Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी यदुथुनासाठी दावीदाचे स्तोत्र
39 मी म्हणालो, “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन
मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”
2 मी दुष्टांबरोबर असलो की माझे तोंड बंद ठेवीन.
मी बोलायला नकार दिला मी काही चांगलेसुध्दा बोललो नाही.
मी फार चिडलो होतो.
3 मी फार रागावलो होतो
आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो.
म्हणून मी काही तरी बोललो.
4 माझे काय होईल?
हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन?
ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
5 परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस.
माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही.
प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते.
कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.
6 आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते.
आपली सगळी संकटे निष्कारणच असतात.
आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो
पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्याला माहीत नसते.
7 तेव्हा प्रभु, मला काही आशा आहे का?
तूच माझी आशा आहेस!
8 परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव. तू
मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.
9 मी माझे तोंड उघडणार नाही.
मी काही बोलणार नाही.
परमेश्वरा जे करायला हवे होते ते तू केलेस.
10 देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर
तू ते सोडून दिले नाहीस तर तू माझा नाश करशील.
11 परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस.
त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन
कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतात तसेआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्या ढगासारखे आहे.
12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक,
मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ.
या आयुष्यात तुझ्या बरोबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे.
माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे
केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.
13 परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस.
मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे.
मी थोड्याच वेळात जाणार आहे.
17 मोशेने कनान देश हेरण्यास पाठविताना लोकांना सांगितले की “तुम्ही येथून नेगेबमधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा. 18 देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या. 19 ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? ह्या सर्व गोष्टी पाहा व समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास 20 योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या.” (हे पहिली द्राक्षे पिकण्याच्या वेळी घडले.)
21 म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन वाळवंटापासून रहोब आणि लेबोहामाथपर्यंतच्या प्रदेशाचा शोध घेतला. 22 त्यांनी नेगेवमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. (हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते.) अहीमन शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहात होते. 23 नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदली द्राक्षाचा घड लागलेला होता. त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघे जण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळींबे व अंजीर ही घेतली. 24 त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता.
25 त्या लोकांनी त्या प्रदेशाचा 40 दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले. 26 इस्राएल लोकांची छावणी पारानच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या सर्व लोकांजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांना त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली. 27 ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हाला पाठवलेस त्या प्रदेशात आम्ही गेलो. तो प्रदेश अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेला [a] आहे. त्या प्रदेशात होणारी ही काही फळे पाहा.
देवाचे राज्य कशासारखे आहे?(A)
18 मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्याची कशाबरोबर तुलना करु 19 देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला, तो वाढला आणि त्याचे झाडे झाले. आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”
20 तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याची तुलना कोणाबरोबर करु 21 ते खमिरासारखे आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”
2006 by World Bible Translation Center