष्टीपासून किती लवकर ते दूर गेले आहेत! त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ती केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्याला अर्पणे वाहात आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्राएल, ह्याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.’”
9 परमेश्वर मोशेला म्हणाला, “ह्या लोकांना मी पाहिले आहे; ते फार ताठमानेचे लोक आहेत; ते नेहमी मजविरुद्ध उठतात. 10 तर आता मला त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने नष्ट करु दे! नंतर मी तुझ्यापासून एक महान राष्ट्र निर्माण करीन.”
11 परंतु काकुळतीने विनंती करुन मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, “परमेश्वरा, तुझ्या रागाने तुझ्या लोकांचा नाश न होवो; तू तुझ्या महान शक्तीने व सामर्थ्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस 12 आणि आता तू त्यांचा नाश केलास तर मिसर देशाचे लोक म्हणतील, ‘परमेश्वराने त्यांचे वाईट करण्यासाठी, डोंगरावर त्यांना ठार मारण्यासाठी व पृथ्वीवरुन त्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांना मिसर देशातून बाहेर नेले’ म्हणून तू त्यांच्यावर रागावू नकोस; तुझा राग तू सोडून टाक; तुझ्याच लोकांचा तू नाश करु नयेस; 13 तुझे सेवक अब्राहाम, इसहाक व याकोब, यांची आठवण कर; तू तुझ्या नांवाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, ‘मी तुमची संतती आकाशातील ताऱ्या इतकी करीन, मी वचन दिलेला देश त्यांना देईन व तो कायमचेच त्यांचे वतन होईल.’”
14 तेव्हा परमेश्वराला लोकांबद्दल वाईट वाटले आणि आधी म्हटल्याप्रमाणे त्याने त्यांचा नाश केला नाही.
स्वर्गातील आनंद(A)
15 सर्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते. 2 तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो!”
3 मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली. 4 “जर तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? 5 आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो. 6 आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्याना एकत्र करुन म्हणतो, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे.’ 7 मी तुम्हांस सांगतो, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.
8 “समजा एका बाईजवळ चांदीची दहा नाणी आहेत. जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय? 9 आणि जेव्हा तिला ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’ 10 त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हांस सांगतो.”
2006 by World Bible Translation Center