Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र.
32 ज्याच्या अपराधांची क्षमा केली गेली
आहे तो अत्यंत सुखी आहे
ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.
2 परमेश्वर ज्याला निरपराध म्हणतो तो सुखी आहे.
जो स्वत:चे गुप्त अपराध लपवीत नाही तो सुखी आहे.
3 देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली
परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही
प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.
4 देवा, रात्रंदिवस तू माझे आयुष्य अधिक बिकट करीत गेलास,
मी उष्ण उन्हाळी दिवसांतील जमिनीसारखा शुष्क होत गेलो.
5 परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला.
परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले.
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस.
तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस
तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस
म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.
8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे
या विषयी मार्गदर्शन करीन.
मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
9 म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा.
या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल,
परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा.
शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!
आठवण म्हणून घेतलेले दगड
4 सर्वजण नदी पार करून गेल्यानंतर परमेश्वर यहोशवाला म्हणाला, 2 “आता बाराजणांची निवड कर. प्रत्येक कुळातुन एकेक घे. 3 याजक नदीत जेथे उभे होते त्या जागेवरचे बारा दगड त्यांना निवडायला सांग. ते बारा दगड उचलून, आज रात्री तुम्ही जेथे मुक्काम कराल तिथे ठेवा.”
4 यहोशवाने मग प्रत्येक कुळातून एक याप्रमाणे बाराजण निवडले. त्यांना जवळ बोला बोलावून 5 तो म्हाणाला, “तुमच्या परमेश्वर देवाच्या पवित्र करार कोशासमोर नदीच्या मध्यभागी जा. तेथून प्रत्येकाने एकएक दगड उचलून आणा. इस्राएल मधील आपापल्या कुळाचे प्रतीक म्हणून तो राहील. तेव्हा असा दगड खांद्यावर घेऊन या. 6 हा दगड म्हाणजे एक चिन्ह होय. ‘या दगडांचा अर्थ काय?’ असे पुढे तुमची मुले तुम्हाला विचारतील. 7 परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहून नेत असताना नदी दुभंगली व परमेश्वराने यार्देनेचा प्रवाह रोखला ही गोष्ट इस्राएलांच्या कायम स्मरणात राहावी म्हणून हे दगड आहेत असे त्यांना सांगा.”
8 इस्राएल लोकांनी यहोशवाचे ऐकले. त्यांनी नदीच्या प्रवाहातून इस्राएलाच्या प्रत्येक कुळासाठी एक याप्रमाणे बारा दगड उचलून आणले. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली त्याप्रमाणे ते वागले. ते दगड वाहून आणून त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन ठेवले. 9 परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश घेऊन याजक ज्या ठिकाणी थांबले तेथे यहोशवाने बारा दगड ठेवले. ते आजही त्याठिकाणी आहेत.
10 लोकांनी आता काय करावे हे सांगण्याची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिली. मोशेनेही यहोशवाला याच गोष्टी सांगितल्या होत्या. हे सर्व होईपर्यंत परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन याजक नदीच्या मध्यभागी उभे राहिले. आणि लोकांनी भराभर नदी पार केली. 11 लोक नदी ओलांडून गेल्यावर मग याजक पवित्र करारकोश घेऊन लोकांच्या पुढे गेले.
12 रऊबेनी, गादी आणि मनश्शाचा अर्धा वंशातील लोक मोशेच्या सांगण्याप्रमाणे हत्यारबंद होऊन, नदी ओलांडून इतरांच्यापुढे गेले. परमेश्वराने द्यायचा कबूल केलेला प्रदेश मिळवून द्यायला ते उर्वरित इस्राएल लोकांना मदत करणार होते. 13 सुमारे चाळीस हजार लोक युध्दाच्या तयारीने परमेश्वरासमोर यरीहोच्या मैदानाकडे चालून गेले.
विश्वासाचे जगणे
16 म्हणून आम्ही धीर सोडीत नाही. जरी बाह्यदृष्ट्या आम्ही व्यर्थ ठरत आहोत तरी अंतरीकदृष्ट्या आम्ही दिवसेंदिवस नवीन होत आहोत. 17 कारण आमची हलकी व क्षणिक दु:खे ही आमच्यासाठी अनंतकळचे गौरव मिळवीत आहेत, जे दु:खापेक्षा कितीतरी मोठे आहे. 18 म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायमस्वरुपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावीत नाही पण जे दिसत नाही, पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो. कारण जे दिसते ते क्षणिक आहे, पण जे दिसत नाही, ते अनंतकालीक आहे.
5 आता आम्हांला माहीत आहे की, जेव्हा जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले, तर आम्हाला देवापासून मिळलेले अनंतकाळचे घर स्वर्गात आहे. ते मानवी हातांनी बांधलेले नाही. 2 दरम्यान आम्ही कण्हतो, आमच्या स्वर्गीय निवासस्थानासह पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. 3 कारण जेव्हा आम्ही पोशाख करु, तेव्हा आम्ही नग्न दिसणार नाही. 4 कारण या घरामध्ये आम्ही असताना आम्ही कण्हतो, आणि ओझ्याने दबले जातो. कारण वस्त्रहीन असण्याची आमची इच्छा नसते, पण आमची इच्छा आहे की, आमच्या स्वर्गीय निवासस्थानाने पोशाख करावा. यासाठी की जे मर्त्य आहेत ते जीवनाने गिळावे. 5 आता देवानेच आम्हांला नेमक्या याच कारणासाठी निर्माण केले, आणि हमी म्हणून पवित्र आत्मा दिला, जो येणार आहे त्याबद्दलची खात्री बाळगा.
2006 by World Bible Translation Center